सोऽहंकडे साक्षेपानं लक्ष देताना काय जाणवेल? तर श्वास आत घेताना ‘स:’ दीर्घपणे आत घेतला जाईल आणि त्या क्षणी मन मस्तकाकाशात केंद्रित झालं असेल, उच्छ्वास सोडताना ‘ह:’च्या जाणिवेसोबत मन मस्तकाकाशातून चराचरात जणू पसरेल! ज्या चराचराला ‘मी’ आणि ‘माझे’ म्हणून मी पाहात होतो. आता ‘स:’सोबत मस्तकाकाशात केंद्रित झालेलं मन हे आत्मस्वरूपाशीच केंद्रित होईल आणि ‘ह:’सोबत तो आत्मा तोच मी, चराचरात तोच भरून आहे ही जाणीव विश्वव्यापी होईल! स्वामी सांगतात, ‘‘मन-पवनाचा धरोनि हात। प्रवेश करितां गगनांत। आकळे आत्मा सर्वगत। येई प्रचीत आपणातें।। सोऽहं म्हणजे आत्मा तो मी। शुद्ध बुद्ध नित्य स्वामी। अलिप्त; न गवसे रूप नामीं। बाणला रोमरोमीं भाव ऐसा।। गगन लंघोनियां जावें। अखंड आत्मरूपीं रहावें। विश्व आघवें विसरावें। स्वयें चि व्हावें विश्व-रूप।।’’ (स्वरूप पत्र मंजूषा, क्र. ४५). स्वामींची अतुलनीयता अशी की, ते या स्थितीलाच पूर्णत्व मानत नाहीत! मन गगनात मिसळून जाणं, यात पूर्णत्व नाही तर मनाचं उन्मन झालं पाहिजे! ते म्हणतात, ‘‘प्रसन्न मन गगनीं शिरतां। गगनरूप होतें सर्वथा। त्या गगनाचाहि द्रष्टा मी ऐसें भावितां। उन्मनावस्था अनुभवा ये।।’’ सद्गुरू एकदा म्हणाले, मृत्यूनंतर तर परमानंदाचा अनुभव मी देईनच, पण माझी अपेक्षा अशी की, माझ्या माणसांना तो जगतानाच मिळावा! म्हणजे गगनात मिसळून गेलेलं मन स्वत:लाही तर विसरेलच ना? मग त्या परमानंदाच्या अनुभवाची जाणीव तरी त्याला कुठून व्हावी? या मनालाच स्वामी त्या उन्मनावस्थेचा परमानंद प्रत्यक्ष पाहणारा, अनुभवणारा द्रष्टा बनवू इच्छित आहेत! स्वामी त्याच पत्रात सांगतात की, ‘‘त्या अनुभवाची सहजस्थिती। शब्दें वर्णावी कवणें रीतीं। ज्याची त्यासी येतां प्रचीति। आनंद चित्तीं न सामावे।।’’ त्या परमानंदाचा अनुभव हा जेव्हा सहजस्थिती होतो तेव्हा त्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही. या आनंदाची प्रचीती प्रत्येकाच्या आवाक्यात आहे! त्या प्रचीतीनं चित्त आनंदानं ओसंडून जातं!! साधा आपल्या रोजच्या जगण्यातला अनुभवच पाहा ना! पराकोटीचं दु:ख किंवा पराकोटीचा आनंद होतो तेव्हा माणसाला तो शब्दांत व्यक्तच करता येत नाही. तो आनंदातिरेकानं हसतो किंवा दु:खातिरेकानं आक्रंदतो. मग हा तर परमानंदाच्या सहजस्थितीचा अखंड अनुभव आहे! तो शब्दांत कसा व्यक्त करता येणार? तर निमिषापासून सुरू होणाऱ्या अभ्यासाची ही पूर्णावस्था आहे. एक लक्षात घ्या, इथे सोऽहं साधनेनं काय होतं, एवढय़ापुरतंच लिहिलं गेलं आहे. या साधनेबाबत बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही की पात्रताही नाही. त्यामुळे अचूक मार्गदर्शनासाठी पावसकडेच वळणं इष्ट. आता महत्त्वाचा मुद्दा असा की, ही ओवी काय फक्त सोऽहं साधनेपुरताच संकेत करते का हो? नाही! प्रत्येक साधना, उपासना, मग ती कोणत्याही पंथाची असो, कोणत्याही धर्माची असो, तिचाच प्रारंभापासून ते ध्येयशिखरापर्यंतचा प्रवास ही ओवी सांगते. तो कसा, ते आता पाहू.