अजूनही डून स्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर बी. जी. वर्गीस यांचा आदर्श म्हणून उल्लेख केला जातो. ब्रह्मदेशात जन्मलेल्या वर्गीस यांचे बालपण बिहारच्या हजारीबागेत गेले.  केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादन केलेल्या बीजीव्ही यांचा पत्रकारितेतील प्रवेश हा एक अपघात होता, असे म्हणतात. इतिहास किंवा अर्थशास्त्रात विशेष प्रावीण्य असलेल्या उमेदवारास ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादक म्हणून संधी उपलब्ध असल्याचे केंब्रिज युनिव्हर्सटिीच्या निवड मंडळाने सुचविले, तोपर्यंत डून स्कूलच्या एका साप्ताहिकात काही लेख लिहिण्यापुरताच त्यांचा पत्रकारितेशी संबंध होता. पुढे ते पत्रकारितेशी कायमचे जोडले गेले. तेव्हा भारतात आíथक आणि सामाजिक विकासाची तहान वाढू लागली होती. आपल्या पत्रकारितेत यावरच लक्ष केंद्रित करायचा निर्णय वर्गीस यांनी घेतला.सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळावी, तळागाळाच्या माणसाला स्वाभिमानाने वावरता यावे आणि सरकारी यंत्रणांनी त्यासाठी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात हे सूत्र समोर ठेवूनच लेखणी झिजविण्याचे एकदा ठरले, की सरकारदरबारीचे मानमरातब आणि राजकीय पदे दुय्यम ठरतात. वर्गीस यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत या बाबींना स्वत:पासून दूर ठेवले. त्यामुळेच त्यांची लेखणी कुणासमोरही िमधी न होता, अक्षरश: तळपती राहिली. बांधीलकी आणि शिस्तीचा आईवडिलांकडून मिळालेला वारसा त्यांनी आपल्या उजळ शैक्षणिक कारकीर्दीतही जपला, आणि व्यावसायिक कारकीर्दीत त्याला आणखी उजाळा दिला. माणूस डोळ्यासमोर ठेवून आपली पत्रकारिता पणाला लावणाऱ्या या वेगळ्या पत्रकाराने विकास पत्रकारितेचा एक आगळा आदर्श माध्यमविश्वासमोर उभा केला. गरिबी हेच देशासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्यामुळे गरिबी व आíथक परिवर्तन हीच पत्रकारितेतील सर्वात खरी ‘स्टोरी’ आहे, हा त्यांचा विचार काळाच्या ओघात सिद्ध झाला आहे. शेतीतून एखादे कुटुंब तग धरू शकत नसेल, तर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, नाही तर असंतोष पसरेल, ही त्यांनी वर्तविलेली भविष्यवाणी वर्तमानाशी मिळतीजुळती ठरू पाहते आहे. देशातील प्रगतीची वाटचाल न्याहाळण्यासाठी या अवलियाने १९५९ मध्ये देशात आठ हजार मलांचा प्रवास केला  त्यातून ए जर्नी थ्रू इंडिया ही लेखमाला जन्माला आली. ती पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि वर्गीस यांच्या लेखणीला नवी मिती प्राप्त झाली. पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले . ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘िहदुस्तान टाइम्स’ या प्रकाशनांच्या संपादकपदाला त्यांच्या प्रखर, निर्भीड लेखणीमुळे नवी उंची प्राप्त झाली. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या ‘वॉरियर ऑफ द फोर्थ इस्टेट’ या गाजलेल्या चरित्रात्मक पुस्तकाबरोबरच, ‘वॉटर्स ऑफ होप- इंडियाज नॉर्थ-ईस्ट’ आणि ‘फर्स्ट ड्राफ्ट- विटनेस टु मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकांमुळे देशाच्या वैचारिकतेला नवी दिशा मिळाली. इंदिरा गांधी यांचे ते माध्यम सल्लागार होते, पण आणीबाणीच्या काळात नागरी हक्कांचा पुरस्कार करीत इंदिरा गांधी यांचे वैचारिक विरोधक म्हणूनही ते हिरिरीने पुढे झाले. विकास पत्रकारितेचा आधारस्तंभ म्हणून बीजीव्ही यांचे नाव माध्यम क्षेत्रावर कायमचे कोरलेले राहणार आहे.