भाजप स्वबळावर सत्तास्थापन करू शकल्यास मुख्यमंत्रिपदाची धुरा निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिली जाईल; परंतु सरकार चालवण्यासाठी बरीच तारेवरची कसरत करावी लागणार असल्यास अशा सर्कशीची जबाबदारी भाजपमधील अनुभवी नेत्याकडे जाईल हे सांगता येते.. पण होणार काय आहे, हे सांगताच येऊ नये अशी स्थिती मतदानानंतरही कायम आहे..
आर्थिक गुंतवणुकीबाबत असे सांगतात की जेवढी जोखीम अधिक तितका परतावा अधिक. याचा अर्थ जे सुरक्षित भासते त्यातून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत नाही. भारतीय जनता पक्षास हे ठाऊक असणारच. मुदलात गुंतवणूकदारांचा आणि फायद्या-तोटय़ाची समज जन्मत:च घेऊन येणाऱ्यांचा सुळसुळाट या पक्षात असल्यामुळे अधिक फायद्यासाठी अधिक जोखीम घ्यायला हवी, हे भाजप ओळखून असल्यामुळे या पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर आपला शिवसेनेबरोबरचा संसार उधळण्याचा निर्णय घेतला असणार. बुधवारच्या ६२ ते ६४ टक्के इतक्या मतदानानंतर हा जोखीम घेण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य याच्या चर्चा झडू लागतील. मतमोजणी रविवारी १९ ऑक्टोबरला आहे. तोपर्यंत हा अंदाजखेळ अथक चालू राहील. त्यात भर पडेल ती मतदानोत्तर चाचण्यांची. या चाचण्या आपापल्या परीने या मतदानामागील अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतीलच. त्या अर्थाच्या केंद्रस्थानी असतील दोन घटस्फोट. एक म्हणजे सेना-भाजपचा आणि दुसरा काँग्रेस-राष्ट्रवादीचा. वास्तविक राज्यात गेली १५ वर्षे सत्ता होती ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. तरीही निवडणुकीत चर्चा आहे ती भाजप आणि त्याबरोबरच शिवसेनेचे काय होणार, ही. आता त्यांचे जे काही होणार आहे, ते मतदानयंत्रात बंद असल्याने या प्रमुख पक्षांच्या निवडणुकीय वागण्याची आणि निकालोत्तर भविष्याची कुंडली पाहणे गैर ठरणार नाही. सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती या निवडणुकीतून फार काही लागणार नाही, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्यांची स्पर्धा असणार आहे ती तिसऱ्या स्थानासाठी. त्यातही काँग्रेसने या वेळी निवडणुकीआधीच शस्त्रास्त्रे म्यान केल्याचे जाणवले. कदाचित लोकसभा निवडणुकीत नरेंद्रास्त्र जरा जास्तच वर्मी लागल्याने त्या घावातून काँग्रेस सावरलेली दिसली नाही. परिणामी या पक्षाचे उद्याचे आशास्थान असलेले चि. राहुलबाबा गांधी यांनी प्रचाराची जबाबदारी फारशी अंगावर घेतली नाही. याआधी या चि. राहुलबाबाने ज्या राज्यास हात घातला, मग ते बिहार असो वा उत्तर प्रदेश, त्या राज्यांत काँग्रेसला सडकून मार खावा लागला. महाराष्ट्रात चि. राहुलबाबा आले तरी किंवा अजिबात फिरकले नाहीत तरी काँग्रेसचा पराभव निश्चित, असे डोळ्यासमोर दिसत असताना उगीच प्रचारात पडून हात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या, असा विचार चि. राहुलबाबांनी किंवा त्यांच्या सल्लागारांनी केला नसेलच असे नाही. त्यामुळेच तीन-चार सभांवर राहुलबाबांचा प्रचार आटोपला. तीच गत त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचीही. त्यांचाही वाटा या प्रचारात अगदीच तोंडी लावण्यापुरता होता. आपण प्रचाराला गेलोच नाही तर अगदीच बरे दिसणार नाही, हे जाणवल्यामुळे गांधी मायलेकांनी काँग्रेसच्या प्रचारात आपली नाममात्र हजेरी लावली. पण जबाबदारी घेतली नाही. याचे प्रमुख परिणाम दोन. एक म्हणजे काँग्रेसचे पानिपत झालेच तर त्याचे बालंट या मायलेकांवर येणार नाही. त्यांनी प्रचारच केला नाही तर पराभवासाठी त्यांना जबाबदार कसे धरणार असा साळसूद सवाल काँग्रेसजन १९ ऑक्टोबरला विचारतील. तेव्हा या मायलेकांची उपस्थिती अशा तऱ्हेने उभयतांच्या- पक्ष आणि गांधी कुटुंबीयांच्याही- हिताची ठरली असेल. या पक्षाचा १५ वर्षांचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती याच्या उलट असेल. काँग्रेसमध्ये मायलेकांचा खेळ तर या पक्षात काका पुतण्याचे समीकरण. आपल्या पक्षाच्या आजच्या अवस्थेस नक्की कोण जबाबदार या प्रश्नाची कुजबुज या पक्षातही या निवडणुकीनंतर सुरू होईल. तिचे थेट उत्तर शोधण्याची वेळ यायच्या ऐवजी सत्ताकांक्षी भाजप आणि/ किंवा सेनेला आपली गरज लागली तर बरे असाच विचार या पक्षातील धुरिणांच्या मनात या मधल्या काळात असेल. तशी ती गरज खरोखरच लागली तर पक्षासाठीच्या जीवघेण्या निर्णायक प्रश्नास सामोरे जाणे काही काळ तरी निश्चित लांबणीवर पडेल.    
या लढतीत सर्वात गंभीर आणि आकाराने प्रचंड प्रश्नचिन्ह डोक्यावर असलेला पक्ष म्हणजे शिवसेना. भारतीय जनता पक्षास आव्हान देत सत्ता खेचून आणण्यात सेनाध्यक्ष उद्धव ठाकरे हे यशस्वी झाले तर राजकारणातील सर्वात मोठय़ा शौर्यपुरस्काराचे ते मानकरी ठरतील. पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाचे काय होणार याच्या चिंता वाहिल्या जात असताना उद्धव यांनी पक्षास सत्तासोपानावर बसवून दाखवले तर एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे राजकीय पुण्य त्यांच्या पदरात पडेल. त्यांच्या या लढय़ात जायबंदी होणारा सर्वात मोठा पक्षी ठरेल तो म्हणजे भाजप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पट्टशिष्य अमित शहा यांच्या धूर्तधोरणी नेतृत्वास उद्धव खरोखरच धोबीपछाड घालू शकले तर तो राजकारणातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल यात शंका नाही. त्याच वेळी त्यांच्या संभाव्य विजयामुळे वाढत्या अंगाच्या मनसेचेदेखील पंख कापले जातील आणि पुढे बराच काळ ते वाढूही शकणार नाहीत. अर्थात यास दुसरी बाजू आहे आणि ती वास्तवात येऊ नये अशीच सेनेची इच्छा असेल. कारण ती शिवसेनेसाठी काळरात्र असेल.
याचे कारण सेनेची दूरान्वयानेदेखील मदत न घेता भाजप सत्ता स्थापन करू शकला तर तो घाव सेनेच्या मुळावर येणारा असेल. गेली २५ वर्षे भाजप हा राज्यात सेनेच्या तुलनेत दुय्यम भूमिका घेत आला आहे. हे दुय्यमतेचे जोखड झुगारून भाजपने स्वबळावर सत्ताभरारी घेतल्यास ती घटना सेनेच्या जखमांवर मीठच नव्हे तर तिखटही चोळणारी असेल. तसे झाल्यास आपल्या हातातील नरेंद्रास्त्राची ताकद अमित आहे यावर भाजपची खात्री पटेल आणि त्याचबरोबर देशभरातील सर्वच प्रादेशिक पक्षांसाठी तो धोक्याचा इशाराही ठरेल. भाजप स्वबळावर सत्तास्थापन करू शकल्यास मुख्यमंत्रिपदाची धुरा निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिली जाईल आणि सरकार चालवण्यासाठी बरीच तारेवरची कसरत करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अशा सर्कशीसाठी कोणा अनुभवीची निवड केली जाईल. या निवडणुकीतील सर्वात भाबडा मुद्दा म्हणजे सेना-भाजपचा काडीमोड. वरवर पाहता निवडणुकीच्या तोंडावर, चर्चा फिसकटल्यामुळे वगैरे ही युती दुभंगली असे दाखवले जात असले तरी ते सत्य नाही. देशभरात उत्तरोत्तर आपण स्वबळावर वाढायला हवे यासाठी गेल्या दीड दशकांपासून भाजपचे प्रयत्न सुरू असून त्या लक्ष्याकडे जाण्याचा एक मार्ग म्हणजेच सेनेपासून वेगळे होणे हा होय. भाजपने यासाठी मोठी तयारी चालवली होती. मोदी यांच्या केंद्रीय विजयामुळे ही घटस्फोटघटिका या पक्षाने अलीकडे ओढली, इतकेच. बाकी सेना-भाजपतील काडीमोड हे पक्षीय राजकारणातील विधिलिखित होते. त्याचे श्रेय अमित शहा यांना देणे हे गुंतागुंतीच्या राजकारणाचे सुलभीकरण ठरेल.
तेव्हा या सर्वार्थाने महाराष्ट्रातील ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. अधिकच कोलाहल माजल्यास, भाजपस कमी मताधिक्य लाभल्यास भाजपच्या विरोधात अन्य सर्वाच्या आघाडीचे प्रयत्न होणारच नाहीत, असेही नाही. सध्याच्या या गुंत्याकडे पाहून मतदाराचे डोके भिरभिरले असेल तर ते साहजिकच म्हणावे लागेल. कारण या मतदाराचा प्रश्न साधा असतो. तो म्हणजे निवडून कोण येणार? या साध्या प्रश्नाच्या उत्तरात इतके सारे महाभारत असते याचा अंदाज त्यास असतोच असे नाही. अशा वेळी या मतदाराच्या अवस्थेचे वर्णन करण्यास दिवंगत कविवर्य सुरेश भट यांचे शब्द चपखल ठरावेत..
एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे हे खरे की ते खरे,की ते खरे की ते खरे