तीनेक आठवडय़ांच्या घुसळणीनंतर शिवसेना आणि भाजप यांचे एकमेकांविषयीचे अज्ञान दूर झाले आहे, असा समज महाराष्ट्राच्या   तमाम जनतेने आता करून घ्यावा आणि युती झाल्याचे मान्य करावे.  मात्र, कळीच्या मुद्दय़ाला स्पर्शही न करता सर्व काही आलबेल  आहे हे दाखवण्याचे या पक्षांचे कौशल्य कौतुकास्पद म्हणावे लागेल..
देशातील वारे एकंदर काँग्रेसच्या विरोधात असल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीस सत्ताच्युत करण्यासाठी आपापल्या महत्त्वाकांक्षा म्यान कराव्यात असे एकंदर शहाणपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांनी दाखवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका या युतीतर्फेच एकमुखाने लढवल्या जातील असा दावा उभय पक्षांनी केला आहे. यास दावा असे म्हणण्याचे        कारण म्हणजे इतक्या दिवसांच्या दळणानंतरही या दोन्ही पक्षांना मतदारसंघ निश्चित करता आलेले नाहीत. याचा अर्थ इतकाच की विवाहबद्ध व्हायचे याचा निर्णय वर आणि वधू पक्षांतील वडीलधाऱ्यांनी घेतला आहे. आता ही वडीलधारी वधू आणि वराच्या शोधार्थ मोहिमेवर बाहेर पडतील. या संदर्भात नक्की वास्तव काय आहे, याचा अंदाज या बाबतच्या घोषणेवरून बांधणे अवघड जाणार नाही. भाजपतर्फे त्या पक्षाचे विद्यमान ज्येष्ठ ओम माथुर, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेतर्फे त्या पक्षाचे आगामी ज्येष्ठ, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या चर्चेत सहभाग घेतल्यानंतर उभय पक्षांनी युती जाहीर केली ती अनुक्रमे विनोद तावडे आणि संजय राऊत यांच्या मुखाने. या घोषणेचा तपशीलही         पुरेसा बोलका म्हणावा लागेल. सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुका युती म्हणून लढण्याचे ठरवल्याचे हे दोघे म्हणाले. आम्ही युती करणार आहोत, पण जागा कोण किती लढणार आदी तपशील यथावकाश जाहीर केला जाईल असे तावडे आणि राऊत या दुकलीने जाहीर केले. म्हणजे जो मुद्दा या दोन पक्षांत खऱ्या अर्थाने मतभेदाचा आहे, त्यास हात न घालताच या उभय पक्षांनी आपली युती झाल्याचे मान्य केले. कळीच्या मुद्दय़ाला स्पर्शही न करता सर्व काही आलबेल आहे हे दाखवण्याचे या पक्षांचे कौशल्य कौतुकास्पद म्हणावे लागेल. आपल्याकडे हे इतके कौशल्य आहे, हे या उभय पक्षांना माहीत नसावे. असे होते. आपल्या बेंबीत कस्तुरी आहे, हे मृगास तरी कोठे माहीत असते? तेव्हा हे असे होऊ शकते हे आपण मान्य करावे लागेल. नपेक्षा त्या आधी दोन्ही पक्षांनी आपापल्या क्षीण दंडांतील बेटकुळ्या दाखवत एकमेकांची उणीदुणी काढली त्याचा अर्थ कसा लावणार? या अज्ञ काळात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नरेंद्र मोदी या मर्मस्थळालाच आव्हान दिले आणि भाजपने शिवसेना हा कसा आडमुठा पक्ष आहे, याची जाणीव आपल्या २५ वर्षांच्या जोडीदारास करून दिली. भाजपने दिल्ली सांभाळावी आणि राज्य आमच्यावर सोपवावे, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले तर सेनेने मुख्यमंत्रिपदाचा विचार करू नये, असा सल्ला भाजपने आपल्या सहकाऱ्यास दिला. सेनेने जे काही सांगावयाचे ते माध्यमांतून सांगू नये, अशी अपेक्षा भाजपने व्यक्त केली होती. त्यास उत्तर देताना सेनेने आपण काय करू इच्छितो आणि भाजपने काय करावे हे कॅमेऱ्यांच्या लखलखाटातच सांगितले. त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दूरचित्रवाणी वाहिनीस मुलाखत देताना जागावाटपासाठी सेनेची कशी मनोभूमिकाच नाही, हे जाहीर केले. अर्थात हे जे काही झाले ते सर्व अज्ञानातून हे आपण समजून घ्यावयास हवे. तेव्हा साधारण तीनेक आठवडय़ांच्या घुसळणीनंतर उभय पक्षांचे एकमेकांविषयीचे अज्ञान दूर झाले आहे, असा समज महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आता करून घ्यावा आणि युती झाल्याचे मान्य करावे.
या युतीच्या कालच्या घोषणेनंतर सेना आणि भाजपने आपण नक्की किती जागी लढणार हे नक्की केल्याचे सांगितले गेले. मात्र त्याच घोषणेत या दोन पक्षांनी आपापल्या सहयोगी पक्षांना दिल्या जाणाऱ्या जागांत कपात केल्याचेही स्पष्ट झाले. हे होणारच होते आणि या सहयोगी पक्षांना ते अपेक्षितही असणार. सेना आणि भाजपच्या वळचणीखाली असलेले हे घटक पक्ष या दोन पक्षांच्या जिवावर चांगलेच उडय़ा मारत होते. आपल्यामुळेच जणू काही सेना-भाजपची युती होणार आहे वा झाली         तर एकत्र राहणार आहे अशी या घटक मंडळींची भूमिका होती. परंतु रिपब्लिकन पक्ष असो वा स्वाभिमानी शेतकरी संघटना वा महादेव जानकर यांचा एकनेती पक्ष यांना हे भाजप आणि सेनावाले हिंग लावून विचारत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बडय़ा जमीनदाराने ज्याप्रमाणे अनेक छोटय़ामोठय़ांना आपल्या पदरी बाळगावे तद्वत सेना आणि भाजपने या छोटय़ा घटक पक्षांना बाळगलेले आहे. तेव्हा हे दोन बडे पक्ष या छोटय़ा      पक्षांना किंमत देण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरे असे की हे छोटे पक्ष काही त्यांना सेना-भाजपचा पुळका आहे, म्हणून त्यांच्या आश्रयाला आलेले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन अन्य बडय़ा पक्षांनी या छोटय़ा पक्षांसमोर चारा टाकणे बंद केल्यामुळे रिपब्लिकन वा अन्य पक्षांना पर्याय राहिला नाही. मंगळवारीही सेना-भाजपने आपापली सोय लावल्यानंतर आणि घटक पक्षांच्या हाताशी फार काही लागणार नाही हे नक्की झाल्यानंतर रामदास आठवले, जानकर आणि अन्यांनी नाराजी व्यक्त केली. सेना-भाजपच्या नावाने या घटक पक्षांनी रडगाणे गायला सुरुवात केल्यानंतरही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तेव्हा घटक पक्षांचे स्थान या युतीत काय आणि किती आहे तेही पुन्हा एकदा दिसून आले. तेव्हा या घटक पक्षांना हात चोळत बसण्यापलीकडे फार काही करायची संधी मिळणार नाही. तेव्हा अशा तऱ्हेने सेना-भाजप युतीचे घोडे गंगेत राहील असा आभास या नेत्यांनी केल्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर सेना-भाजपचे जे काही झाले त्यावरून देता येईल. या बाजूला सेना-भाजपने आपली कशीबशी युती जमवल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसदेखील असाच काही प्रयत्न करतील हे नक्की.
या सगळ्यातून दिसते ते हेच की सेना-भाजप युती असो वा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी. या दोघांनाही जनतेच्या मताची काडीचीही कदर नसून आपली सत्ता येणारच अशा भ्रमात ही मंडळी आहेत. या पाश्र्वभूमीवर आणखी    एका मुद्दय़ाचे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. ते युती वा आघाडी यांची तोळामासा प्रकृती. युती अतिदक्षता विभागात आहे, असे खुद्द सेना नेतेच सांगत होते. नाकासमोर सूत धरायची वेळ आलेल्या या युती नामक रुग्णाला उभय पक्षांच्या नेत्यांनी या अशा अवस्थेतच बाहेर काढण्याचे ठरवलेले दिसते. तेव्हा ही सुतावरली युती मॅरेथॉनसाठीच धावेल असा या मंडळींचा दावा आहे आणि त्यावर जनतेने विश्वास ठेवावा असाही त्यांचा आग्रह आहे.