आठवणी नेहमीच सुखकारक नसतात, पण या कादंबरीतून एका वेगळ्या जगाचं चित्र उभं करताना त्यांच्या गाभ्याशी असलेला गोडवा समोर येतो. मनोविकारांच्या समस्येकडे अधिक समंजसपणे पाहण्याचं आवाहन ही कादंबरी कोणताही भावनिक संदेश वगरे न देता करते.
आपली सर्वात सुंदर गाणी तीच असतात जी आपलं सर्वात गहिरं दु:ख मांडतात, अशा अर्थाची एक जुनी कविता आहे. पण वेदनेची अशी गाणी तेव्हाच बनतात जेव्हा त्या वेदनेनं आपलं मन मोकळं, अधिक विशाल बनवलेलं असतं. एक अधिक चांगलं माणूस बनण्याच्या वाटेवर आपल्याला आणून सोडलेलं असतं. पत्रकार लेखक जेरी पिंटो यांची कादंबरी ‘एम अँड द बिग हूम’ अशाच वाटचालीची गोष्ट आहे. माहीमच्या मध्यमवर्गीय वस्तीमधल्या छोटय़ाशा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका चौकोनी कुटुंबाचा मानसिक व्याधीशी चाललेला झगडा आणि त्याच वेळी आपलं कुटुंब टिकवण्यासाठीच्या धडपडीबद्दलचं हे कथन एकाच वेळी प्रचंड बोलकं आणि अंतर्मुखही आहे.
इमेल्डा आणि ऑगस्टस मेंडिस, मोठी मुलगी सुझान आणि पुस्तकाचा निवेदक धाकटा मुलगा यांचं हे कुटुंब. मुलांसाठी इमेल्डा ही ‘एम’ आहे आणि कोणत्याही गोष्टीला मोठ्ठा हुंकार भरून उत्तर देत असल्यामुळे असेल कदाचित, पण ऑगस्टससाठी त्यांनी ठेवलेलं नाव आहे ‘बिग हूम.’ मुंबईतल्या कोणत्याही उत्तम कमावत्या, सुखवस्तू बनण्याची पूर्ण शक्यता असलेल्या कुटुंबासारखंच एक असूनही इमेल्डाच्या तीव्र नराश्याच्या व्याधीमुळे ही घडी पूर्ण विस्कटून तिथे एक सततची अनिश्चितता भरून राहिलेली आहे. या अनिश्चिततेच्या केंद्रस्थानी असलेल्या इमेल्डाचं व्यक्तिमत्त्व मात्र वेगळं आहे. आपल्या मानसिक विकाराशी सतत दोन हात करत जगणारी, मी वेडीच आहे असं रोखठोक सांगत समोरच्याच्या वागण्यातलं शहाणपण हरक्षणी अजमावत राहणारी एम घरातल्या इतरांसाठी आव्हान आहे आणि निवेदकासाठी एक कोडं. ही असाध्य बाधा जडण्यापूर्वीची एम एक संपूर्ण व्यक्ती म्हणून नेमकी कशी होती, आपल्या आईवडिलांचं एक सर्वसामान्य प्रियकर-प्रेयसी म्हणून आणि नंतर नवरा-बायको म्हणूनचं जगणं कसं होतं याचं चित्र जुळवण्याचा निवेदकाचा प्रयत्न कादंबरीभर सुरू राहतो. हे कोडं जुळवण्यासाठी त्याच्या हाताशी आहेत एमने लिहिलेली काही पत्रं, तिच्या डायऱ्यांमधल्या नोंदी, लिहिण्याच्या अनिवार ओढीतून तिने खरडलेल्या टेलिफोन डायऱ्या, चिठ्ठय़ाचपाटय़ा, हॉटेलांची मेन्यूकरड आणि खुद्द एमचं गोष्टीवेल्हाळपण.
या गोष्टींमधून कादंबरी भूतकाळ आणि वर्तमानात फिरत राहते. गरीब ख्रिश्चन कुटुंबातील, फ्रेंच साहित्य शिकण्याची इच्छा असणारी, पण आíथक चणचणीमुळे स्टेनो टायपिस्ट बनलेली पोरगेलीशी, भांबावलेली इमेल्डा आणि गोव्यातून मुंबईत आलेला स्वत:च्या हिमतीवर इंजिनीअर बनलेला ऑगस्टस यांची प्रेमकहाणी काही सुंदर प्रसंगांतून फुलते. पण दुसऱ्या मुलाच्या म्हणजेच निवेदकाच्या जन्मानंतर, एमच्याच भाषेत, कुठेतरी कुणीतरी एक नळ सुरू करतं. त्यातून ठिबकणाऱ्या काळ्या पाण्याच्या थेंबांचा हळूहळू मोठा प्रवाह बनतो आणि त्यात सगळंच वाहून जातं.
आपल्या व्याधीचं असं वर्णन करणाऱ्या एमकडे भाषेची देणगी आहे आणि ती खेळवण्याची ताकदही. हीच भाषा या कादंबरीचंही सौंदर्य आहे. ती धबधब्यासारखी सतत कोसळत राहते. अखंड बडबडीसारखी, एका अस्वस्थ मेंदूचं अंतर्बाह्य़ दर्शन घडवते.
कादंबरीचा दुसरा पदर अर्थातच अगतिकेतशी संबंधित आहे. त्यातली पहिली काही प्रकरणं लहान मुलांच्या नजरेतूनच लिहिली आहेत. आईचं अधूनमधून एखाद्या हिंस्र श्वापदासारखं बेबंद होऊन जाणं, तिचे आत्महत्येचं प्रयत्न यांचा सामना करताना आपण काही केल्या तिच्या राज्यात पोहोचू शकत नसल्याची खंत आहे. या चिरेबंद भिंतींवर डोकं आपटण्याचे निवेदकाचे प्रयत्न सतत सुरू असतात. आपल्याला नामोहरम करणारी ही व्यक्ती नक्की मनोरुग्ण आहे, की हा केवळ एक बहाणा आहे, की आपल्या मनोविकाराचं पांघरूण घेऊन गोष्टी आपल्या मनासारख्या घडवून आणण्याचा हटवादीपणा आहे. या सगळ्या खेळामध्ये आपण केवळ एक बाहुलं आहोत का, या प्रश्नांशी आणि परिस्थितीशी झगडताना, सांत्वन शोधताना एका क्षणी देव, श्रद्धा याबद्दल आलेलं बधिरपणही कादंबरीत एका ठिकाणी फार उत्कटपणे येतं.
त्याच वेळी भोवतालच्या माणसांची सुरेख व्यक्तिचित्रं िपटो यांनी उभी केली आहेत. त्यातलं सर्वात मनस्वी आणि खंबीर पात्र अर्थातच बिग हूमचं आहे. तरुणपणीच्या आपल्या बिनधास्त, मनमोकळ्या स्वभावाचा कोणताही मागमूस नसलेला बाप. एमच्या अखंड संवादी पात्रासमोर हे अबोल व्यक्तिमत्त्व लेखकाने तितक्याच प्रभावीपणे उभं केलं आहे. मुलाबरोबर गोव्याला केलेल्या एकमेव दौऱ्यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या संवादाच्या वेळी बिग हूमच्या मनाची थोडी झलक दाखवणारी खिडकी उघडते तेवढीच. एरवी त्याबद्दलचे संदर्भ निवेदकाच्या वर्णनातूनच येतात. वैयक्तिक आयुष्य, आनंद, सर्वसामान्यपणे जगण्याची संधी हे सगळंच हिरावलं गेलं असतानाही नात्याचा आदर आणि त्यातलं प्रेम जपण्याची अवघड कसरत या माणसाला साधलेली आहे. याखेरीज वारंवारच्या स्थलांतरामुळे कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी.. कोणत्याच भाषेत जम बसवू न शकलेली, त्यामुळे भाषा वापरण्याबाबत कमालीची गोंधळलेली एमची आई, इमेल्डाचं घर, नातेवाईक, तिच्या ऑफिसमधली माणसं, मुली या साऱ्यातून मुंबईकर ख्रिश्चनांचं छोटंसं जगही इथे सापडतं.
पण या सगळ्या खटाटोपातून सतत समोर येणारा प्रश्न एकच आहे, आणि तो म्हणजे नॉर्मलपणाची, चारचौघांसारखं असण्याची व्याख्या नेमकी कशी करायची. एमला डॉक्टरकडे घेऊन जाण्याच्या एका प्रसंगात, आपल्या शेजारी रांगेत बसलेल्या एका नराश्यग्रस्त तरुणाला ती आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बिनदिक्कत सांगते. आपल्याच दु:खात मग्न असलेल्या त्या तरुणाने विचारलेल्या, ‘आंटी, आप मेंटल हो?’ या प्रश्नावरही ती खुशाल ‘हो’ असं उत्तर देते. मेंटल माणसांचं देव लवकर ऐकतो असं त्याला वडिलांनी सांगितलेलं असल्याने तो एमला त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगतो. हलक्याफुलक्या अशा प्रसंगानंतर येणारा दुसरा प्रसंग मात्र गोठवणारा आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या तिच्या नेहमीच्या वॉर्डमध्ये जागा नसल्याने खासगी रुग्णालयात तिला पहिल्यांदाच विजेचा शॉक देण्यात येतो. या अमानुष उपचारानंतर दोन दिवसांत परतलेली एम मुलांना तिच्या नेहमीच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाची निव्वळ सावली भासते. एखाद्या रोमन लेडीसारखी अत्यंत शिस्तीत वागणारी ही बाई स्वत:ची ओळख पार विसरून ‘नॉर्मल’ बनलेली दिसते. या प्रसंगानंतर ही गोष्ट एमची न राहता प्रत्येकाचीच बनते. नॉर्मल माणसांच्या व्याख्येत स्वत:ला फिट्ट बसवण्याच्या खटपटीत अपरिहार्यपणे बळी जातो आपल्या वेगळेपणाचा. एमची सगळी बडबड म्हणजे हे वेगळेपण जपण्यासाठीचीच धडपड होती हेही स्पष्ट होतं.
िपटो यांची ही पहिलीच कादंबरी बहुतांश आत्मचरित्रपर, आठवणींच्या नोंदींसारखी आहे. या आठवणी ताज्या असताना नेहमीच सुखकारक नक्कीच नसणार, पण कादंबरीतून या वेगळ्या जगाचं चित्र उभं करताना त्याच्या गाभ्याशी असलेला गोडवाच त्यांनी वाचकांसमोर ठेवला आहे. मनोविकारांच्या या समस्येकडे अधिक समंजसपणे पाहण्याचं आवाहन ही कादंबरी कोणताही भावनिक संदेश वगरे न देता करते. प्रत्येकाच्याच मनाच्या उंबरठय़ापलीकडे उभ्या असलेल्या या वास्तवाला तिथेच उभं ठेवण्यासाठी आपल्याच जीन्सबरोबर सततचा झगडा फारसा कुणाला चुकलेला नाही. आणि तरीही गुणसूत्रांची कोणती खिटी जागेवर बसली की ते समोर उभं ठाकेल याचीही शाश्वती नाही. मग उरतं ते या अनाकलनीय गोष्टीला समजून घेत राहणं; ज्यात खरं शहाणपण आहे.