कन्हय्यालाल मुन्शी यांच्या देशसेवेचा पट मांडणारे हे चित्रमय पुस्तक, त्यांची जडणघडण कशी झाली हे सांगून तरुणांना प्रेरणाही देते. मोठय़ांना आणि लहानांना निरनिराळ्या प्रकारे कळेल, समजेल आणि उमगेल अशी खुबी या पुस्तकात नक्कीच आहे!

गुजरातने आधुनिक भारताला नेत्यांची जी प्रभावळ दिली, त्यात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची नावे चटकन आठवतात. कन्हय्यालाल मुन्शी यांचेही कार्य भारताला अभिमान वाटावा असेच आहे, हे कधी कुणी ठसवून सांगितलेले नाही. वास्तविक मुन्शी यांच्या चरित्रात सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रकथेच्या स्वरूपात मुन्शींचे चरित्रपुस्तक प्रकाशित झाले असल्याने ते अधिक लोकांपर्यंत (सर्व वयोगटांपर्यंत) पोहोचेल, याचे स्वागत केले पाहिजे.
 वयाच्या २४व्या वर्षीपासून (सन १९११) मुंबईत वकिली करू लागलेले मुन्शी, भुलाभाई देसाईंसारख्या ज्येष्ठ विधिज्ञाचे सहकारी म्हणूनही खोऱ्याने पैसा ओढू शकले असते. पण लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट यांच्या ‘होमरूल’ संकल्पनेने प्रभावित झालेल्या मुन्शींनी, देसाई होमरूलचा बहिष्कार न जुमानता मुंबईच्या गव्हर्नरकडे बैठकीला जाणार, म्हणून देसाईंची साथ सोडली आणि वकिलीसोबत कादंबरी लेखनही करून तग धरला- पण मूल्यांना अंतर दिले नाही. पुढे १९१८ पासून गांधीजींसह काम केल्यावर १९२६ पासून ते प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य झाले आणि सरदार पटेलांच्या १९२८च्या बारडोली सत्याग्रहात सरकारची भूमिका दमनकारीच ठरते आहे, हे सत्य त्यांनी गव्हर्नरला कळविलेच आणि निर्भीडपणे कायदे मंडळातही मांडून सत्याग्रहाच्या यशात भर घातली. भुलाभाई देसाईंना गांधीजींच्या मार्गावर नेण्यास मुन्शीही कारणीभूत ठरले. लोकनेते म्हणून मुन्शी यांनी दांडीयात्रेनंतर मुंबईच्या चौपाटीवरही मिठाचा सत्याग्रह घडवून आणला, त्यापायी तुरुंगवासही भोगला. १९४२च्या चळवळीआधी एकंदर दोनदा ते कारावासात गेले. ‘भारतीय विद्याभवन’ या संस्थेची स्थापना १९३९च्या नोव्हेंबरात करून त्यांनी शिक्षणात इंग्रजी आणि भारतीय या दोन्ही संस्कृतींच्या उच्च मूल्यांचा मिलाफ घडविण्याचे दार खुले केले. खेरीज, ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’च्या वाढीसाठी कायमस्वरूपी सरकारी निधी मिळावा, ही कल्पना मुन्शींनी मांडली. स्वातंत्र्याच्या उष:काली घटना समितीत त्यांचा समावेश होता. विधिज्ञ म्हणून पुढे या घटना समितीतील चर्चाचे खंड भूसंपादित करण्याचे महत्कार्य मुन्शींनी केलेले आहे. हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून विलीनीकरणाची बोलणी करण्यासाठी मुन्शींचीच नेमणूक झाली आणि पुढे केंद्रीय मंत्रिपदही मिळाले. शेती व अन्नमंत्री म्हणून बिहारमधील दुष्काळ निवारण्याचे काम करताना त्यांच्या निर्णयक्षमतेची चुणूक दिसली.
हे सारे चरित्र-तपशील, चित्रकथा पद्धतीने सांगितले गेल्यामुळे सुरस झाले आहेत. अर्थात, चित्रकथेचा जो ढांचा ‘अमर चित्रकथा’ या मालिकेने तयार केला, तो त्या मालिकेबाहेर आणि ‘भारतीय विद्याभवना’तर्फे निघालेल्या या पुस्तकानेही कायमच राखला आहे. त्यामुळेच मुन्शी यांचे बालपण, आईचे संस्कार, वडिलांचे आजारपण, आपल्या वडिलांचा अपमान ब्रिटिश अधिकाऱ्याने केला म्हणून छोटय़ा कनूला (कन्हय्यालाल) वाईट वाटणे, हे भागही विस्ताराने आलेले आहेत. वडिलांनी दिलेले ‘थ्री मस्केटियर्स’ हे पुस्तक नोकराकरवी हातात पडताच, मित्रासह क्रिकेट खेळण्याऐवजी कनू ते पुस्तक वाचत बसतो आणि मित्राशी क्रिकेट खेळण्याकामी नोकराला लावून देतो, हा भाग तर रंजकच आहे. आई कनूला पुराणांतल्या गोष्टी सांगते, हा संस्कार महर्षी दयानंद सरस्वती, योगी अरविंद घोष यांच्या शिकवणींचे आकर्षण किशोरवयीन कन्हय्यालालला वाटण्यापर्यंत पुढे जातो.. हे सारे संवादांमधून, प्रसंगाप्रसंगानेच वाचकाला कळत राहते.
मोठय़ांनी आणि मुलांनीही वाचावे, अशी दुहेरी सुलभता या पुस्तकाने टिकवली आहे. तपशिलांत पक्के असल्याने आणि मुख्य म्हणजे कन्हय्यालाल यांच्या जीवनातील अनेक विसंगतीपूर्ण वाटणाऱ्या घटनांची संगती लावून दाखवल्याने हे पुस्तक लहानपणी आणि मोठेपणी वाचताना निरनिराळे कळेल! उदाहरणार्थ, आपले नायक कनुभाई हे (घरभाडय़ाचे पैसे सुटतात म्हणून) टोपणनावाने कादंबरीकार झालेले आहेत, ती पहिली कादंबरी सामाजिक. परंतु गुजरातच्या चालुक्यकालीन इतिहासाची महती सांगणारे त्यांचे कादंबरीत्रय मात्र नायकाचे नैतिक अध:पतनही मांडणारी आहे. त्याबद्दल टीका झाली असता मुन्शी म्हणतात, ‘लेखक म्हणून जीवनाच्या सर्व बाजू दाखवणे हे माझे कर्तव्यच आहे.. सत्य-आनंद आणि सौंदर्य ही माझी मूल्ये पाळूनच मी ते चित्रण केले आहे.’ हीच मूल्ये रुजवण्यासाठी पुढे मुन्शी झटले, त्याचसाठी शैक्षणिक संस्थांना त्यांनी प्राधान्य दिले, हा इतिहास आहे.
चित्रांमधून गोष्ट सांगण्याची पद्धत नायकाचा चेहरा, त्यावरील भाव सतत दाखवणारी असल्याने वाचकाला नायक जणू अधिक जवळून कळतो. या ६४ पानी चित्रचरित्रातील मुन्शींकडे नीट पाहत राहिल्यास लक्षात येते की, विचारीपणा हा या नायकाचा स्थायीभाव आहे. उत्सुक, प्रयत्नशील आणि काहीसे कष्टमय तारुण्य, तत्त्वनिष्ठ प्रौढत्व आणि पितृतुल्यच नव्हे तर गुरुतुल्य उतारवय या तिन्ही अवस्थांत हा विचारीपणा दिसतो. पहिल्या पत्नीचा मृत्यू होतो, त्या एकाच प्रसंगात मुन्शी भावनिक गर्तेत गेलेले दिसतात. पुढे लेखिका लीलावती सेठ यांच्याशी त्यांचा विवाह होतो, त्यानंतरच्या चित्रांतून वाचकाच्या लक्षात येते की, पहिल्या पत्नीच्या सेवाभावाचा आदरच करणारे कनुभाई, लीलाबेनशी अधिक मोकळेपणाने- समान बौद्धिक पातळीवरून बोलत आहेत. अर्थात, एका ठिकाणी मात्र प्रौढ वाचकाला कुतूहलयुक्त संशयाचा ठसकाच लागावा- हैदराबादेत मुन्शी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून असताना, तेथेच ‘पोलीस अॅक्शन’ सुरू झाली हे त्यांना फक्त रेडिओवरून कळले की काय? या शंकेचा हा ठसका, इतिहास ‘चित्रित’ करण्याच्या पद्धतीचा दोषही असू शकेल.  
तरुणपणी मुन्शी यांनी इंग्रजी सुधारण्यासाठी- उच्चारसुधारणेसाठी कसून मेहनत घेतली, त्याचे ‘चित्रण’ या पुस्तकात आहेच; मात्र ‘आपली सांस्कृतिक पाळेमुळे भक्कम ठेवलीत, तर पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाची भीती उरणार नाही’ ही मुन्शी यांची दृष्टी पुढे भारतीय विद्याभवनाच्या स्थापनेतून कशी संस्थारूप झाली, याचे चित्रण खरोखरच परिणामकारक ठरले आहे. मुन्शी यांच्यासारख्या वैचारिक नेत्यांचा अभाव आज असताना, त्यामुळे संस्कृती आणि आक्रमण यांसारख्या शब्दांचे अर्थ कुणीही ठरवू शकत असताना मुन्शी यांची ही शिकवण लक्षात राहणारी आहे. ‘कुलपती मुन्शी’ ही कन्हय्यालाल मुन्शी यांची ओळख ‘महात्मा’ गांधी किंवा ‘सरदार’ पटेलांप्रमाणेच ठसावी अशा अजेंडय़ाची शंका पुस्तकाच्या नावातून येते; परंतु हे पुस्तक ‘गोष्ट सांगण्या’च्या हेतूशी प्रामाणिक राहिल्यामुळे मुन्शी यांचे अनेक पैलू कळतात आणि त्यांचे ‘कुलपती’त्व कशामुळे घडले, हेही उमगते.

कुलपती मुन्शी – पिक्टोरिअल बायोग्राफी,
लेखन/ संशोधन : लुई फर्नाडिस व सुब्बा राव,
चित्रे : दुर्गेश वेल्हाळ,
कलानिर्देशन : गजू तायडे,
प्रकाशक : भारतीय विद्याभवन, मुंबई,
पाने : ६४, किंमत : १०० रुपये.