News Flash

चैतन्य चिंतन १०७. बदल चैतन्य प्रेम

माझ्या जीवनात हवं तर संकटं येऊ द्या, पण जग संकटमुक्त झालं पाहिजे, असं मला वाटूच शकत नाही. याचाच अर्थ माझं जग आणि जगाकडे पाहाण्याची माझी

| May 31, 2013 12:50 pm

माझ्या जीवनात हवं तर संकटं येऊ द्या, पण जग संकटमुक्त झालं पाहिजे, असं मला वाटूच शकत नाही. याचाच अर्थ माझं जग आणि जगाकडे पाहाण्याची माझी दृष्टी ही स्वकेंद्रित आहे. या विराट जगाचा केंद्रबिंदू ‘मी’च आहे. ज्या जगात मी नाही आणि जे जग माझं नाही, त्या जगातल्या सुखदुखांशी माझं काहीच देणंघेणं नाही. माझ्याशिवायच्या जगाची मी कल्पनादेखील करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही. मग या अव्यवस्थित, बेजबाबदार, वाईट अशा जगाचा जो केंद्रबिंदू ‘मी’ आहे त्या ‘मी’च्या अव्यवस्थित, बेजबाबदार आणि वाईटपणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? जग कितीही व्यवस्थित असलं पण माझं जगणंच अव्यवस्थित असलं, तर काय उपयोग? जग कितीही सुंदर असू द्या, माझं जगणं कुरूप असलं तर काय उपयोग? जग कितीही आनंदी असू द्या, पण माझं जगणं दुखानं भरलं असलं तर काय उपयोग? आजारी माणसाला सगळं जगच निस्तेज, उमेद गमावलेलं वाटतं. आजारपणामुळे माझ्या जिभेची रूचीग्राहकशक्ती ओसरल्याने प्रत्येक पदार्थ मला बेचव किंवा विचित्र चवीचा भासतो. अगदी त्याचप्रमाणे हे जग मला वाईट दिसतं कारण माझ्या अंतरंगातूनही वाईटपणा ओसंडून वाहात आहे. आता भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं, फसवेगिरी-लबाडीची प्रकरणं ही घडत आहेतच. ती मी वाईट आहे म्हणून तशी भासत आहेत, असे नव्हे. ती तशीच आहेत. पण जगाला बदलणं, जगाला सुधारणं, जगाला दुखमुक्त करणं, जगाला तणामुक्त करणं माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही. पण मला स्वतला बदलण्याचा, मला सुधारण्याचा, मला दुखमुक्त करण्याचा, मला तणावमुक्त करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू करणं हे माझ्या हातात नक्कीच आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांनीही एके ठिकाणी म्हटलं आहे की, गावात थंडी पसरली तर त्यावर पहिला उपाय म्हणजे मी स्वत: गरम कपडे घालणं! कुडकुडत असतानाच स्वत: स्वेटर घालण्याऐवजी मी गावाला थंडीमुक्त करण्यासाठी धडपडणार नाही. तेव्हा मी स्वतला सुधारलं पाहिजे, मी आधी दुखमुक्त झालं पाहिजे, मी आधी तणावमुक्त झालं पाहिजे. असं असूनही मी त्यासाठी राजी नसतो. मी एकटा चांगला झाल्याने जग चांगलं होईल कशावरून, असा प्रश्न मी विचारतो कारण मला स्वतला चांगलं होण्याचे प्रयत्न करण्याची इच्छा नाही. स्वतला सुधारण्याचे प्रयत्न करण्याची इच्छा नाही. ते केल्याशिवाय त्याचा लाभ कसा उमगणार? श्रीमहाराजांच्या वाणीरूप अवतारातली गोष्ट आहे. स्वातंत्र्य आंदोलन जोरात होते. श्रीमहाराज एका गावी गेले होते तिथे श्रीमहाराजांनी साधकाने स्वतला प्रथम स्वतंत्र करावे, याबाबतचे विचार मांडले आणि मौनाचे महत्त्वही सांगितले. एका तरुणाने काहीशा गुश्शातच विचारले की मौन पाळून स्वातंत्र्य मिळते थोडीच? श्रीमहाराजांनी त्यांना सांगितले, निदान वर्षभर आपण आपल्यापुरता मौनाचा नियम का पळत नाही? त्यानंही तसा शब्द दिला. वर्षभरानं श्रीमहाराज त्या गावी गेले तेव्हा त्यानं आतुर भावानं श्रीमहाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हणाला, मी अनेक गोष्टींपासून स्वतंत्र झालो  आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:50 pm

Web Title: caitanya chintan 107 changes chaitanya prem
Next Stories
1 १०६. जग आणि मी
2 १०५. शक्तीची हांव
3 १०४. सात्त्विक अहंकार