‘दुसऱ्या महायुद्धाने मानवी अस्तित्वालाच आव्हान दिले’ वगैरे वाक्यांचा अर्थ कळतो, पण पोहोचतोच असे नाही. मग एखाद्या नव्या हिंदी चित्रपटातील ‘हम है कि नहीं है’ हा संवादसुद्धा आजच्या संवेदनशील मराठीजनांना, महायुद्धाबद्दलच्या त्या सत्यापेक्षा अधिक भिडतो. इतिहास हा निव्वळ अर्थहीन तपशिलांचा गतकाळ भासू नये, यासाठी ऐतिहासिक घडामोडींची तात्त्विक उमज आवश्यक असते. ती आपणा सामान्यजनांना असतेच, असे नाही. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास अगदी बालपणीच जगलेले, वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपून जर्मनीहून अमेरिकेला यावे लागलेले बर्न्ड मॅग्नस यांनी पुढे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून जे काम केले, ते दुसऱ्या महायुद्धाबद्दलची ही उमज तत्त्वज्ञानाच्या आधारे वाढविणारे ठरले आहे. मॅग्नस  यांचे निधन ३० ऑक्टोबर रोजी झाल्याची बातमी अमेरिकी माध्यमांतही उशिराने पोहोचली, तरी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी कोणताही दिवस पुरेसा आहे.
फ्रेडरिक नीत्शे (१८४४-१९००) या तत्त्वज्ञाने मरणाची तात्त्विक मीमांसा पुढे नेली होती. ‘देव मेला आहे’ (गॉड इज डेड) आणि मानवी मरण ‘देवाच्या इच्छे’वर कसे अवलंबून नाही, अशी ठाम मांडणी त्याने केली. त्याआधीच्या हेगेल वा अन्य कोणत्याही जर्मन तत्त्वज्ञापेक्षा, नव्या ईश्वरहीन तत्त्वज्ञानाची दिशा दाखवणारा नीत्शे दुसऱ्या महायुद्धानंतरच अनेकांना महत्त्वाचा वाटू लागला होता. या नीत्शेचा सर्वागीण अभ्यास, हे जणू प्रा. मॅग्नस  यांचे जीवनध्येय ठरले. दुसऱ्या महायुद्धास कारण ठरलेल्या हिटलरी नरसंहारामागच्या प्रेरणा आणि या संहारानंतरची मानवी जीवनविषयक तत्त्वधारणा समजून घेण्यासाठी, म्हणजेच ‘मानवी अस्तित्वालाच आव्हान’ कसे मिळाले/ का मिळते याची उमज वाढवण्यासाठी प्रा. मॅग्नस यांची पुस्तके महत्त्वाची ठरली. ‘केम्ब्रिज कम्पॅनियन टु नीत्शे’ व ‘समग्र नीत्शे’ या ग्रंथांचे सहसंपादन त्यांनी केलेच, परंतु युद्धोत्तर अस्तित्ववादी साहित्याचाही अभ्यास त्यांनी केला व जीवनविषयक चिंतनाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांतील साम्यभेदांवर पुस्तक लिहिले. नीत्शेचा आधार ज्या ‘पोस्टमॉडर्न’ (उत्तराधुनिक) तत्त्ववेत्त्यांनी घेतला होता त्यांचा, आणि त्याआधीच्या मार्क्‍स, हायडेग्गर यांचाही अभ्यास प्रा. मॅग्नस यांच्या लिखाणातून दिसतो. कोणत्याही एका ‘स्कूल’चा- किंवा तत्त्वज्ञान प्रवाहाचा आधार नाकारून विविधांगांनी थेट नीत्शेलाच पुनपुन्हा भिडण्याचे भान त्यांनी कायम राखले होते.
कॅलिफोर्निया- रिव्हरसाइड विद्यापीठात १९६९ पासून अध्यापन करणारे प्रा. मॅग्नस  पुढे विभागप्रमुख झाले. त्यांनी अमेरिकेत नीत्शे अभ्यासमंडळही स्थापले. खेळांत रस आणि गती असणाऱ्या या अभ्यासकाला जगण्यात रस होता.. आणि तत्त्वज्ञानातही.. मग ते तत्त्वज्ञान मरणाचे का असेना!