News Flash

परंपरेतील ‘नवता’..

सोमवारची संध्याकाळ.. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांची बकिंगहॅम राजवाडय़ाच्या परिसरात पखरण सुरू झाली. चार वाजून चोवीस मिनिटांच्या ‘मुहूर्ता’वर इंग्लंडच्या राजघराण्याचा,

| July 24, 2013 05:55 am

सोमवारची संध्याकाळ.. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांची बकिंगहॅम राजवाडय़ाच्या परिसरात पखरण सुरू झाली. चार वाजून चोवीस मिनिटांच्या ‘मुहूर्ता’वर इंग्लंडच्या राजघराण्याचा, केंब्रिजच्या गादीचा गेल्या १९० वर्षांच्या इतिहासातील तिसरा राजकुमार जन्माला आला देशाने राजेशाही परंपरेला साजेशा अभूतपूर्व उत्साहात भावी राजाच्या आगमनाचा जल्लोष सुरू केला. बाळाच्या जन्माची बातमी कानात साठविण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसबाहेर जमलेल्या रयतेला आणि प्रसारमाध्यमांना अधिकृतपणे हे वृत्त कळविले गेले आणि अवघे इंग्लंड आनंदात न्हाऊन निघाले. युवराज विल्यम आणि त्याची पत्नी कॅथरिन यांना पुत्ररत्न झाले.. प्रिन्स चार्ल्स ‘आजोबा’ झाले. या बातमीसाठी तब्बल बारा तास ताटकळलेल्या माध्यमांनी त्याच क्षणी अवघ्या जगाला ही बातमी कळविली. इंग्लंडमध्ये फुललेली आनंदाची कारंजी तर थेट मुंबईच्या ग्रँटरोडमधील नवयुगच्या गल्लीपर्यंत येऊन थडकली. भारतावर दीडशे वर्षांची सत्ता गाजविलेल्या इंग्लंडच्या राजपुत्राने ‘मॅनेजमेंट गुरू’ ही पदवी देऊन गौरविलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी याच युवराज विल्यम आणि कॅथरिनच्या शाही विवाह सोहळ्यालाही हजेरी लावली होती. या जोडप्याला पुत्ररत्न झाल्याची बातमी कळताच डबेवाल्यांनाही इंग्लंडच्या जनतेइतकाच आनंद होणे साहजिकही होते. आपण पुराणकथेच्या आधारावर, चैत्रमासीच्या शुद्ध नवमीच्या मुहूर्तावर रामजन्माचे सोहळे परंपरागतपणे साजरे करतो आहोत. चैत्रातील कोणत्याही भर दुपारी, रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते, पण रामजन्माच्या मुहूर्ताचे वारे मात्र सुगंधाची पखरण करत जनतेची मने प्रफुल्लित करत वाहत होते आणि अवघी अयोध्यानगरी रामजन्माच्या जल्लोषात बुडून गेली होती. तसाच काहीसा अनुभव इंग्लंडच्या राजघराण्याच्या भावी राजाच्या जन्मकथेने जगभर आणि नवयुगच्या गल्लीतही जल्लोष साजरा करणाऱ्या डबेवाल्यांना येत असावा. जुलैच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, भावी राजाच्या जन्माची बातमी कर्णसंपुटात साठविण्यासाठी अशीच गर्दी झाली होती. इंग्लंडातल्या त्या शाही विवाह सोहळ्याच्या आठवणींचा आणि तेथील पाहुणचारात चिंब भिजल्याच्या अनुभवाचा थरार अजूनही इथे ग्रँटरोडच्या गल्लीत जिवंत असेल, तर अवघ्या इंग्लंडमध्ये राजघराण्याच्या या पुत्रजन्माचा रयतेला अत्यानंद होणे हेही साहजिकच आहे. राजघराण्यांची परंपरा भारतात इतिहासजमा झाली आहे.  पण ज्या इंग्लंडकडून भारताने संसदीय लोकशाहीचा वारसा घेतला, त्या इंग्लंडमध्ये मात्र राजेशाही परंपरेशी रयतेची नाळ अजूनही घट्ट जुळलेली आहे. तसेच या राजघराण्याला आजही पुरोगामी जगात इतिहासाइतकीच प्रतिष्ठा आहे, हे राजघराण्याच्या नव्या वारसाच्या जन्मसोहळ्याने सिद्ध केले. परंपरा आणि नवता यांचा हा संगम ब्रिटनमध्येच भाग्यवंत ठरतो.  ब्रिटनच्या राजघराण्याचा हा नवा वारस आपल्यासोबत इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेची संजीवनी घेऊन आला आहे, असेही काही जण मानतात. तेथील जनता आता आनंदाच्या अत्युच्च शिखरावर विहरते आहे. या आनंदाच्या भरात खरेदीला बहर येईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. राजघराण्यातील ही घटना देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देत असेल, तर पैशाच्या उधळपट्टीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या संवेदनशील मनांना थारा मिळणारच नाही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 5:55 am

Web Title: celebration of the birth of the royal baby boy
Next Stories
1 गेले सरकार कुणीकडे?
2 जागल्यांची दयनीयता
3 इतिहास आणि दंतकथा
Just Now!
X