विद्यार्थिदशेपासून हयातभर भाजपसाठी कार्यरत असलेले तेलंगणातील ज्येष्ठ नेते चेन्नमणी विद्यासागर राव हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तिसरे तेलुगु भाषक नेते आहेत. याआधी कासू ब्रह्मानंद रेड्डी आणि कोना प्रभाकर राव या तेलुगु राजकीय नेत्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
करीमनगर जिल्ह्य़ातील नागराम खेडय़ातील श्रीनिवास राव आणि चंद्रम्मा यांचे अपत्य असलेल्या सी. व्ही. राव यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९४२ चा. ते उस्मानिया विद्यापीठात १९७२ मध्ये कायद्याचे         शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. शिक्षण झाल्यावर ते जनसंघात गेले. त्यांना आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ कायद्याखाली स्थानबद्धही करण्यात आले होते. ‘सागरजी’ या नावाने ओळखले जाणारे सी.व्ही. राव हे त्यानंतरच्या काळात राजकारणात अधिक सक्रिय झाले. आंध्र प्रदेशमधील मेटपल्ली विधानसभेतून १९८५, ८९ आणि ९४ या तीन निवडणुकांमध्ये ते निवडून आले. सभागृह नेता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. ते १९९८ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. त्यानंतर राव हे १९९८ व ९९ मध्ये करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात १९९९ ते २००४ या दरम्यान राव यांच्यावर गृह आणि वाणिज्य या महत्त्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती; पण त्यांचा पुतण्या आणि के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस)चे उमेदवार चेन्नमणी रमेश यांनीच त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. नुकतीच झालेली २०१४ ची लोकसभा निवडणूकही ते हरले. ते निवडणूकजिंकले असते, तर कदाचित आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला असता; पण गेली अनेक वर्षे भाजपचे कार्य केलेल्या राव यांना महाराष्ट्रासारख्या देशातील महत्त्वाच्या व मोठय़ा राज्याचे राज्यपालपद पक्षाने दिले आहे.
 राव यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद तसे नामधारी असले तरी निवडणुका झाल्यावर सत्ता स्थापन होईपर्यंत ते महत्त्वाचे असते. एखाद्या राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले, तर राज्यपालांसाठी कोणतीही अडचण नसते; पण त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत राज्यपालांची भूमिका ही महत्त्वाची ठरत असते. कोणत्याही राजकीय  पक्षाला झुकते माप न देण्याची तसेच पदाच्या गौरवाला राजकीय अभिनिवेशाची झळ लागू न देण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. त्या कसोटीला राव हे निश्चित उतरतील, ही अपेक्षा.