News Flash

चैतन्य चिंतन १५८. महात्यागी

सद्गुरूंकडे जाऊन खरं शिकायचं ते भगवंताचं प्रेम. ते सोडून आपण आपल्या भौतिकाचं प्रेमच वाढवायला त्या सहवासाचा कसा उपयोग करून घेता येईल

| August 12, 2013 01:00 am

सद्गुरूंकडे जाऊन खरं शिकायचं ते भगवंताचं प्रेम. ते सोडून आपण आपल्या भौतिकाचं प्रेमच वाढवायला त्या सहवासाचा कसा उपयोग करून घेता येईल, याचा विचार करतो. एवढय़ावरच आपण थांबत नाही तर भौतिकाच्या त्या प्रेमात त्यांनाही ओढू पाहतो! एकदा रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक धनिक गेला आणि त्यानं रामकृष्णांना दहा हजार रुपये दिले. लक्षात घ्या, शंभरेक वर्षांपूर्वी दहा हजार म्हणजे लाखो रुपयांच्या मोलाचे होते. माणसाला सवय असते की एखाद्याला भरभरून पैसा दिला की त्या माणसाला अंकित करता येतं. मग त्याला आपल्या तालावर नाचवता येतं. एकदा बुवांनी लाखो रुपये घेतले की मग आपल्या लाखाचे कोटी कसे होतील, याचा भारही त्याच्यावरच टाकता येतो! तर या धनिकानं इतकी मोठी रक्कम दिली. रामकृष्ण हसले आणि पैसे परत करीत म्हणाले, एवढा पैसा घेऊन काय करायचं आहे? मला त्याची गरज नाही आणि इकडे तो सुरक्षितही राहाणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच तो घ्या. धनिकाला हा अनुभव नवाच होता. त्यानं अनेकवार गळ घालून पाहिली पण रामकृष्ण बधले नाहीत. धनिक भारावून म्हणाला, ‘‘परमहंसजी तुम्ही त्यागी आहात.’’ परमहंस ताडकन म्हणाले, ‘‘मी त्यागी आहे पण तुम्ही तर महात्यागी आहात हो!’’ स्तुतीनं कोणता प्रापंचिक सुखावणार नाही? तो धनिक अधिकच भारावून म्हणाला, ‘‘मी महात्यागी कसा काय?’’ परमहंस म्हणाले, ‘‘काचेचे मणी आणि खरे हिरे यातून काचेच्या मण्यांचा त्याग कुणीही करील हो. पण जो हिऱ्यांचा त्याग करून काचेचे मणी जवळ ठेवतो, तो महात्यागीच नव्हे का? मी भगवंतासमोर क्षुद्र भौतिकाचा त्याग करतो तो महात्याग नव्हेच. तुम्ही क्षुद्र भौतिकाला जवळ करता आणि भगवंताचा त्याग करता, हा खरा त्याग झाला!’’ तेव्हा सद्गुरूंजवळ जाऊन शिकायचा आहे तो भौतिकाच्या आसक्तीचा त्याग. हा त्याग मानसिक आहे. मनानंच करायचा आहे. प्रारब्धानुसार जे भौतिक वाटय़ाला आलं आहे आणि त्यात जी कर्तव्यं आहेत ती पार पाडायचीच आहेत. मी समजा गरीब परिस्थितीत जन्मलो असेन तर ती परिस्थिती स्वप्रयत्नाने आणि स्वक्षमतेच्या जोरावर बदलण्याचा प्रयत्न मी करण्यात काहीच गैर नाही. मी जर श्रीमंत म्हणूनच जन्मलो असेन तर त्या श्रीमंतीत भर घालण्याचा प्रयत्नही स्वत:च्या जोरावर करण्यात काहीच गैर नाही. पण मी कोणत्याही परिस्थितीत जन्मलो असलो तरी आणि माझ्या जीवनात ती परिस्थिती मी कितीही पालटली तरी जीवन संपताच ती परिस्थितीही संपणार आहे. माझा पुढचा जन्म नव्या परिस्थितीत होणार आहे, हे मी लक्षात घेतलं तर खरी प्राप्ती त्या परिस्थितीपलीकडची असली पाहिजे, हे लक्षात येईल. भौतिकाचा, परिस्थितीचा आसक्तीपायी माझ्या मनावर जो पगडा आहे त्या आसक्तीचा त्याग साधणे हीच ती खरी प्राप्ती आहे. त्या आसक्तीचा त्याग झाला की तो पगडाही उरणार नाही. तेव्हा सद्गुरूंकडून मिळवायची ती या आसक्तीच्या त्यागाची कला. ती अशीतशी शिकता येणार नाही. त्यासाठी ‘नारायणे दिला वसतीस ठाव’नंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे, ठेवूनियां भाव ठेलों पायीं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:00 am

Web Title: chaitanya chintan 158 great self denying
टॅग : Chaitanya Chintan
Next Stories
1 चैतन्य चिंतन १५७. खरा लाभ
2 १५६. नारायण
3 १५५. मरण
Just Now!
X