News Flash

चैतन्य चिंतन १६२. साधनांचा राजा

श्रीसद्गुरूंचा खरा सहवास, खरा समागम साधला तरच परमार्थ साधेल. श्रीगोंदवलेकर महाराज तर सत्समागमाला सर्व साधनांचा राजाच मानतात.

| August 19, 2013 01:01 am

श्रीसद्गुरूंचा खरा सहवास, खरा समागम साधला तरच परमार्थ साधेल. श्रीगोंदवलेकर महाराज तर सत्समागमाला सर्व साधनांचा राजाच मानतात. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा होय’’ (प्रवचन, २२ एप्रिल). माणसाचा जन्म मिळाला आणि खऱ्या सद््गुरूंचीही भेट झाली पण त्यांना ओळखता आलं नाही तरी काही उपयोग नाही. इथे ओळख ही बाह्य़ नाही, देहाची नाही. ती आंतरिक आहे. बरं, ओळख झाली पण त्यांच्या विचारांचा सहवास अर्थात त्यांच्या बोधानुरूप आचरण साधले नाही, तरी काही उपयोग नाही. माणसाच्या जन्माला येऊन खऱ्या सद्गुरूची भेट झाली आणि त्यांच्या बोधानुरूप आचरणही सुरू झालं तर आणखी काही साधन करायला नको, हेच सर्वोच्च साधन आहे. आता हे सर्वोच्च साधन का आहे? त्याचं कारण श्रीमहाराज सांगतात ते म्हणजे- ‘‘काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते?’’ (प्रवचन, २२ एप्रिल). सत्समागमानं काय साधतं? तर मागण्याची इच्छाच नष्ट होते! खरं पाहाता शिर्डीत जेव्हा साईबाबा होते, शेगावी जेव्हा गजाननमहाराज होते, गोंदवल्यास महाराज होते तेव्हा ते कसे राहात होते? शेकडो लोकांना ते आधार देत होते, पण बाहेरून पाहता त्यांची राहणी अगदी साधी होती. अशा साध्यासुध्या सत्पुरुषाकडे भौतिकात भर घालण्याची मागणी करण्यासाठी आपण प्रथम जात असतो. प्रत्यक्षात भौतिकाच्या विकासाचा आपला अनुभव दांडगाच असतो. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो.’’ देहसुखाचे मार्ग आपल्याला अधिक माहीत असताना आपण सत्पुरुषांकडे देहसुखाच्या साधनांमध्ये भर घालण्यासाठीच जात असतो. हळुहळू असं होतं की आपल्या सर्वच मागण्यांची पूर्ती ते करीत नाहीत, हे कळून चुकतं! मागणी करून करून आपण थकतो आणि मग ते काय सांगतात, इकडे थोडं लक्ष देऊ लागतो. त्यांच्या बोलण्याचा, वावरण्याचा प्रभाव मनात खोलवर उमटू लागतो. भौतिकाचं आपलं रडगाणं कमी झालं असलं तरी संपलं मात्र नसतं. सत्पुरुष कशासाठी आपल्याला जवळ घेतात? त्यांचा हेतू काय असतो? त्यांची इच्छा काय असते? श्रीमहाराज सांगतात, ‘‘देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून देण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संतसंगतीचा परिणाम आहे ’’(प्रवचन, २२ एप्रिल). तेव्हा जो मला निर्विषय करतो तो खरा सत्संग आहे. तो खरा समागम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:01 am

Web Title: chaitanya chintan 162 king of sources
टॅग : Chaitanya Chintan
Next Stories
1 १६१. खरा समागम
2 १६०. निजज्ञान
3 १५९. भाव आणि कृती
Just Now!
X