नामातच आम्हाला तळमळ वाटत नाही, मग कोरडेपणानं होणाऱ्या त्या नामानं भगवंताची तळमळ तरी कशी निर्माण होणार, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यावर उपाय एकच नाम घेत राहाणं! त्यातूनच तळमळीची प्रक्रिया नकळत सुरू होईल. आता हे कसं शक्य आहे? यासाठी आपण अगदी मुळापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे. हा मूळ मुद्दा म्हणजे, आपण या मार्गाकडे का आलो? आपण उपासना का करतो? आपण नाम का घेतो? आपण या मर्गाकडे का आलो, यामागचा आपला अत्यंत सूक्ष्म व सुप्त हेतू आपण कधीच तपासत नाही. अध्यात्माच्या या मार्गाकडे येण्यामागचं कारण म्हणून आपण ‘परमात्म्याचं दर्शन व्हावं’, ‘आत्मकल्याण व्हावं’, ‘आत्मसाक्षात्कार व्हावा’ यापैकी एखादं कारण वरकरणी पटकन् सांगतो. परमात्मा म्हणजे काय, आत्मकल्याण म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, याचं आपल्याला यथायोग्य आकलन असतंच असं नाही. तरी अगदी अधिक नेमकेपणानं सांगायचं तर या मार्गाकडे येण्यामागचा आपला हेतू एकच असतो तो म्हणजे परमात्म्याची कृपा व्हावी, श्रीमहाराजांची कृपा व्हावी.  आमच्या मनातली ती कृपा तरी नेमकी कशा प्रकारची आहे? तर भौतिक सांभाळलं जाऊन परमात्म्याचं दर्शन घडविणारी कृपा आम्हाला अभिप्रेत आहे. आपण बोलून दाखविणार नाही, पण भौतिकाचं वाटोळं करून परमात्म्याचं दर्शन होण्यात आपल्याला खरा रस नाही. त्याची आपल्याला धास्तीच वाटेल. बरं, मग ती कृपा जशी भौतिक सांभाळलं जाऊन साधायची आहे तसंच त्याच कृपेनं त्यानंतरही अखंड भौतिक सांभाळलं जावं, अशीही आमची इच्छा आहे. भौतिक सांभाळलं जाण्याची आम्हाला एवढी चिंता तरी का आहे? कारण आज जगताना दु:खाचे अनेक प्रसंग आम्ही झेलत आहोत. इथे ‘दु:ख’ म्हणजेसुद्धा काय? तर, सुखोपभोगामध्ये येणारी अडचण हेच आमच्यामते खरे दु:ख आहे. तर व्यक्ती आणि परिस्थिती मनाजोगती राहिली नाही की आमच्या वाटय़ाला दु:ख येतं आणि ते दु:खं टळावं यासाठी आम्हाला परमात्म्याला आपलासा करून घ्यायचा आहे. थोडक्यात परमात्मा आपलासा झाला तर व्यक्ती आणि परिस्थिती आपल्याच मनासारखी होईल, असाही आपला समज आहे. पू. बाबा बेलसरे यांनी या अवस्थेविषयी म्हटलं होतं की, ‘राम भेटावा, अशी ओढ होती. राम भेटला म्हणजे एकदाची कटकट मिटेल, असं वाटत होतं. आता राम भेटणं म्हणजे काय आणि कटकट मिटणं म्हणजे काय, हे माहीत नव्हतं!’ तेव्हा आम्ही परमार्थ करतो, साधना करतो, नाम घेतो, उपासना करतो ते सारं काही भौतिकाच्याच ओढीतून असतं. तळमळ भौतिकाचीच असते. उपासना ही त्या भौतिकाच्या पूर्तीसाठीच्या उपायासारखी असते. आपण तसं बोलत मात्र नाही. इंदूरला भय्यासाहेब मोडक म्हणून एक धनवंत होते. श्रीगोंदवलेकर महाराजांना ते फार मानत. महाराजांनी त्यांना विचारलं, ‘‘भय्यासाहेब तुम्हाला प्रपंच पाहिजे की परमार्थ?’’ आपल्याशीच विचार करा. महाराज जणू हा प्रश्न आपल्याला करीत आहेत. आपलं उत्तर काय असेल?