महाराज माझा संशय फिटला, असं वामनराव म्हणाले तेव्हा हसून श्रीमहाराज म्हणाले, ‘‘विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंताने दिले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल ; किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. विकारांवर आपण सत्ता गाजवून त्यांना वापरायला शिकले पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे. विकारांनी आपल्याला वापरू नये.’’ ही सर्व चर्चा कुठून सुरू झाली? तर ‘मी अवगुणी आहे’ या भावनेनं उपासना सुटून ते अवगुण संपविण्याची जी धडपड सुरू होते त्या मुद्दय़ापासून. ही जी तपशीलवार चर्चा सुरू आहे तिला आधार आहे तो एका बोधवचनाचा. त्या बोधवचनाचे तीन भाग आपण पाडले आहेत. त्यातील ‘प्रथम नेम पाहिजे पण फार नेम करू नये’ हा पाया आपण पाहिला आणि ‘प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो’ हा या वाक्याचा मध्य आपण पाहात आहोत आणि ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम’ हा या वाक्याचा कळस आपण पाहणार आहोत. तर विकारांच्या चर्चेचे कारण काय? तर ‘प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो’ हा या बोधवचनातला मध्य! आपल्याला नेम साधत नाही याचं कारण विकार आणि वासनांच्या ओढीमुळे आपलं खरं प्रेम दुनियेवरच आहे. जिथे प्रेम आहे तिथेच चिकटणे, हा मनाचा गुणधर्म आहे. दुनियेवर असलेलं प्रेम, दुनियेत विखुरलेलं प्रेम तेथून गोळा करून ते नेमावर ठेवलं तरच नेम साधेल, असं महाराजांच्या सांगण्याचं तात्पर्य आहे. हे दुनियेत विखुरलेलं प्रेम गोळा करण्याचा जो उद्योग आहे तो प्रपंच आणि परमार्थ या दुपदरी रस्त्याने साधायचा आहे. त्याचा अगदी तपशीलवार मागोवा आपण या बोधवचनाच्या समारोपानंतर घेऊ. हा मध्यच आपल्या या सत्संगाचा गाभा असल्याची नोंद मनात ठेवून आपण या बोधवचनाच्या कळसाकडे वळू. हा कळस म्हणजे ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम’! फार विलक्षण आहे हे वाक्य. श्रीमहाराजांवर म्हणा, भगवंतावर म्हणा पूर्ण प्रेम असलं ना तर मग कोणत्याही उपासनेची गरज नाही, हा त्याचा अर्थ आहे. आता आपणही म्हणू, आमचं महाराजांवर प्रेम आहेच हो! वर्षांतून इतक्या वेळा गोंदवल्याला जातो, इतका जप करतो, त्यांची प्रवचनं पाठ आहेत, प्रसंगाला अनुसरून त्यांची कित्येक वाक्य आठवतात.. हे सर्व प्रेमाचे पुरावे असतीलही पण पूर्णपणे त्यांना समर्पित असं प्रेम काहीतरी विलक्षणच असलं पाहिजे. इथे एक अनुभव सांगितल्यावाचून राहवत नाही. कारण मीदेखील वर म्हटल्याप्रमाणे अनेकदा वारी केल्यामुळे, त्यांच्या चरित्र व प्रवचनांची अनेकवार पारायणे केल्यामुळे आणि त्यांचे चरित्र बरेचसे मुखोद्गत झाल्याच्या भ्रमामुळे महाराजांवर आपलं प्रेम आहे, असं बेलाशक मानत होतोच. पण प्रेम किती निरपेक्ष आणि शुद्ध असतं आणि त्या प्रेमासाठी हृदयातल्या तळमळीशिवाय दुसरं काहीच कसं लागत नाही, याची झलक मिळाली तीसुद्धा एका बकालशा वस्तीतील चहाच्या टपरीत!