श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘इतर गोष्टी तात्पुरतं सुख देतात पण समाधान देत नाहीत.’’ यामागचं रहस्य काय असावं? हे वाक्य उकलण्यासाठी श्रीमहाराजांच्याच दुसऱ्या वाक्याकडे पाहू. महाराज म्हणतात, ‘‘कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो.’’ आज आपल्या जगण्याकडे पाहिलं तर काय दिसतं? देहाला सुख देणारी साधनं आहेत तोवर मी सुख अनुभवतो. वीज आहे, त्यामुळे पंखा चालू आहे तोवर मला जाणवत नाही. वीज जाते, पंखा बंद पडतो मग उकाडय़ाचं दुख सुरू होतं. जी व्यक्ती सुखाचं कारण वाटते ती आहे तोवर माझं सुखही टिकतं. जी वस्तू सुखाचं कारण वाटते ती आहे तोवर सुख टिकतं. पण महाराज तर सांगतात, इतर म्हणजे भगवंताशिवायच्या इतर सर्व गोष्टी, व्यक्ती, वस्तू या तात्पुरतं सुख देतात. कायमचं समाधान नव्हे. याचं कारण या वस्तू आणि व्यक्तीच मुळात तात्पुरत्या असतात. वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ही काळाच्या आधीन आहे. जी गोष्ट काळाच्या आधीन आहे तिच्यात काळानुसार बदल, घट आणि नाश अटळ आहे. आज मला एखादी गोष्ट सुखकारक भासते. मात्र तिच्यात बदल झाला, तिच्यात घट झाली तर ती सुखकारक भासेल का? नवा दूरचित्रवाणीसंच घेतला. कित्येक दिवस त्याची नवलाई आणि कौतुक टिकेल. काही दिवसांत तो जुना होईल आणि त्याच्यापेक्षा चांगला संच बाजारात येईल. मग आत्ता आहे तो सुखकारक भासणार नाही. आज ज्या गाडीचं कौतुक आहे तीच उद्या जुनी वाटू लागेल. तेव्हा काळाच्या आधीन असलेली प्रत्येक गोष्ट ही बदलते, तिच्यात घट होते आणि म्हणूनच ती सदोदित सुखकारक रहात नाही. त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी की सुख घेणारा ‘मी’देखील काळाच्याच आधीन आहे. त्यामुळे माझ्यातही बदल होतच आहे. त्यामुळे सुखाबद्दलच्या माझ्या कल्पना, अपेक्षा बदलत असतात. बदल आणि घट याप्रमाणेच काळाच्या आधीन असलेल्या वस्तूचा नाशही होतो आणि मग तर सुखाचा आधारही तुटतोच. तेव्हा ज्या गोष्टी तात्पुरत्या असतात त्या कायमचं सुख कशा देतील? तेव्हा प्रपंच मला शाश्वत सुख देणार नाही. हे सारं नकारात्मक आहे, असं समजू नका. प्रपंचाचं खरं स्वरूप काय आहे, ते फक्त आपण पहात आहोत. प्रपंचात सतत बदल होत आहे. प्रपंच हा द्वैतमूलक आहे.  श्रीमहाराज सांगतात, ‘‘द्वैत प्रपंचाचे मूळ आहे. त्याशिवाय प्रपंचच नाही. जेथे दोन तेथे दुख असते. एकात दुख नाही. म्हणून प्रपंचात दुख अटळच आहे’’ (बोधवचने, क्र. १५९). आपल्याला वाटेल प्रपंचात सुखही तर असतंच? मग महाराज असं का सांगतात? थोडा विचार केला की जाणवेल, ज्या ज्या गोष्टींमुळे प्रपंचात आपल्याला सुख मिळतं त्या त्या गोष्टींच्या वियोगाची, अभावाची भीतीही आपल्या मनात येतेच येते. परिस्थितीची अनिश्चितताही आपण अनुभवत असतो. त्यामुळे जे आहे त्यात भर नाही पडली तरी चालेल पण आहे त्यात घट होऊ नये, अशी आपली सुप्त इच्छा असते. प्रपंच द्वैतातूनच उत्पन्न झाला असताना तो मनाजोगता एकसमान स्थितीत टिकावा, अशी आपल्याला आस असते.