लहान मुलांना करमणूक नेहमीच प्रिय असते, तर अनेकदा करमणूक हा मोठय़ांचा केवळ विरंगुळा असतो. मोठय़ांच्या हाती असलेला ‘छोटा वेळ’ हे त्याचे मूळ कारण! एकदा कामाचा रगाडा आणि संसाराचा गाडा ओढायला सुरुवात झाली, की घडय़ाळाचे काटे असे हात धुवून मागे लागतात, की करमणुकीसाठी वेळ काढण्याचे भानच अनेकदा राहत नाही. आजकाल तर करमणुकीच्या साधनांचा एवढा सुळसुळाट झाला आहे, की एखादे साधन मुलांमध्ये लोकप्रिय होऊ पाहत असतानाच दुसरे एखादे साधन हाती येते आणि पहिल्या साधनाची लोकप्रियता हिरावून मुलांना रमवू लागते. अर्थात, करमणूक हा मुलांचा हक्क आहे, आणि त्यासाठी त्यांना वेळ मिळालाच पाहिजे. भविष्याकडे पाहण्याचे कळत नकळत ज्ञानही करमणुकीतून मिळत असते. कळायला लागण्याच्या आतच मोबाइलवरील एखाद्या खेळावर सराईतपणे फिरणारी बोटे पाहून मोठी माणसे अचंबित होतात, हा त्याचाच पुरावा.. एवढय़ा लहान वयात मुलांना करमणुकीच्या माध्यमातून ज्ञान मिळत असेल, तर त्याचे खरे तर कौतुकच करायला हवे. पण करमणूक आणि निवडणूक यांच्यात फरक आहे. आपल्या निवडणूक आयोगाचेही हेच मत असावे. निवडणूक ही समाजाचे भवितव्य घडविण्याचे माध्यम असले, तरी लहान मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या करमणुकीच्या माध्यमापासून हे माध्यम भिन्न आहे. म्हणून, निवडणूक हे मुलांचे करमणुकीचे माध्यम नाही, म्हणजे, मोठय़ांचे विरंगुळ्याचे साधनही नाही. तो गांभीर्याने पाहावा असाच विषय आहे. त्यामुळे मुलांनी यात पडू नये, असे मोठय़ांना वाटत असेल तर ते साहजिकच म्हटले पाहिजे. कदाचित, याच भावना झिरपून निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्या असाव्यात. म्हणूनच निवडणुकीच्या कामापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आयोगाने कंबर कसली असावी. निवडणुकीच्या कामापासून मुलांना दूर ठेवले, तरी करमणुकीपासून मुलांना वंचित ठेवल्याचा ठपका येणार नाही, याची आयोगाला खात्री असावी. हा निर्णय एवढय़ा कठोरपणे अमलात आणला जाणार आहे, की निवडणुकीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामात मुलांचा वापर केला तर तसे करणाऱ्या राजकीय पक्षाची मान्यताच रद्द केली जाईल, असे आयोगाने बजावले आहे. परवा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात म्हणे, उमेदवाराच्या सभेत गर्दी जमलीच नाही म्हणून अखेर मुलांना गोळा करून आणावे लागले. सभामंडपातील रिकाम्या खुच्र्यावर डोकी दिसावीत म्हणून ही युक्ती लढवावी लागली, असे म्हणतात. या सभेला हजेरी लावलेल्या मुलांचे खुललेले चेहरे दाखविणारी छायाचित्रेही नंतर प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे मुलांनी निवडणुकीच्या प्रचार सभेकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहिले की काय, अशा शंकेला वाव मिळतो. अलीकडे नेत्यांच्या प्रचार सभा घरबसल्या पाहण्या-ऐकण्याचे भाग्य दूरचित्रवाणीमुळे सर्वानाच लाभलेले आहे. अशा सभांचे थेट प्रक्षेपण न्याहाळणाऱ्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर अशा वेळी विरंगुळ्याचे भाव पाहायला मिळू शकतात. म्हणजे, करमणूक हा जर मोठय़ांचा विरंगुळा असेल, तर अशी प्रक्षेपणे हादेखील एक करमणुकीचाच प्रकार आहे की काय, अशी शंका उद्भवू शकते. तरीही, ‘निवडणूक’ आणि ‘करमणूक’ यांच्यात केवळ तीन अक्षरांचा फरक नाही, हे मानलेच पाहिजे. निवडणुकीकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे. म्हणूनच, निवडणुकीच्या राजकारणात मुरलेल्यांनी मुलांसारखे वागू नये, एवढी मतदाराची अपेक्षा कशी पूर्ण होईल याकडेही आयोगाने लक्ष दिले पाहिजे. प्रचाराची भाषणे, आरोप-प्रत्यारोप आणि सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन पाहता, निवडणूक हा ‘मोठय़ांचा पोरखेळ’ आहे असा समज होणार नाही, हेही पाहिले पाहिजे.