शाळांमध्ये जो इतिहास शिकवला जातो तो अनेकदा राजकीय दृष्टिकोनातून असतो. अशा स्थितीत खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण इतिहासकारांकडे वळतो; पण आता इतिहासकार दुर्मीळ होत चालले आहेत. एकोणिसाव्या शतकातील इतिहासकार व केंब्रिज स्कूल ऑफ हिस्टोरियोग्राफीचे सदस्य सर ख्रिस्तोफर अ‍ॅलन बेली यांचे नुकतेच निधन झाले.
 त्यांचा जन्म १९४५ मध्ये झाला होता. त्यांनी बी.ए., एम.ए. व डी.फिल या पदव्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतल्या. नंतर त्यांनी ब्रिटिश म्युझियमचे विश्वस्त, इंपिरीयलचे हार्मसवर्थ प्राध्यापक म्हणून काम केले होते. २००४ मध्ये ते ब्रिटिश अकादमीचे फेलो झाले. त्यांना वुल्फन्सन इतिहास पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांना इंग्लंडच्या राणीचा सर हा किताब मिळाला. सध्या ते शिकागो विद्यापीठात विवेकानंद अध्यासनाचे प्राध्यापक होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ते सतत वेळ देत होते. ‘द बर्थ ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड – ग्लोबल कनेक्शन्स अँड कम्पॅरिझन्स १७८०-१९१४’ हे त्यांचे पुस्तक जगाच्या इतिहासाचा आढावा घेणारे आहे. भारताच्या अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील इतिहासाचा वेध घेताना त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची पाळेमुळे शोधली होती. आधुनिक भारताच्या घडणीत शेतकरी, राजकीय नेते, ग्रामीण लोक, सावकार यांची नेमकी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचे दोन विचारप्रवाह सांगितले, त्यात मदन मोहन मालवीय यांचा हिंदू विचारसरणीचा राष्ट्रवाद होता व मोतीलाल नेहरू यांचा पाश्चिमात्य पद्धतीचा राष्ट्रवाद होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या मते बेली यांनी स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक इतिहासाचे धागे जुळवले होते. मुघल, ब्रिटिश व वसाहतवादानंतरची गुप्तचर संकलन शैली यांच्या कडय़ा त्यांनी जोडून दाखवल्या. इतिहासकार म्हणून ते सतत नवीन प्रश्न उपस्थित करीत त्यावर माहितीसाठी स्रोत शोधत असत. त्यांनी जागतिकीकरणाच्या पहिल्या लाटेचा जगावर काय परिणाम झाला याविषयी लिहिले आहे. ते कुठल्याही विचारसरणीच्या पठडीत बंदिस्त झालेले इतिहासकार नव्हते. भारतातील संस्था, स्थानिक समाजरचना या फार संवेदनशील होत्या व ब्रिटिशांच्या वसाहतवादाने डळमळीत होणाऱ्या नव्हत्या, असे त्यांचे मत होते. ‘द लोकल रूटस ऑफ इंडियन पॉलिटिक्स – अलाहाबाद १८८०-१९२०’ व ‘इंडियन सोसायटी अँड द मेकिंग ऑफ ब्रिटिश एम्पायर’ ही त्यांची पुस्तके आता अभ्यासक्रमात आहेत. त्यांच्या निधनाने आपण भारताशी नाते जोडणारा एक मोठा इतिहासकार गमावला आहे.