राज ठाकरे यांच्या सभांना कितीही गर्दी झाली, तरी तेवढय़ाने मते मिळत नसतात, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली आहे.  ही टीका म्हणजे सभा यशस्वी झाल्याची पावतीच, असे समजता येईल. पण शिवसेनेने मागितलेली ‘टाळी’ नाकारल्यावर आता राज यांनी पक्षबांधणी केली नाही, तर मात्र अजित पवार यांचे खिजवणे खरे ठरू शकते.  
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच वेळी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला अंगावर घेतले आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज यांनी एकीकडे सेनेला झटका देऊन आपली वाट स्वतंत्र असल्याचे दाखवून दिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बेछूट कारभाऱ्यांवर हल्ला चढवून एकाच वेळी सर्वानाच अंगावर घेतले आहे. शिवसेनेच्या चाणक्यांनी ‘टाळी’साठी हात पुढे केला खरा परंतु त्यामागच्या राजकारणाचा बुरखा कोल्हापुरात फाडल्यामुळे टाळी मागून उगाच अवलक्षण केल्याचे सेना नेत्यांच्या आता लक्षात आले. राज यांनी शिवसेना-भाजपच्या भूमिकेवर फार तोफ डागली नसली तरी आगामी काळात ते काय करणार याची चुणूक कोल्हापुरात पाहायला मिळाली.
राज यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, त्यातही तरुणांची उपस्थिती आणि त्यांचे घणाघाती भाषण याची दखल घेण्याची गरज राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटली, यातच राज यांनी निम्मी लढाई जिंकली आहे. राज्याच्या कारभारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांशी सतत भांडत आहेत. राज्यात दुष्काळीची परिस्थिती गंभीर असून सरकारविरोधात लोकांमध्ये कमालीचा अंसतोष आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते सध्या दुष्काळाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र राज यांच्या दौऱ्यामुळे हैराण झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे या दौऱ्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राष्ट्रवादीचे अनेक नेते राज यांच्या विधानावर टीका करून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी राज यांच्यावर केलेली टीका हा त्याचाच एक भाग आहे. ‘आमचे दुष्काळाचे दौरे खरे असून राज ठाकरे यांचे दौरे म्हणजे भंपकपणा’ असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले, यामागे हेच सूत्र दिसून येते. गेली पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. याच काळात राज्यावरील कर्जाचा बोजा ३४ हजार कोटींवरून वाढून दोन लाख २८ हजारांपर्यंत गेला. वारंवार महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत सापडत आहे. २०१२पर्यंत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याची अजित पवारांची घोषणा कोठे हरवली ते कळतही नाही. राज्यातील अनेक जिल्हे तहानलेले आहेत. जनावारांना चारा नाही की पाणी नाही म्हणून तडफडून मरण्याची वेळ येत आहे. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या नातेवाइकांच्या लग्नांवर कोटय़वधी रुपयांची उधळण करण्यात दंग असताना, या शाही लग्नांमध्ये मिरविण्यात अजित पवार आणि कंपनीला काहीही गैर वाटत नाही. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मंत्री भास्कर जाधव यांच्यावर थेट टीका केल्यानंतर त्यांना सांभाळण्याचे काम अजित पवार यांनीच केले. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर दुसरीकडे राज्यातील जनता दुष्काळाने पोळून निघत आहे, मात्र याचे काहीच सोयरसुतक नसलेल्या अजित पवार यांनी कोल्हापूर आणि खेडमधील राज ठाकरे यांच्या विक्रमी गर्दीच्या सभांनंतर ‘नक्कल करण्यापेक्षा कामे करा ’ असा सल्ला राज यांना दिला. राज यांच्या सभांना गर्दी होत असली तरी मते मिळणार नाहीत असे छातीठोकपणे अजित पवार यांनी संगितले. यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी होत असे, पण मते मिळत नव्हती असा दाखलाही त्यांनी दिला.  सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च होऊन महाराष्ट्र तहानलेला का, याचे उत्तर अजित पवार कधी देणार हा खरा प्रश्न आहे.
राज यांनी मराठीला डावलण्याच्या कारस्थानासह राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भ्रष्ट कारभावर हल्ला चढवला. राज यांचा महाराष्ट्राचा दौरा जसजसा पुढे सरकेल तसा सत्ताधारी व मनसेतील आरोपप्रत्यारोपांची राळ उडेल. राज यांच्यावर हल्ला करतानाच्या त्यांची खिल्ली उडवून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाकडून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे धोरण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखलेले दिसते.
शिवसेना-भाजपची स्थिती राज यांच्या झटक्यामुळे केविलवाणी झालेली दिसते. प्रामुख्याने भाजप नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. कोठून टाळीसाठी हात पुढे केला, असे सेनेचे नेते आता खासगीत बोलताना दिसतात. मनसे वाढू शकते हा आत्मविश्वास असल्यामुळेच राज यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच ‘एकत्र येण्याची भाषा वृत्तपत्रातून चालत नाही. लग्न करायचं असेल तर मेळावा घ्यायचा नसतो’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मुखपत्रातून मांडलेल्या भूमिकेवर हल्ला चढवला. सेना-मनसेची खरी लढाई ही मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे या शहरी भागांत असल्यामुळे मराठी मते हा दोघांसाठी कळीचा मुद्दा आहे. एकत्र येण्याची व टाळीसाठी हात पुढे करण्यामागे ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली’ अशीच सेनेच्या चाणक्यांची भूमिका होती. मराठी मते फुटू नयेत यासाठी उद्धव पुढे येत आहेत, मात्र राज यांच्याकडून साथ मिळत नाही, हे पद्धतशीरपणे दाखविण्याची ही एक हुशार खेळी होती. राज यांनी एक घाव दोन तुकडे करत मराठीचा मुद्दाच पुसून टाकला. कोणत्याही पक्षाशी मला युती करायची नाही तर स्वबळावर लढून राज्य जिंकायचे आहे, अशी घोषणा राज यांनी केल्यामुळे सेनेपेक्षा भाजपमध्येच जास्त अस्वस्थता निर्माण झाली. राज यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न दाखवत एकटय़ाच्या हिमतीवर लढण्याची भाषा केली असली तरी मनसेमध्ये सारेच काही आलबेल नाही. मनसेतील स्टार, यार व कलाकारांमुळे जागोजागी असंतोषच निर्माण झालेला दिसून येत आहे. ठाण्यात पक्षाचा शहर अध्यक्ष राष्ट्रवादीतून आयात करावा लागला. नवी मुंबईत गेल्या तीन वर्षांपासून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आलेल्या नाहीत. नवी मुंबई गणेश नाईकांसाठी मनसेने आंदण सोडल्याची टीका पक्षातच होत आहे. मनसेच्या महिला आघाडीत बिघाडी दिसत असून श्वेता परुळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून आजपर्यंत महिला आघाडीसाठी अध्यक्ष मिळू शकलेला नाही. वाहतूक सेना तसेच रस्ते व आस्थापना सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरखास्त करावे लागले. मुंबई, ठाणे, नाशिक व पुण्यातच पक्षात सुंदोपसुंदी दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत न बोलणेच बरे. राज ठाकरेंना रामराम करून शिवसेनेत जाऊन आमदारकी उपभोगल्यानंतर पुन्हा आमदारकी न मिळाल्यामुळे परशुराम उपरकर यांनी मनसेची वाट धरली. राज यांनीही त्यांना पंखाखाली घेतले असले तरी काही वर्षांपूर्वी ‘राजगडा’वरील हल्ल्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या उपरकरांना पक्षात दिलेला प्रवेश अनेकांना रुचलेला नाही. उपरकर यांच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये मनसेच्या ताकदीमध्ये कोणतीही भर पडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अनेक चांगले साथीदार मिळाले होते. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी यांच्यापासून छगन भुजबळ, दिवाकर रावते, नारायण राणे यांच्यासारख्यांमुळे शिवसेनेची बंधणी भक्कम झाली होती. बाळासाहेबांचा करिष्मा आणि चांगले साथीदार याच्या जोरावर शिवसेनेचा चार दशकांचा प्रवास चालला. उद्धव ठाकरे यांचाही संघटना बांधणीत मोठा वाटा आहे. आता शिवसेनेचा सारा भार त्यांच्याच खांद्यावर आहे. राज्यस्तरावर प्रभावी असलेले नेते आज सेनेत नाहीत. उद्धव यांनाही आगामी काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील सेनेच्या नेत्यांमधील नाराजी त्यांना दूर करावी लागणार आहे. आपल्याला पक्षात फारसा वाव मिळत नाही अशी भावना ग्रामीण भागातील सेनेच्या आमदार व नेत्यांमध्ये आहे. त्यातच उद्धव यांना काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच मनसेशीही लढा द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या तुलनेत मनसेची स्थिती कमकुवत आहे. राज यांच्या एकखांबी तंबूवरच सारे काही अवलंबून  आहे. स्टार- यार- कलाकारांचा फारसा काही उपयोग नाही हे आता स्पष्ट झाल्यामुळे संघटना बांधणीचे आव्हान राज यांनाच पेलावे लागणार आहे.
 संघटना बांधणी झाली नाही तरीही कदाचित राज यांच्या सभांना गर्दी प्रचंडच जमेल, मतेही मिळतील परंतु विजयी होण्यासाठी ती कमीच पडतील आणि मग पुन्हा ‘मतांचेच राजकारण चालते गर्दीचे नाही’ असे राज यांना खिजविण्यास आजित पवार मोकळे होतील.