18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

सांस्कृतिक ठोकळेबाजी

भारत प्रजासत्ताक झाला, तेव्हा दोन राज्येच काय, महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात

मुंबई | Updated: December 27, 2012 12:10 PM

भारत प्रजासत्ताक झाला, तेव्हा दोन राज्येच काय, महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात कुणाशी दूरध्वनीवर बोलायचे तरी प्रसंगी तासभर थांबावे लागे. पुढल्या पाच-सहा दशकांत मोबाइल क्रांती होईल, राज्योराज्यी विमानतळ होतील, अनेक राज्ये आपापले पर्यटन महोत्सव भरवू लागतील यापैकी कोणतीही कल्पना त्या वेळी अशक्यच होती. अशा त्या काळात प्रजासत्ताक दिनाच्या लष्करी संचलनाला राज्याराज्यांतील सांस्कृतिक वैशिष्टय़ांचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचीही जोड द्यावी, असे तेव्हाच्या धुरिणांना वाटले असल्यास नवल नाही. चित्ररथांचा समावेश असलेल्या त्या वेळच्या त्या संचलनांचे वर्णन आकाशवाणीवरून ऐकणे, हा दोन दशके अनेक सुसंस्कृत घरांमधील प्रजासत्ताक दिनाच्या सकाळचा अविभाज्य भाग असे.. कोणत्या राज्याची ‘झाँकी’ कशी आहे, याची रसभरित वर्णने करणारे निवेदक जो माहोल श्रोत्यांच्या डोळय़ांसमोर उभा करीत, तोच पुढे कधीतरी चित्रपटगृहामध्ये सिनेमाआधीच्या न्यूजरिळांतून पाहायला मिळाला की धन्य वाटे.. हे सारे इतिहासजमा केले दूरदर्शनच्या आणि पुढे चित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या प्रसाराने; पण त्यालाही आज दीड दशक लोटले.. आज आश्चर्य याचे वाटते की, ई-गव्हर्नन्स व पेपरलेस प्रशासनाच्या बाता करणाऱ्या सरकारला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपातत: घडलेले आणि घडत असलेले बदल कसे काय दिसत नाहीत! ‘कोलावेरी डी’सारखे गाणे असो की कोणार्कच्या समुद्रकिनारी होणारा अभिजात नृत्योत्सव की जैसलमेरच्या मरुभूमीत होणारा राजस्थानी लोकसंगीताचा उत्सव.. हे सारे आज घरबसल्याच काय, धावत्या गाडी उभे राहूनही यूटय़ूबवर पाहता येते. ट्रकचे वा कोणत्याही उपलब्ध वाहनाचे चित्ररथात बेमालूम रूपांतर करण्याचे सजावटतंत्र महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यांत पोहोचलेले आहे आणि गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रा किंवा अन्य प्रसंगी त्याची चमकही दिसते. अशा वेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात  यंदा दिसणार नाही, म्हणून हळहळ वाटण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्र राज्याने भारतीय चित्रपटांची शताब्दी हा विषय सुचवला, तोच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानेही (एनएफडीसी) सुचवला होता आणि संरक्षण खात्याची जी समिती चित्ररथांची अंतिम निवड करते, तिने महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव नापसंत केला. म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदाही चित्ररथ असणार, महाराष्ट्राला सुचलेला विषयसुद्धा अन्य चित्ररथावर दिसणार. परंतु यंदा हे चित्ररथ पाहण्यात महाराष्ट्रीयांना रस नसला तर ते यंदापुरते आणि महाराष्ट्रापुरते रास्त ठरेल, असे म्हणायचे का? की, प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ पाहण्यातला एकंदर भारतीयांचाच रस कमी झालेला आहे, हे आता तरी मान्य करायचे? लोकांनी चित्ररथांच्या नावाखाली चालणारी सांस्कृतिक ठोकळेबाजीच पाहायची का? महाराष्ट्र हे सलग तीनदा- म्हणजे १९९३, ९४ आणि ९५ या वर्षांसाठी सवरेत्कृष्ट चित्ररथाचे प्रथम पारितोषिक मिळवणारे एकमेव राज्य असल्याचे आजही सांगितले जाते, पण चित्रपटांचे कलादिग्दर्शन, नेपथ्य यांतील कौशल्याची वानवा नसलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीतील एखाद-दोन नेहमीचे यशस्वी कलाकारच दरवर्षी कंत्राटे मिळवण्याचा विक्रम करतात हे गुपितच राहते. लष्करी संचलन व प्रगत संरक्षणसिद्धता, यांचे दर्शन एरवी होत नसल्याने ते आजदेखील आवश्यक आहेच. मात्र,  चित्ररथांचा सांस्कृतिक दिखावा कंटाळवाणा होऊ लागला आहे.  

First Published on December 27, 2012 12:10 pm

Web Title: cultural foulplay