नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नागरिकांच्या गरजा भागवल्या हे मान्य करावे लागेल. मात्र संशयास्पद प्रतिमेमुळे ते पंतप्रधानपदास लायक नाहीत, असे डॉ. सेन यांना वाटते. असे असेल तर मग मनमोहन सिंग यांच्या धोरणलकव्याचे समर्थन ते कसे करतात?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा फुगा प्रसारमाध्यमांनी फुगवला या विख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या मतात तथ्य आहे. मोदी हे पंतप्रधान होता नये कारण त्यांची निधर्मी प्रतिमा संशयास्पद आहे, असेही सेन म्हणाले. ताज्या मुलाखतीत सेन यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांचा कथित पंतप्रधानपदाचा दावा याबाबत विस्तृत मतप्रदर्शन केले. तिची दखल घेणे गरजेचे आहे. मोदी यांच्याबाबतची हवा तापवली गेली त्यास अर्थविषयक नियतकालिकांच्या गुंतवणूकस्नेही धोरणाचा भाग होता, हे नि:संशय. परंतु तसे होण्यामागे आणखीही एक कारण आहे. त्याचा किती विचार सेन यांनी केला, हे समजण्यास मार्ग नाही. मोदी यांच्या कामगिरीचा उदोउदो होण्यास सुरुवात झाली ती आसपासचे अन्य मुख्यमंत्री निकम्मे ठरू लागले म्हणून. या शून्य कारभाराबाबत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा कोणी करू शकणार नाही. मग ते राजस्थानचे अशोक गेहलोत असोत किंवा महाराष्ट्राचे अशोक चव्हाण आदी अन्य मुख्यमंत्री असोत. या आणि अन्य राज्यांतील व्यापक अंधारामुळे मोदी यांची ठसठशीत चिमणी डोळे दिपवणारी ठरली, हे आपण मान्य करावयास हवे. तेव्हा मोदी यांची तुलना करण्यासाठी कार्यक्षम असा अन्य कोणी नसल्यामुळे अकार्यक्षमांच्या भाऊगर्दीत हा काहीतरी करून दाखवणारा उजवा ठरला. ज्या काळात अन्य राज्यांत पाऊल टाकण्यास उद्योगपती धजावत नव्हते त्या काळात मोदी यांच्या गुजरातेत या मंडळींची रीघ लागत होती आणि गुंतवणुकीची स्पर्धाच सुरू होती. त्याचे अतिउदात्तीकरण झाले, हेही मान्य. मोदी यांच्या दौलतजादामुळे सरकारी सवलतींना चटावलेला आणि सरकारच्या पदराआडून आपले उद्योग सांभाळणारा मोठा वर्ग मोदी यांचे गुणगान करू लागला, हेही सत्यच आहे. या उद्योगपतींनी अनेक व्यावसायिक वृत्तवाहिन्या वा दूरचित्रवाणी वाहिन्यांत गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे तेथून मोदी यांची आरती सकाळसंध्याकाळ सुरू राहिली आणि मोदी यांच्याभोवती कार्यक्षमतेचे मोठे वलय तयार झाले. अशा वेळी इतरांच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कामगिरीस विटलेल्या जनतेस मोदी यांच्या रूपात पर्याय उभा राहताना दिसला. तेव्हा मोदी यांच्या उदात्तीकरणासाठी माध्यमांना दोष देताना त्याच वेळी अन्य अकार्यक्षमांचे पापही तितक्याच पोटतिडिकीने त्यांच्या त्यांच्या पदरात घालावयास हवे. सेन ते करताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ माध्यमांना दोष देऊन त्यांना स्वत:च्या कर्तव्यच्युतीतून सुटका करून घेता येणार नाही. शिवाय, वेळच्या वेळी हवी तेव्हा वीज, मुलाबाळांना शिकण्यासाठी चांगल्या शाळा, त्या शाळेपर्यंत पोहोचवणारे चांगले आणि सुरक्षित रस्ते याच गरजा कोणत्याही नागरिकासाठी महत्त्वाच्या असतात. त्या जर पुरवल्या जात असतील तर त्या पुरवणारा नेता निधर्मी आहे किंवा काय याचा विचार नागरिक करीत नाहीत, हे वास्तव आहे. आणि हे आपल्याकडेच होते असे नाही. लोकशाही अगदी खोलवर मुरलेल्या अमेरिकेसारख्या देशातही जॉर्ज बुश यांच्यासारखा वैचारिकदृष्टय़ा उनाड गृहस्थ एकदा नव्हे तर दोनदा अध्यक्षपदी विराजमान होऊ शकला तो अमेरिकी नागरिकांना दाखवण्यात आलेल्या सुखस्वप्नांमुळे. अमेरिकी नागरिकांच्या संपत्तीत वाढ करणे आणि त्यांचे कर कमी करणे या आश्वासनांवर बुश निवडून आले. तेथील जनतेसाठी हे जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून आल्यावर व्हाइट हाउसमधे बायबलचे धडे त्यांनी सुरू केले याबद्दल सर्वसामान्यास त्याचे काही सोयरसुतक नव्हते. अशा वेळी मोदी हे धर्मवादी आहेत की निधर्मी या चर्चेत रस असलाच तर तो आहे सेन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आणि स्टुडिओविलसित विचारवंतांना. हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे हे नाकारण्यात अर्थ नाही.
तथापि सेन यांच्या विधानाचा समाचार घेण्याचे आणखी एक कारण आहे. काँग्रेसशासित सरकार, त्या सरकारचा गेल्या काही वर्षांचा धोरणलकवा आणि त्यातून जन्माला आलेले अनर्थकारण याच्याशी हे कारण संबंधित आहे. गेले काही महिने सेन हे मनमोहन सिंग सरकारच्या खाद्यान्न सुरक्षा योजनेचे कडवे समर्थक बनले आहेत. त्यांचे म्हणणे असे की नुसत्या आर्थिक विकासाने समाज पुढे जात नाही. त्या जोडीला गरिबांसाठीच्या सामाजिक योजनांचीही गरज असते. या विचारातून मोदी यांचे विकासाचे प्रारूप सेन यांना निरुपयोगी वाटते. जगदीश भगवती आदी समकालीन अर्थतज्ज्ञांनी सेन यांच्या या विधानाचा जाहीर प्रतिवाद करून त्यातील फोलपणा नुकताच उघड केला. स्वातंत्र्यपूर्व काळात गोपाळराव आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य यांत जाहीर वाद होत. अर्थात सेन हे काही आगरकर नव्हेत आणि भगवती हेही टिळक नाहीत. परंतु या वादातून त्याही वेळी फार काही हाती लागले नाही आणि आताही त्याचे काही फलित असेल असे सांगता येणार नाही. तरीही सेन यांच्या विधानाची दखल घ्यायला हवी याचे कारण त्यामागील सुप्त राजकारण. सेन यांच्या विधानात तथ्य आहे असे मान्य केले तरी मनमोहन सिंग यांच्या धोरणलकव्याचे समर्थन करणार कसे? सिंग यांच्या धोरणांमुळे आर्थिक विकास न होता अन्य आघाडय़ांवर भरभराट झाली असती तरी सेन यांचे म्हणणे विश्वासार्ह वाटले असते. परंतु आर्थिक विकासही नाही आणि सामाजिक प्रगतीदेखील नाही अशीच अवस्था असेल तर केवळ आर्थिक प्रगती का होईना पण ती देणारा नरेंद्र मोदी हा जनतेस अधिक विश्वासार्ह नेता वाटत असेल तर त्यात चूक काय? खेरीज, सिंग सरकारच्या कारभारामुळे प्रगतीस मोठय़ा प्रमाणावर खीळ बसली आहे हे काँग्रेसजनांनाही नाकारता येणार नाही. मग ते दूरसंचार क्षेत्र असो वा कोळसा खाणी. सगळय़ा आघाडय़ांवर विकासाच्या नावाने एक मृतवत शांतता आहे आणि त्यास या सरकारचे धोरणशून्य कामकाज जबाबदार आहे. परंतु अमर्त्य सेन यांनी याबाबत कधी टीकेचा आसूड पंतप्रधान सिंग वा संबंधितांवर ओढल्याचे स्मरत नाही. आताही ज्या अन्न सुरक्षा योजनेमुळे सेन यांना सिंग सरकारचे कौतुक करावे असे वाटते त्या योजनेबाबत हे सरकार गंभीर असते तर ती योजना कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आणण्याचे निवडणुकीय चातुर्य काँग्रेसने दाखवले नसते. त्याही आधी आपल्या पहिल्याच खेपेत अशी योजना आणून ती यशस्वी करून दाखवण्याची संधी सिंग यांना होती. परंतु त्यांनी तसे केले नाही कारण या योजनेत काँग्रेससहित सर्वच पक्षांचे फक्त राजकीय हितसंबंध आहेत. अन्न सुरक्षा योजना लागू झाली तर ती आम्ही आणली म्हणून श्रेय घ्यायचे आणि ती लागू न झाल्यास विरोधकांच्या माथी ते फोडायचे हादेखील राजकीय हिशेब त्यामागे आहे. त्यात सेन यांना दिसतो तसा समाजाचे भले करण्याचा वगैरे कोणताही विचार नाही. तसा तो असता तर विद्यमान स्वस्त धान्य दुकान योजनेत जे तब्बल ४० टक्के इतके धान्य गायब होते ते रोखण्याचा प्रयत्न सिंग यांनी केला असता. तशी इच्छादेखील त्यांनी कधी व्यक्त केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या मनातही जे नाही ते त्या पक्षाच्या योजनेत शोधण्याची उठाठेव अमर्त्य सेन यांनी करायची काहीच गरज नाही.
लोकांस पाहय़ाचा आदर, तेथे याचा अनादर। लोक सर्वकाळ तत्पर, तेथे याची अनिच्छा.. असे खऱ्या नि:स्पृहाचे वर्णन समर्थ रामदासांनी केले आहे. तेव्हा सेन यांनी उभय बाजूंकडील न्यून मांडावे. केवळ एकाचेच, तेही सर्वाना ज्ञात असलेले दोषच ते दाखवत राहिले तर विद्वत्तेचा आव आणणाऱ्या अन्य सुमारांसारखेच अमर्त्य सेन हे मर्त्य वाटू लागतील.