उत्क्रांतीच्या बोधमय यात्रेत प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक प्रबुद्ध, माहितीने अधिकाधिक ठासून भरलेले वारकरी सामील होत आहेत. ही उत्क्रांती, अगणित फांद्या फुटणाऱ्या झाडासारखी होत गेली आहे..
उत्क्रांती म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात महाकाय डायनासॉर. पृथ्वितलावर चेतनसृष्टी हळूहळू बदलते आहे, उत्क्रांतीप्रक्रियेतून अधिकाधिक जटिल रचनेचे जीव प्रगटताहेत याचा सर्वात ठोस पुरावा आहेत डायनासॉरांसारख्यांचे फॉसिल अथवा जीवाश्म, शिळांच्यात सापडणारे, पुष्कळदा आज नष्ट झालेल्या जीवांचे अवशेष. उत्क्रांतीसिद्धान्ताप्रमाणे असे जीवाश्म अपेक्षितच आहेत. उलट आज जी जीवसृष्टी नजरेस येते ती जशीच्या तशी ईश्वराने निर्माण केली या बायबलमधील सिद्धान्तानुसार जीवाश्मांचा अर्थ सहजी लागत नाही. शिवाय ही सारी ईश्वरी लीला मानण्यातून काहीच पडताळण्याजोगे नवे निष्कर्ष निघत नाहीत. उलट उत्क्रांतीवादातून खालच्या थरांतले पुरातन जीवाश्म हे जास्त साध्या रचनेचे असतील, तर वरच्या थरांतले अधिक आधुनिक जीवाश्म जास्त जटिल रचनेचे असतील असे पडताळण्याजोगे व परीक्षेला उतरलेले अनुमान निघते.
पण जीवाश्म अनेक प्रश्नचिन्हेही उभी करतात. टणक कवचे- सांगाडे असलेले प्राणी किंवा लाकूडवाल्या वनस्पतींचे जीवाश्म मुबलक सापडतात. पण हे तर उत्क्रांतीच्या दृष्टीने अलीकडच्या, साठ कोटी वर्षांच्या काळातले आहेत. यांच्या खूप आधीपासून ज्यांच्यात काहीही टणक अंश नाही असे सूक्ष्म जीव, वनस्पती, प्राणी भूतलावर होते नक्कीच, मग त्यांच्या काहीच खाणाखुणा नाहीत का? या प्रथम ध्यानात आल्या केवळ पन्नास वर्षांपूर्वी, सायानोबॅक्टेरिया या सूक्ष्म जीवांच्या जीवाश्मरूपात. अगदी साध्या रचनेचे सायानोबॅक्टेरिया हे जरी शतांश मिलिमीटर इतके बारीक असले तरी त्यांच्या साखळ्यांभोवतीच्या चिकट द्रवात वाळूचे कण, दुसरे सूक्ष्मजीव चिकटून त्यांच्या चटया बनतात. समुद्रतीरी या चटयांचे स्ट्रोमॅटोलाइट नावाचे खडक तयार होतात. असे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचे सायानोबॅक्टेरियांनी घडवलेले अश्मीभूत स्ट्रोमॅटोलाइट सापडले आहेत; आजही ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफवर नव्याने रचले जाताहेत.
सायानोबॅक्टेरियांनी पृथ्वीवर प्रथमच हरितद्रव्य- क्लोरोफिलच्या साहाय्याने प्रकाशाची ऊर्जा वापरत साखरेचे व जोडीलाच प्राणवायूचे उत्पादन सुरू केले. या आरंभीच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात, जलावरणात प्राणवायू अगदी अल्प प्रमाणात होता. कोटय़वधी वर्षांच्या त्यांच्या खटाटोपातून जसे प्राणवायूचे प्रमाण वाढू लागले तशी सायानोबॅक्टेरियांची जीवनयंत्रणा प्राणवायूला सांभाळून व्यवस्थित वापरणाऱ्या विकरांनी- एन्झाइम्सनी- सज्ज झाली. मग प्रत्येक साखरेच्या रेणूतून खूप जास्त ऊर्जा मिळू लागली. या सामर्थ्यांच्या बळावर सायानोबॅक्टेरियांनी प्राणवायू न वापरणाऱ्या जीवजंतूंची ससेहोलपट केली.
जीवसृष्टीच्या इतिहासाच्या अभ्यासकांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न आहे : जीवन म्हणजे एक ‘परस्परां करू साहाय्य, अवघे धरू सुपंथ’ असा सहकाराचा, सहयोगाचा प्रवास आहे; की जीवन म्हणजे एक संघर्ष आहे, एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे? जीवनात नक्कीच सहकारही आहे, संघर्षही. आतापर्यंत बहुतेक प्रतिपादन संघर्षांच्या भूमिकेवर भर देऊन होत आले आहे. पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले आहे, तसतसे उघड होत आहे की, मोठय़ा प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रमही आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवनवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते. याबरोबरच जीवनाची जडणघडण, परस्पर संबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत जातात. याला तोंड द्यायला जीवजंतूंना अधिकाधिक जटिल माहिती हाताळायला लागते. ही क्षमता उद्भवते संघर्षांच्या आव्हानांमुळे, पण सहयोगाच्या आधारावर.
दोन अब्ज वर्षांपूर्वी प्राणवायूचे प्रमाण खूप वाढल्यावर झालेल्या घडामोडी हे या संघर्ष- सहकाराच्या परस्पर-संवादाचे एक विलक्षण उदाहरण आहे. सायानोबॅक्टेरियांच्या आधीच पृथ्वितलावर पदार्पण केले होते आíकया नामक दुसऱ्या कुळीच्या सूक्ष्म जीवांनी. एकीकडे सायानोबॅक्टेरिया प्रकाशाची ऊर्जा वापरायला लागले तर दुसरीकडे काही जास्त जोरकस आíकया दुसऱ्या जीवांची शिकार करायला लागले. काही आíकयांचे सायानोबॅक्टेरिया हे सावज होते. पण गिळलेल्यातले काही सायानोबॅक्टेरिया योगायोगाने पूर्णपणे पचवले गेले नाहीत आणि आíकयांच्या पेशींचा भाग म्हणून टिकून राहिले. या नवनिर्मित जोडगोळीच्या अधिक मोठय़ा आकाराच्या पेशी आता पेशीतील अंतर्गत घटक बनलेल्या सायानोबॅक्टेरियांच्या मदतीने प्रकाशाची ऊर्जा वापरू लागल्या. यातूनच एकपेशी शेवाळी उद्भवली. शेवाळ्यांच्या पेशीत जी हरितद्रव्ययुक्त पेशीद्रिं्रये- क्लोरोप्लास्ट- असतात ते आहेत मूळचे सायानोबॅक्टेरिया. पुढे उत्क्रांतीच्या ओघात बहुपेशी वनस्पती अवतरल्या. म्हणजे सायानोबॅक्टेरिया हेच साऱ्या वनस्पतींच्या हिरव्या रंगद्रव्याचे मूलस्रोत आहेत. यांनीच आपल्या धरणीमातेला हिरवा शालू नेसवला आहे.
तसे पाहिले तर आधुनिक वनस्पतींच्या मानाने सायानोबॅक्टेरियाच खूप जास्त यशस्वी आहेत. संख्येने, उत्पादकतेने सरस आहेत, खोल समुद्रापासून कोरडय़ा ठणठणीत खडकांपर्यंत पसरलेले आहेत. तेव्हा उत्क्रांती म्हणजे सर्वदृष्टय़ा अप्रगत, कनिष्ठ गुणवत्तेच्या, हीन जीवजातींपासून उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगत, श्रेष्ठ, उच्च जीवजातींकडे उन्नती होत जाणे असे बिलकूल नाही. अनेक साध्यासुध्या प्राचीन जीवजातीही अतिशय समर्थ, यशस्वी आहेत. पण तरीही उत्क्रांतीचा ओघ अगदी दिशाहीन आहे असेही नाही. काही दृष्टय़ा अर्वाचीन जीवजाती प्राचीन जीवजातींहून निश्चितच पुढारलेल्या आहेत. त्यांची रचना, त्यांचे जीवनव्यापार, त्यांचे आचरण जास्त गुंतागुंतीचे, जटिल, व्यामिश्र आहे. आधुनिक माहितीशास्त्राच्या परिभाषेत त्या माहितीने जास्त ठासून भरलेल्या, अधिक बोधप्रचुर आहेत. उदाहरणार्थ, भाताचे एक रोप घडवायच्या कृतिक्रमासाठी एक सायानोबॅक्टेरिया घडवायच्या कृतिक्रमाहून बरीच जास्त माहिती पुरवणे आवश्यक आहे. तेव्हा, हो, उत्क्रांती प्रगतिशील आहे. पण उत्क्रांतीचा ओघ हा एक सरळसोट शिडी चढण्याचा उपक्रम नाही. उत्क्रांती ही एक अगणित, वेगवेगळ्या उंचीवर फांद्या फुटणाऱ्या झाडाच्या वाढीची प्रक्रिया आहे. या उत्क्रांतीच्या झाडाचे जमिनीतले मूळ म्हणजे जीवोत्पत्तीच्या आरंभीच्या आज अजिबात अस्तित्वात नसलेल्या अवस्था. खोड, फांद्या व डहाळ्या म्हणजे उत्क्रांतीच्या ओघात उपजलेल्या, काही काळाच्या पडद्याआड गेलेल्या, काही आजही अस्तित्वात असलेल्या नानाविध जीवकुळी. पाने म्हणजे आज अस्तित्वात असलेल्या जीवजाती. हा बोधतरू साकारवणाऱ्या जीवकुळी-जीवजाती जितक्या जास्त बोधप्रचुर, तितक्या जमिनीहून जास्त उंचावर.
असे बोधभांडार नऊ टप्प्यांत अधिकाधिक समृद्ध होत गेले. ३८० कोटी वर्षांपूर्वी किंवा पृथ्वीचे आजवरचे वय म्हणजे २४ तासांचा एक दिवस मानल्यास २० तासांपूर्वी, आरएनएचे बोधप्रचुर रेणू आदिपेशीत एकत्र येऊन हे झाड रुजले. दुसऱ्या टप्प्यावर, आरएनएच्या हरहुन्नरी रेणूंच्या जागी डीएनएचे बोधवाहक रेणू व प्रोटिनांचे चलनप्रेरक रेणू अशी श्रमविभागणी झाली. तिसऱ्या टप्प्यावर सुटे सुटे बोधप्रचुर रेणू एका सूत्रात व्यवस्थित बांधले जाऊन बोधभांडार अधिक संघटित झाले. चौथा टप्पा होता लैंगिक पुनरुत्पादन सुरू होण्याचा, दोन वेगळ्या स्रोतांतून माहिती एकत्रित करण्याचा. मग पाचव्या टप्प्यावर, आíकया व सायानोबॅक्टेरियांच्या युतीप्रमाणे अगदी वेगळ्या प्रकारचे जीव एकत्र येऊन नव्या मोठय़ा, आणि माहितीचा किती तरी पटीने जास्त साठा असलेल्या, पेशी निर्माण झाल्या. सहाव्या टप्प्यावर एकपेशीय जीवांपासून बहुपेशीय वनस्पती, प्राणी, अिळबे उपजली. पुढच्या सातव्या टप्प्यावर, मज्जा संस्थेने- नव्‍‌र्हस सिस्टीमने- सज्ज प्राण्यांनी पदार्पण केले, माहितीचा एक नवाच ओघ सुरू झाला. पृथ्वीच्या अवघ्या एक तासांपूर्वी, आठव्या टप्प्यावर ज्यांच्या सदस्यांच्यात श्रमविभागणी शक्य होती अशा प्राणिसमाजांनी पदार्पण केले. अलीकडचा नववा टप्पा, पृथ्वीच्या केवळ १ सेकंदापूर्वीचा, भाषाकोविद मानवाच्या आगमनाचा. भाषा ही शे-दीडशे ध्वनी नेटकेपणे एकत्र गुंफत बनवलेले बोधसंग्रहाचे एक आगळे, सतत वृद्धिशील माध्यम आहे. म्हणूनच सर्वाहून बोधप्रगल्भ, भाषासंपन्न अशी मानवजाती हे या झाडाच्या शेंडय़ाजवळच्या सस्तन पशूंच्या फांदीवर गर्वाने फडफडणारे पान आहे. या वर्षभरात आपण मुळापासून आरंभ करून या सचेतनांच्या बोधवृक्षावर क्रमेण वर वर चढत जाऊ या!   
 madhav.gadgil@gmail.com

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!