05 August 2020

News Flash

सम थिंग्ज आर फेअर ..

अतिशय गंभीर चेहऱ्याने बसलेले न्यायाधीश. आरोपींना उभे राहण्याचे शानदार िपजरे. भव्यदिव्य कोर्ट रूम्स. आणि टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता..

| June 11, 2015 12:15 pm

‘कॉपीराइट’ ने संरक्षित कलाकृतीच्या तिच्या मालकाच्या परवानगीशिवाय प्रती काढणे, कॉपीराइट असलेल्या नाटक, चित्रपट किंवा गाण्याचे मालकाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक प्रयोग करणे, किंवा अशा एखाद्या कलाकृतीचे रूपांतर किंवा भाषांतर करणे हे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे. पण प्रत्येक शापावर जसा उशाप असतो तसा  यावरही आहे..  कॉपीराइट कायद्यात त्याला म्हणतात ‘फेअर यूज’चे तत्त्व..

अतिशय गंभीर चेहऱ्याने बसलेले न्यायाधीश. आरोपींना उभे राहण्याचे शानदार िपजरे. भव्यदिव्य कोर्ट रूम्स. आणि टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता.. हिंदी चित्रपटांमधले सुप्रसिद्ध कोर्ट सीन्स आठवून पहा. खासकरून खुनाच्या खटल्यांमधले. बहुतेक वेळेला जर चित्रपटातील नायक किंवा नायिका आरोपी असतील  तर त्यांना शेवटी कोर्ट ‘बाइज्जत बरी’ करते- म्हणजे दोषमुक्त करते. अशावेळी आरोपीच्या sam05म्हणजे आपल्या नायक किंवा नायिकेच्या वकिलाने काय युक्तिवाद केलेला असतो आठवतंय? विशेषत: ती जर नायिका असेल तर तिच्या वकिलाची धडपड नेहमी हे सिद्ध करण्याची असते की तिच्या हातून हा खून ‘स्वसंरक्षणासाठी’ म्हणजे सेल्फ डिफेंस साठी झाला. वकिलाला जर हे सिद्ध करता आले तर कोर्ट आरोपीला दोषमुक्त करते.
पुराणातल्या प्रत्येक शापाला जसा उशाप असत असे तसे प्रत्येक कायद्यात आरोपीला काहीतरी संरक्षण दिलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच आपण पहिले की आरोपीने जर स्वतच्या संरक्षणासाठी खून केला असेल हे सिद्ध  करता आले किंवा आरोपी वेडा आहे हे सिद्ध करता आले तर खून करूनही आरोपी दोषमुक्त होतो. आणि खुनाच्याच नव्हे तर इतरही अनेक कायद्यात असे अपवाद असतात. गुन्हेगाराला दोषमुक्त कुठल्या परिस्थितीत करता येईल हे त्या कायद्यात नमूद केलेले असते.
सध्या आपण कॉपीराइट कायद्याबद्दल बोलतो आहोत. आणि आपण पाहिलंय की कॉपीराइट ने संरक्षित कलाकृतीच्या तिच्या मालाकाच्या परवानगीशिवाय प्रती काढल्या, किंवा तिचा सार्वजनिक प्रयोग केला किंवा त्यावर आधारित दुसरी कलाकृती बनवली (म्हणजे पुस्तकाचे भाषांतर किंवा कादंबरीचे नाटकात रूपांतर वगरे) तर हे कॉपीराइट हक्कांचे उल्लंघन आहे. हा गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा आहे. पण या गुन्ह्यावर एक उशाप देखील कॉपीराइट कायद्यात आहे. ज्याला म्हणतात ‘फेअर यूज डॉक्ट्राइन’. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन जर योग्य किंवा चांगल्या कारणासाठी केले असेल तर तो गुन्हा नव्हे असे हे तत्त्वसूत्र सांगते. थोडक्यात म्हणजे काही विशिष्ट कारणांसाठी जर कॉपीराइटचे असे उल्लंघन कुणी केले असेल तर तो गुन्हा समजला जात नाही.
कॉपीराइट कायद्यात या फेअर यूज तत्त्वाचा अंतर्भाव का केला गेलेला असावा? या लेखमालेच्या सुरुवातीच्या लेखांमधे आपण पहिले की बौद्धिक संपदा हक्क म्हणजे एक तोल सांभाळण्याचा खेळ आहे. हे हक्क जेव्हा हक्कांच्या मालकासाठी मक्तेदारी निर्माण करतात तेव्हा अर्थातच आम जनतेला एखादी गोष्ट वाजवी दरात मिळण्यापासून वंचित करत असतात. आणि म्हणून मग ते पेटंट्स असोत किंवा कॉपीराइट्स..जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते की एखाद्या वस्तूवर मक्तेदारी देऊन तिची किमत प्रचंड वाढणे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नसते, तेव्हा ती मक्तेदारी झुगारून द्यावी लागते आणि जनहितचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या देशात एका  रोगाची साथ आली आहे  आणि लोक पटापट मरू लागले आहेत. त्या रोगावर रामबाण उपाय असलेले औषध आहे. पण त्यावर पेटंट असल्याने ते प्रचंड महाग आहे. तर अशावेळी त्या औषधावर सक्तीचा परवाना जारी करून ते लोकांना स्वस्तात उपलब्ध करून देता येते. कारण जगण्याचा हक्क किंवा ‘राइट टु लाइफ’ हा संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क सनदेने आणि भारतासह अनेक राज्यघटनांनी सर्व माणसांना दिलेला मूलभूत हक्क आहे. आणि तो हक्क पेटंट हक्कापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.
आता हेच तत्त्व कॉपीराइट कायद्यालाही लागू करून पाहू या. शिक्षणाचा हक्क हाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेला व देशांच्या राज्यघटनांनी बहाल केलेला एक मूलभूत हक्क आहे. मग जर एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अत्यावश्यक असलेली पुस्तके अतिशय महाग असतील आणि भारतासारख्या गरीब देशात ८०% मुलांना ती परवडणारी नसतील तर त्यांनी काय करायचे? त्यांनी शिकायचे नाही का? मग भारतीय घटनेने त्यांना दिलेल्या शिक्षणाच्या हक्कापसून ते वंचित होतील. विद्यार्थीदशेत असताना या अवस्थेतून तुम्ही आम्ही प्रत्येकजण गेलो आहोत. आपल्या  विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले एखादे असे परदेशी पुस्तक असायचे. त्याची एकच प्रत ग्रंथालयात उपलब्ध असायची. आणि विकत घ्यायला जावे तर ते प्रचंड महाग असायचे. मग आपण अशावेळी काय करायचो? तर सरळ हवे ते पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथलयातून घ्यायचो आणि समोरच्या टपरीवाल्याकडून त्यातल्या हव्या त्या पानांच्या छायांकित प्रती काढून वापरायचो! बरोबर? आता आपण पहिले की लेखकाच्या परवानगीशिवाय अशा प्रती काढणे हे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे आणि तो गुन्हा आहे. आपण छायांकित प्रती काढताना लेखकला विचारायचो का? तर अर्थात नाही. मग आपण असे करून गुन्हा करतो का? खरे तर हो.. पण अशा वेळी कॉपीराइट कायद्यातले फेअर यूजचे तत्त्व आपल्या मदतीला धावून येते. आणि या तत्त्वानुसार आपण कॉपीराइट चे उल्लंघन केलेले असले तरी हा गुन्हा ठरत नाही.
समजा आपण महाविद्यालयातल्या स्नेहसम्मेलनासाठी एक नाटक बसवतोय. आपण सगळेच नवशे गवशे  हौशी कलाकार आहोत. नाटकात काम करायाची, रंगभूमीवर उभे राहून पाहण्याची खुमखुमी म्हणून आपण नाटक करतोय. नाटकाचा प्रयोग फक्त स्नेहसंमेलनात होणार आहे. तिकीट लावून प्रयोग कुठेही होणार नाही. असा सार्वजनिक प्रयोग करण्यासाठी नाटककारची परवानगी घ्यावी लागते हे आपल्या गावीही नाही. आणि आपल्याला कुणी सांगतही नाही. मग हे करून आपण गुन्हा करतोय का? खरे तर हो.. पण यावेळीही फेअर यूज चे तत्त्व आपल्याला सोडवते.
मी एक संशोधक आहे. माझ्या संशोधनावर आधारित एक शोधनिबंध मी लिहिला आहे.
या निबंधाच्या सुरुवातीला अशाच प्रकारचे संशोधन केलेल्या काही
ज्येष्ठ संशोधकांच्या निबंधातले काही उतारे मी उद्धृत केले आहेत. आणि त्याना त्याचे योग्य ते श्रेयही दिले आहे. हे कॉपीराइट हक्काचे उल्लंघन आहे का? ..उत्तर परत तेच.. खरे तर हो पण फेअर यूज तत्त्वाप्रमाणे नाही.
किंवा, मी एका चित्रवाणी वाहिनीवर वार्ताहर आहे. आजच घडलेल्या एका घटनेचे योग्य ते रेपोìटग माझ्या वाहिनीवर करण्यासाठी मला एक व्हीडिओ क्लिप टीव्हीवर दाखवणे गरजेचे वाटले. ही व्हीडिओ क्लिप अर्थातच मी बनवलेली नाही. मग ती दाखवून मी ज्याने ती बनवली आहे त्याच्या हक्कांचे उल्लंघन करते आहे का? तर फेअर यूज तत्त्वाप्रमाणे नाही.
तुम्ही चित्रपटाची एक डीव्हीडी विकत आणली आहे. आणि ती खराब होण्याची शक्यता वाटली म्हणून तिची एक बॅकअप कॉपी बनवून ठेवली आहे. ती कुणालाही दिली नाही किंवा कुणीही फुकटात पहिली नाही. पण कॉपी मात्र केली आहे. इथेही फेअर यूज तत्त्व तुमच्या मदतीला येईल!
थोडक्यात शैक्षणिक कारणासाठी, संशोधनासाठी, कोर्टात पुरावा म्हणून, एखाद्या घटनेच्या वार्तान्कनासाठी, स्वतच्या वैयक्तिक वापरासाठी जर एखाद्या कॉपीराइटने संरक्षित असलेल्या कलाकृतीचा वापर तिच्या मालकाच्या परवानगीशिवाय केला किंवा तिच्या प्रती काढल्या, किंवा एखाद्या अशा कलाकृतीचा सार्वजनिक प्रयोग हौशी रंगमंचावर (म्हणजे तिकीट न लावता) केला तर तो कॉपीराइटचा फेअर यूज समजला जातो. आणि अशा प्रकारच्या कॉपीराइट हक्कांच्या उल्लंघनाला शिक्षा केली जात नाही. अर्थात देशोदेशीचे कॉपीराइट कायदे निराळे.. आणि त्यानुसार त्या त्या देशात कशाला फेअर यूज म्हणायचे हे ठरविण्याच्या कसोटय़ाही वेगवेगळ्या.. या कसोटय़ा लावून पाहणेही अतिशय जिकिरीचे असते आणि त्याबाबतीत कायद्यात बऱ्याच संदिग्धता ही आहेत. पण साधारणपणे वर उल्लेखिलेल्या कारणांसाठी केलेले कॉपीराइट चे उल्लंघन  सर्वच देशांत ‘फेअर यूज’ मध्ये मोडते.
याबाबतीतले काही अतिशय रोचक खटले आपण पुढच्या लेखात विस्ताराने पाहूच. पण तोपर्यंत ‘Everything is fair in love and war’ च्या चालीवर  ‘Some things are fair in copyrightl इतके लक्षात ठेवायला हरकत नाही.

-प्रा. डॉ. मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2015 12:15 pm

Web Title: fair use in copyright
Next Stories
1 कल्पना खुशाल चोरू द्या..
2 कुऱ्हाडीचा दांडा..
3 बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली
Just Now!
X