भारतात राहणारे लोक इंडियातल्या श्रीमंतांपेक्षा अधिक कनवाळू आणि दयाळू असतात, असा निष्कर्ष जेव्हा न्यायालयेच काढतात, तेव्हा त्याला केवळ कायद्याचा आधार नसतो, तर प्रत्यक्षात घडलेल्या परिस्थितीचाही संदर्भ असतो. गर्भश्रीमंत म्हणता येईल, अशा एका घटस्फोटित पुरुषाने आपली पत्नी आणि मुलगी यांना पोटगीपोटी दरमहा द्यावयाच्या रकमेबाबत जेव्हा टाळाटाळ सुरू केली, तेव्हा ही माहिती न्यायालयाच्या समोर आली. एका मोठय़ा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करीत असलेल्या या व्यक्तीचे मासिक उत्पन्न ६३ लाख रुपये असताना तो जड अंत:करणाने आपल्या पत्नीला दरमहा २० हजार रुपये देत होता. हे पैसे अपुरे आहेत, असे सांगत या पत्नीने न्यायालयात धाव घेताना आपल्या पूर्वपतिराजाचे खर्चाचे जे आकडे दिले ते पाहता, या श्रीमंत पुरुषाला पैशांचा किती लोभ आहे, हे सहज लक्षात येईल. हा गृहस्थ सध्या नोकरीत नसतानाही न्यूयॉर्कमधील एका खास क्लबचा सदस्य असून त्यासाठी तो वारंवार तेथे जातो. तेथे घर असतानाही हॉटेलात राहतो. आपल्या राहत्या घरासाठी नोकरी नसलेला हा माणूस दरमहा पाच लाख रुपयांचे भाडे भरतो. मात्र पत्नी आणि मुलगी यांच्या चरितार्थासाठी पैसे देण्यास टाळाटाळ करतो. न्यायालयाने निकाल देताना पत्नीला दरमहा तीन लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. शिवाय गेल्या दीड वर्षांतील ५४ लाख रुपयांचा फरकही हप्त्याने सहा महिन्यांत देण्यास सांगितले आहे. न्यायालयात अशा पोटगीच्या अनेक प्रकरणांत आपण गरीब आहोत आणि विभक्त झालेल्या पत्नीला आपण पैसे देऊ शकत नाही, असा युक्तिवाद सातत्याने केला जातो. श्रीमंतांना असलेला पैशाचा लोभ किती भयावह रूप धारण करतो, ते अशा प्रकरणांमध्ये समोर येते, तेव्हा गरिबीत जगणाऱ्या भारतातील नागरिकांमध्ये माणुसकी अद्याप शाबूत असल्याचेच तीव्रपणे जाणवते. या माणुसकीचे दर्शन अनेकदा श्रीमंतांनाही लाजवणारे असते. चेन्नईतील एम. एस. शिवकुमार यांच्या निधनाने सर्वाना वाटणारी हळहळ ही या माणुसकीचे प्रतीक ठरते. या शिवकुमार यांनी आयुष्यभर बेवारस मृतदेहांच्या नातेवाइकांना शोधण्याचे आणि अनाथाश्रमातील बालकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम मनोभावे केले. बेवारस मृतदेहांचे क्रियाकर्म आपल्या खर्चाने करणाऱ्या या शिवकुमार यांना अपघात झाला, तेव्हा सहा तास त्यांना कुणाची मदत मिळू शकली नाही. एरवी अशा परिस्थितीत हेच गृहस्थ जिवाचे रान करून वाट्टेल ती मदत मिळवून देण्यासाठी धडपडत असत. जगातले दैन्य आणि दु:ख कमी करण्याचा हा हट्ट कितीतरी जणांच्या आयुष्यात बदल घडवणारा असतो. पण पैसेवाल्यांना अशा आनंदात रस नसतो. उंची राहणीमान हेच त्यांच्या जगण्याचे ईप्सित असते आणि त्यातच ते मश्गूल असतात. जगण्यातला आनंद अशा बाह्य़ गोष्टींमध्ये शोधणाऱ्या श्रीमंतांना छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये दडलेले समाधान शोधण्याची गरज वाटत नाही आणि त्यातूनच घटस्फोटित पत्नी आणि मुलीला मासिक पोटगी देण्याची वेळ येते, तेव्हा आपण दरिद्री असल्याचा बहाणा केला जातो. भावनांच्या पातळीवरील भारत आणि इंडियातला हा फरक न्यायालयानेही नोंदवला आणि एका नव्या चर्चेला तोंड फोडले, हे एका परीने बरेच झाले!