भारतात पोलाद कारखाने सुरू करण्याचे श्रेय टाटांना जाते. त्यांच्याच नावाने केम्ब्रिज विद्यापीठात पुरस्कृत करण्यात आलेल्या टाटा पोलाद अध्यासनाचे धातुशास्त्राचे प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ हर्षद कुमार धरमसी भदेशिया यांना ब्रिटनच्या राणीने ‘नाइटहूड’ हा किताब देऊन गौरविले आहे. आता यापुढे ते ‘सर’ भदेशिया या नावाने ओळखले जातील.
भदेशिया यांचे मुख्य संशोधन पोलाद व इतर धातूसंमिश्रांवर आहे. हा सन्मान मिळाल्याने आनंद झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत, पण केम्ब्रिजमध्ये हा किताब मिळवणारे आपण एकटे नाही, अशी प्रांजळ कबुलीही दिली आहे. भदेशिया यांनी केवळ पोलाद क्षेत्रात संशोधन केले असे नाही, तर नवीन प्रकारचे पोलाद शोधून काढले आहे. कार्बाइडमुक्त पोलाद त्यांनी शोधले. ते स्वित्र्झलडच्या रेल्वे व्यवस्थेत व फ्रेंच ट्राम यंत्रणेतही वापरले आहे. सुपरबैनाइटचा शोधही त्यांनी लावला. ते चिलखतांसाठी वापरले जाते. ते एक प्रकारचे संमिश्र असून तेलविहिरींमध्ये जे पाइप वापरतात त्यातही त्याचा वापर केला जातो. ते पोलाद क्षेत्रातील एक अनुभवी संशोधक व शिक्षकही आहेत. भदेशिया यांचा जन्म केनियात झाला. त्यांचे आईवडील मूळचे राजकोटचे. नंतर ते सत्तरच्या दशकात राजकीय अशांततेमुळे केनियातून ब्रिटनमध्ये आले. ‘सिटी कॉलेज ऑफ लंडन पॉलिटेक्निक’ या संस्थेत त्यांनी १९७६ मध्ये बी.एस्सी. केले. नंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. पोलादातील ‘ऑस्टेनाइट’ या विषयावर त्यांनी १९७९ मध्ये पीएच.डी. केली. १९८१मध्ये ते एसआरसी फेलो झाले. काही काळ त्यांनी खरगपूर आयआयटीत व नंतर केम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन केले. त्यांचे धातुशास्त्रात ५०० शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ब्रिटिश ऑक्सिजन कंपनीत धातू दर्जा तपासनीस म्हणून काम सुरू केले. नंतर त्यांची कारकीर्द हळूहळू बहरत गेली. ब्रिटिश संरक्षण उद्योगात त्यांनी तयार केलेली पोलाद संमिश्रे वापरली आहेत.
नोव्हेंबर २००८ मध्ये ते ‘टाटा स्टील प्रोफेसर ऑफ मेटॅलर्जी’ या पदावर नियुक्त झाले. ‘एसकेएफ युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी सेंटर’ या संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार आहे. ह्य़ूम रॉथरी व रोसेनहेन पदक, फेलो ऑफ रॉयल सोसायटी, बेसमेर सुवर्णपदक असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. ‘हनीकॉम्ब’, ‘स्टील्स- मायक्रोस्ट्रक्चर अ‍ॅण्ड प्रॉपर्टीज’, ‘बॅनाइट स्टील’, ‘वक्र्ड एक्झाम्पल्स इन जिऑमेट्री ऑफ क्रिस्टल्स’ ही त्यांची धातुशास्त्रावरील पुस्तके या विषयातील अभ्यासकांनी जरूर वाचण्यासारखी आहेत.