15 August 2020

News Flash

माहितीचे मारेकरी..!

अमेरिकेतल्या पाच प्रमुख विचारसमूहांवर सरकार कशा कशा पद्धतीनं नजर ठेवत असतं त्याचा साद्यंत वृत्तांत डेव्हिसच्या पुस्तकात आहे, तर सेमुर हर्ष यांनी एक लेख लिहून

| June 15, 2013 12:39 pm

अमेरिकेतल्या पाच प्रमुख विचारसमूहांवर सरकार कशा कशा पद्धतीनं नजर ठेवत असतं त्याचा साद्यंत वृत्तांत डेव्हिसच्या पुस्तकात आहे,  तर सेमुर हर्ष यांनी एक लेख लिहून अमेरिकी गुप्तहेर कोणकोणत्या परदेशी नेत्यांना मारायला टिपले आहेत याची यादीच दिली. नंतर सरकारनं नेमलेल्या समितीच्या अहवालातून अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेनं नेमके काय काय उद्योग केले ते जगाला माहीत झाले..  
खूप वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक आता एकदम महत्त्वाचं ठरलंय. निमित्त आहे ते जे काही अमेरिकेत सुरू आहे त्याचं. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेसाठी कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन या तरुणानं महासत्तेची दाखवू नये ती बाजू अचानक सगळय़ांसमोर आणली आहे. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणा आपल्या नागरिकांवरच कशा प्रकारे हेरगिरी करते, त्यांचे खासगी ई-मेल वगैरे कसे वाचते त्याचा गौप्यस्फोट एडवर्डनं केला आणि सगळं जगच त्यावर ठेचकाळलं. त्यानं हे सगळं सांगेपर्यंत जगाला माहीत नव्हतं असं नाही. म्हणजे जवळपास सगळेच देश आपल्याच नागरिकांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतात वगैरे शंका व्यक्त केल्या जात होत्याच. पण तरीही एखाद्याची शंका आहे म्हणून खात्री पटल्यावर धक्का बसायचा तो बसतोच. तसं अमेरिकेत झालेलं आहे. आपल्या संगणकात शिरून कोणी तरी आपली माहिती चोरतंय अशी शंका अनेकांना होतीच. एडवर्डनं ती खरी ठरवली आणि त्याच्या बरोबरीनं हेही सांगितलं जे काही चाललं आहे ते अधिकृत सरकारी निर्णयानुसारच. म्हणजे आपल्याच नागरिकांवर चोरून लक्ष ठेवा असा आदेश खुद्द सरकारनंच दिलेला आहे, हे एडवर्डच्या गौप्यस्फोटानं उघड झालं. ही माहिती देताना एडवर्डनं भरपूर पुरावेही दिले. त्यामुळे अमेरिकी प्रशासनावर अंग चोरून वागायची वेळ आली.
खूप वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक महत्त्वाचं ठरतंय ते या पाश्र्वभूमीवर. नाव आहे स्पाइंग ऑन अमेरिका-द एफबीआयज डोमेस्टिक काउंटरइंटलिजन्स प्रोग्राम. जेम्स डेव्हिस हा त्याचा लेखक. आंतरराष्ट्रीय विषयांवर जेव्हा वाचायची चूष निर्माण झाली तेव्हा आकर्षण होतं ते अमेरिकेनं व्हिएतनाममध्ये केलेली पापं आणि नंतर त्याच अनुषंगानं बाहेर पडलेलं वॉटरगेट प्रकरण. ऑल द प्रेसिडंट्स मेन हे पुस्तक वाचून आणि नंतर सिनेमा पाहून पत्रकारितेतला अर्थ सापडत होता. वार्ताहर बॉब वुडवर्ड, वृत्तसंपादक हॅरिसन सॅलिस्बरी आदींच्या शौर्यकथा नादावून टाकत होत्या. त्यामुळे नंतर अमेरिकी यंत्रणा कोणकोणत्या पद्धतीनं दडपशाही करते याची माहिती मिळवायची, त्यावर वाचायची सवय लागत गेली. त्या टप्प्यावर स्पाइंग ऑन अमेरिका हाती लागलं. एका समानधर्मीयानं ते वाचायला दिलेलं होतं. वॉटरगेट सताड उघडेपर्यंत अमेरिकी गुप्तचर यंत्रणा नक्की काय काय उद्योग करतात, याची ठोस माहिती हाती नव्हती. या प्रकरणानं ती फोडली. हे पुस्तक त्याच्या पुढे एक पाऊल जातं. अमेरिकेतल्या पाच प्रमुख विचारसमूहांवर सरकार कशा कशा पद्धतीनं नजर ठेवत असतं, त्याचा साद्यंत वृत्तांत या पुस्तकात आहे. डावे, समाजवादी, कु क्लुक्स पंथीय, आफ्रिकी आणि एकंदरच प्रस्थापितविरोधी मतं बाळगणाऱ्यांचा यात समावेश होता. या सगळय़ांच्या हालचाली, त्यांच्या त्यांच्यातली संभाषणं, त्यांच्या बैठकांचे वृत्तांत असं सगळं सगळं अमेरिकी सरकारकडून टिपलं जात होतं. देशभर पसरलेल्या या इतक्या मोठय़ा समूहाकडे इतकं बारीक लक्ष नेमकं कसं ठेवलं जायचं त्याचा तपशील या पुस्तकात आहे. तत्कालीन वर्तमानपत्रीय वृत्तांत, राजकीय नेत्यांच्या, विविध संस्थाप्रमुखांच्या मुलाखती यावर आधारित मजकूर लेखक डेव्हिस यांनी मोठय़ा कष्टानं मिळवलाय. शेवटी एकदा कार्यकर्त्यांचा मोर्चाच कसा गुप्तहेर यंत्रणांच्या कार्यालयांवर हल्ला चढवून गुप्तहेर यंत्रणांची बिंगं फोडतो ते सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे. जे एडगर हुवर हे अमेरिकेची अंतर्गत गुप्तहेर यंत्रणा..फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्सचे.प्रमुख त्याची या हल्ल्यानंतर कशी प्रतिक्रिया होते आणि ते काय उपाययोजना करतात, ते सगळंच रंजक आहे. ही लेखक मंडळी संपूर्ण घटनाक्रम आपल्या समोर असा सादर करतात की जणू काही ते या सगळय़ाचे साक्षीदारचं होते की काय, असं वाटावं. त्यामुळे वाचक गुंतून जातोच पण ही कथा लिहिणाऱ्यालाही ती लिहिण्यात रस आहे असं जाणवतं. इंग्रजी लेखकांची ही शैली अनुकरणीयच.
या पुस्तकाचा फायदा असा झाला की संबंधित विषयाचा मागोवा घेण्याची सवय लागली.
आणखी एक मग पुस्तक.खरं तर अहवाल.या सवयीतून हाती लागला. इंटलिजिन्स अ‍ॅक्टिव्हिटीज अँड द राइट्स ऑफ अमेरिकन्स : १९७६ यूएस सिनेट रिपोर्ट ऑन इललीगल वायरटॅप्स अँड डोमेस्टिक स्पाइंग बाय द एफबीआय, सीआयए अँड एनएसए. वास्तविक हे पुस्तक म्हणजे अमेरिकी काँग्रेसने या हेरगिरीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आहे. त्यास पाश्र्वभूमी आहे ती अर्थातच व्हिएतनाम युद्ध आणि तदनुषंगिक घटनांची. या सगळय़ाला सुरुवात होते ती ख्रिस्तोफर पेल यांच्या लिखाणामुळे. हा गृहस्थ पेशाने प्राध्यापक. विविध विषयांवर लिहायचा आणि त्यामुळे वेगवेगळय़ा क्षेत्रांत त्यांची ऊठबस. तर त्यात त्यांना कोणी एकदा माहिती दिली अमेरिकी लष्कर नागरिकांवर कशी हेरगिरी करतं ते. किमान वीस जणांचा जमाव कुठेही जमला/जमणार असेल तर त्याचा वास लष्कराला आला तर साध्या वेशातील पोलीस किंवा गुप्तहेर या मेळाव्यात काय घडतंय, कोण काय बोललं याची इत्थंभूत माहिती सरकारला देतात. अशा बैठकांचा सुगावा आधी लागला तर हे गुप्तहेर त्या मेळाव्यात शिरकाव करतात, घडून गेल्यावर लागला तर त्याची माहिती वेगवेगळय़ा जणांकडून घेतली जाते. हे पेल यांनी लिहिलं १९७० सालच्या जानेवारी महिन्यात. नंतर या विषयावर कुठे ना कुठे काही ना काही मजकूर येतच होता. पण मोठा दणका दिला तो विख्यात पत्रकार सेमुर हर्ष यांनी. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहून अमेरिकी गुप्तहेर कोणकोणत्या परदेशी नेत्यांना मारायला टिपले आहेत याची यादीच दिली. यातले अनेक परदेशी होते. पण देशीही होते. म्हणजे स्वदेशातल्याच पण भिन्न वा विरोधी विचारांच्या मंडळींना थेट शत्रू ठरवून त्यांना संपवूनच टाकण्याचं धोरण अगदी अधिकृतपणेच आखण्यात आलेलं होतं. हर्ष यांच्या या लिखाणानं भलतीच खळबळ उडाली. सगळीकडून मागणी सुरू झाली ती एकच. ते म्हणजे अमेरिकी सरकारला आवरायला हवं. तसं आवरायचं असेल तर सरकारनं नेमके उद्योग काय केले हे माहीत करून घ्यायला हवं. त्यासाठीच मग एक समिती नेमण्यात आली. तिचे प्रमुख होते सेनेटर फ्रँक चर्च. त्यांच्या समितीचा अहवाल असल्यानं त्याचं नाव चर्च अहवाल. या समितीनं पार १९५०पासून अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेनं नेमके काय काय उद्योग केले त्याचा छडा लावला. त्या सगळय़ाचा अत्यंत सविस्तर तपशील या पुस्तकात आहे.
तो का वाचायचा याचं कारण आहे. ते असं सध्या अमेरिकेत स्नोडेन यानं जे काही आरोप केलेत त्यानंतर अनेकांकडून धक्का बसल्याची प्रतिक्रिया आली. स्नोडेनचा काळ आधुनिक आहे. त्यात ई-मेल आहे. इंटरनेट आहे. आणि ट्विटर, फेसबुक वगैरेही आहे. म्हणजे नागरिकांना भिन्नं मतं नोंदविण्यासाठी मोठा पृष्ठभाग उपलब्ध आहे. पेल यांच्या काळात माणसांना एकत्र जमावं लागायचं. आता तसं न जमतादेखील मतभिन्नता व्यक्त होऊ शकते आणि ती व्यापक प्रमाणावर प्रसृत करता येते. त्यामुळे अर्थातच हेरगिरीदेखील आधुनिक आणि तितकीच व्यापक होणं नैसर्गिकच आहे.
स्नोडेन याच्या प्रकरणामुळे हेच दिसून आलं. माहितीचे मारेकरी जगात सर्वकालीन सारख्याच प्रमाणात असतात. त्याचे वर्तमानकालीन संदर्भ इतिहासात डोकावायची सवय असेल तर अधिक सहजतेने सापडू शकतात हे नमूद करण्यासाठीच..

स्पाइंग ऑन अमेरिका- द एफबीआयज डोमेस्टिक कौंटरइंटलिजन्स प्रोग्राम: जेम्स डेव्हिस
प्रकाशक: प्रेगर, पृष्ठे: २०८, किंमत: ७५ डॉलर्स.

 इंटलिजिन्स अ‍ॅक्टिव्हिटीज अँड द राइट्स ऑफ अमेरिकन्स : १९७६ यूएस सिनेट रिपोर्ट ऑन इललीगल वायरटॅप्स अँड डोमेस्टिक स्पाइंग बाय द एफबीआय, सीआयए अँड एनएसए.
लेखक: चर्च समिती,
प्रकाशक : रेड अँड ब्लॅक,
पृष्ठे: ४२४, किंमत: १७.९९ डॉलर्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:39 pm

Web Title: information killer
Next Stories
1 ‘जीव’घेणा अधिकार
2 वाळूत मारल्या रेघा..
3 चायनीज चेकर्स
Just Now!
X