29 February 2020

News Flash

चटकचांदण्या, विषकन्या आणि मायावती!

उत्क्रांतीच्या यात्रेत वनस्पतींचा आणि कीटकांचा सहप्रवास चालला आहे, जे काय हिरवे असेल त्याचा फडशा पाडणाऱ्या टोळांपासून ते परागीकरणाची सेवा पुरवणाऱ्या मधमाश्यांपर्यंत, संघर्षांकडून सहकाराकडे!

| September 19, 2014 04:15 am

उत्क्रांतीच्या यात्रेत वनस्पतींचा आणि कीटकांचा सहप्रवास चालला आहे, जे काय हिरवे असेल त्याचा फडशा पाडणाऱ्या टोळांपासून ते परागीकरणाची सेवा पुरवणाऱ्या मधमाश्यांपर्यंत, संघर्षांकडून सहकाराकडे!  
खुशवन्तसिंग सांगतात की, ते शाळेत असताना लक्षावधी टोळ आफ्रिकेतून पंजाबावर चालून यायचे. या टोळधाडी धडकायच्या लख्ख सूर्यप्रकाशात; पण त्यांच्या थव्यांनी जमिनीवर चक्क अंधार पसरायचा. क्षणार्धात ते हिरवीगार शेती, झाडेझुडपे फस्त करायचे. या टोळांच्या झुंडी कीटकांच्या प्रचंड यशाच्या द्योतक आहेत. भूचरांच्या उत्क्रान्तीत सेल्युलोज आणि कायटिन या दोन रेणूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेल्युलोज वनस्पतींच्या पेशींचे कवच घडवते, तर कायटिन कीटक आणि बुरशांच्या देहाचे. जमिनीवर पदार्पण केल्यावर शरीराचे वजन पेलायला, देहातले पाणी सांभाळायला अशी आवरणे महत्त्वाची आहेत आणि म्हणूनच आज भूतलावर वनस्पती, किडे-मकोडे आणि बुरशांची चलती आहे. पशुपक्षी आपल्या डोळ्यांत साहजिकच भरतात; पण या तिघांच्या मानाने पशुपक्ष्यांची संख्या, भार, वैविध्य नगण्य आहे.
बुरशा जमिनीखाली वनस्पतींशी हातमिळवणी करीत फोफावल्या; पण कीटक वनस्पतींवर हल्ला चढवत, टोळांप्रमाणे त्यांचा फडशा पाडत अवतरले. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी वनस्पती पाण्याकाठीच ओलसर जमिनीवर उतरल्या. नेच्यांसारख्या या वनस्पतींचे प्रजनन नाजूक बीजाणूंतर्फे व्हायचे. चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून सर्वात प्राचीन कीटकांचे, भुंगेऱ्यांचे अथवा बीटल्सचे जीवाश्म सापडू लागतात. वनस्पतींचे सेल्युलोज आणि त्यांच्या लाकडातले लिग्निन पचवणे महाकर्मकठीण; पण त्यांचे बीजाणू त्या मानाने पचायला सोपे. वनस्पतींचे मुलायम बीजाणू हाच आदिकीटकांचा आहार होता.
उत्क्रान्तीच्या ओघात वनस्पती कोरडय़ा परिसरांत पसरू लागल्या. तिथे नर व मादी बीजाणूंना एकत्र आणायला पाणी कुठून भेटणार? तेव्हा अवतरल्या देवदारासारख्या सूचिपर्णी वनस्पती. यांच्या नर बीजाणूंची म्हणजेच परागांची वरात निघते वाऱ्यावर. अशा सूचिपर्णी वनस्पतींचे पराग मटकावता, मटकावता भुंगेरे त्यांचा आपोआप प्रसार करू लागले. परिणामी, त्यांचे व वनस्पतींचे शुद्ध शत्रुत्वाचे नाते बदलून ते काही अंशी वनस्पतींचे मित्र बनले. नेचे-देवदारांसारख्या वनस्पतींनी भूतलावर पदार्पण केल्यानंतर पहिली एकोणचाळीस कोटी वष्रे आपला अंमल गाजवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ झाली, ज्वालामुखींचा मोठा उद्रेक होऊन रविकिरणांचा चूर झाला, खूप थंडी पडली, महाकाय डायनासॉर आणि त्यांच्याबरोबरीने अनेक वनस्पती व प्राणिजाती नामशेष झाल्या आणि त्यांची जागा घेतली नव्या धाटणीच्या वनस्पतींनी, कीटकांनी, पशुपक्ष्यांनी. वनस्पती परागीकरणासाठी वाऱ्या-पाण्यावर अवलंबून असताना पराग प्रचंड प्रमाणात वाया जात होते. काही प्रमाणात भुंगे यांसारख्या कीटकांच्या माध्यमाद्वारे त्यांचे पद्धतशीर प्रसरण सुरू झाले होतेच, आता नव्या मनूत पुढची पावले उचलली गेली. या नव्या पर्वात अवतरलेल्या सपुष्प वनस्पतींनी परागीकरणाची सेवा बजावणाऱ्या कीटकांना आकर्षक पाकळ्यांनी खुणावत मधाचा खुराक द्यायला सुरुवात केली. कीटकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला आणि अवतरली फुलपाखरे आणि मधमाश्या.    
मधमाश्यांचे-वनस्पतींचे नाते निखळ मत्रीचे आहे, तर फुलपाखरे ही वनस्पतींची अंशत: शत्रू, अंशत: मित्र आहेत. प्रौढ फुलपाखरे परागीकरणाची निभ्रेळ सेवा बजावतात; पण त्यांचे सुरवंट वनस्पतींची पाने फस्त करतात. बालपणी कट्टर शत्रू, तर प्रौढ वयात जिगर दोस्त! वनस्पती सुरवंटांचा प्रतिकार करायला विषोत्पादन करतात, तर फुलपाखरांना रंगबिरंगांनी नटत मधाचे आमिष दाखवतात. सर्वसामान्य कीटकांना वेगवेगळे रंग दिसत नाहीत. रंगदृष्टीची उत्क्रान्ती झाली मध शोधण्यासाठी. यामुळे भुंगे, मधमाश्या, फुलपाखरांसारख्या खास परागसिंचन करणाऱ्या कीटकांना रंगदृष्टी आहे, एवढेच नाही तर माणसाला दिसत नाहीत असे अल्ट्राव्हायोलेट रंगही ते पाहू शकतात. आपल्याला माहीतच नाही, की जाई-जुईसारख्या आपल्याला शुभ्र पांढऱ्या वाटणाऱ्या फुलांच्या पाकळ्यांवर असे आपल्याला अदृश्य रंगीत पट्टे असतात.  
उत्क्रान्तीचे अभ्यासक साहजिकच विचारतात :  फुलांबरोबर भुंगे, मधमाश्या रंगांनी नटल्या नाहीत, केवळ फुलपाखरेच नटली, असे का? याचे मूळ कारण त्यांच्या अगदी वेगळ्या जीवनक्रमात आहे. प्रौढ मधमाश्या आपल्या अळ्यांचे पोषण करतात, म्हणून त्यांना भरपूर आयुष्य नसले तर निसर्गाच्या चाळणीतून त्या खडय़ांसारख्या निवडून फेकून दिल्या जातील. उलट फुलपाखरांचे खाणे-पिणे हे सगळे बालपणीच संपते. प्रौढ फुलपाखरे मध चाखतात; पण अगदी थोडासा. कोशातून बाहेर आल्यावर लवकरात लवकर प्रजोत्पादन करणारी फुलपाखरेच निसर्गाच्या चाळणीत निवडली जातात. ती फटाफट मेली तरी चालतील; पण त्यांना चटकन जोडीदार मिळाला पाहिजे. यामुळे त्यांच्या उडण्याची शैलीही इतर कीटकांहून वेगळीच बनली आहे. एका सेकंदात डास पाचशे वेळा आणि मधमाश्या दोनशे वेळा पंख फडफडवतात, तर फुलपाखरे केवळ पाच-दहादा. या संथ उडण्यामुळे त्यांच्या पंखांचे रंगरूप डोळ्यांत भरू शकते. यामुळे कीटकांपकी फक्त फुलपाखरांत पंख हे नर व माद्यांनी एकमेकांना आकर्षति करण्याचे साधन बनले आहे; पण या रंगीत पंखांची, संथ उडण्याचीही किंमत मोजावी लागतेच. जरी प्रौढ फुलपाखराचे आयुष्य निसर्गाच्या निवडीत कमी महत्त्वाचे आहे, तरी अगदीच नगण्य नाही. तेही वाढवल्यास त्या गुणधर्माना पुढच्या पिढीत उतरण्याची जास्त संधी मिळते. म्हणून बहुतेक फुलपाखरांच्या पंखांवरचे रंग केवळ बसल्यावर मिटल्या जाणाऱ्या वरच्या बाजूलाच असतात आणि ती उडताना भराभर दिशा बदलत राहतात. अगदी मोजक्या जातींच्या फुलपाखरांचे पंख खालून-वरून नटलेले असतात आणि ती पूर्ण बेफिकीर राहून संथपणे उडत राहतात. या खास जातीच आपल्याला सर्वात आकर्षक वाटतात.
मग या विशेष जातींच्या सौंदर्याचे रहस्य काय? अहो, या आहेत विषकन्या! सुरवंटांपासून आपला बचाव करण्यासाठी रुईसारख्या काही वनस्पती विषारी चीक किंवा इतर विषारी रसायने बनवतात. अशा वनस्पती बहुतेक जातींची फुलपाखरे टाळतात; पण असेही बहाद्दर सुरवंट आहेत, की जे हे विष सहन करू शकतात. म्हणजे पचवत नाहीत; पण आपल्या शरीरात साठवून ठेवतात. हे साठवलेले विष प्रौढ फुलपाखरांच्या शरीरात उतरते आणि त्यामुळे कीटकभक्षक पक्षीही त्यांच्या वाटेस जात नाहीत. निसर्गाच्या चाळणीत या विषारी फुलपाखरांच्या बाबतीत लैंगिक आकर्षण वाढवण्याचे पारडे आणखीच जड होते. यातून डोळ्यांत भरणाऱ्या लावण्याची उत्पत्ती होते. ही सुंदर फुलपाखरे विषारी आहेत, हे पक्ष्यांना उपजत माहीत नसते, ती खाऊन वांती होऊन, पक्षी शिकतात. यामुळे एकमेकांसारखे दिसण्यात विषारी फुलपाखरांचा फायदा असतो. यातून विषारी फुलपाखरांच्या सारख्या सारख्या दिसणाऱ्या जातींचे समुच्चय उपजले आहेत- टायगर आणि क्रो समुच्चय. सम्राट जहांगीर मोठा निसर्गप्रेमी होता. त्याच्या दरबारातील चित्रकारांनी अनेक आकर्षक प्राणी, वनस्पतींची चित्रे काढलेली आहेत. त्यात साहजिकच एक फुलपाखरू आहे. ते आहे विषारी प्लेन टायगर; पण निसर्ग संधिसाधू आहे. विषारी फुलपाखरे पक्ष्यांच्या तावडीतून सुटतात म्हटल्यावर त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या, पण बिनविषारी तोतयांचीही उत्क्रांती सुरू झाली. या तोतयांना असतो दुहेरी फायदा. विष साठवायचे कष्ट नाहीत, तरीही शत्रूंपासून बचाव होतो.  
या सुंदऱ्या विषारी नाहीत, पण मायावी आहेत. असे आहे फुलपाखरांच्या सौंदर्याचे द्विविध रहस्य- विष आणि माया. या चटकचांदण्या आहेत विषकन्या अणि मायावती!
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

First Published on September 19, 2014 4:15 am

Web Title: insect life cycle
Next Stories
1 बुरसली अन् बहरली भूमी अशी!
2 लहानपण दे गा देवा!
3 मासे : जलजीवसृष्टीचे कणखर राजे
X
Just Now!
X