आज आपण सर्वस्व कशाला मानतो हो? तर आपलं घर, आपले आप्तस्वकीय, आपली भौतिक परिस्थिती हीच आपलं सर्वस्व असते आणि हे सर्वस्व सोडण्याची आपली कधीच इच्छा नसते. शरीरानं जरी त्यापासून वियोग घडला तरी मनानं आपण त्यातच घुटमळतो. मग अशा मला ‘संतां या भजावें। सर्वस्वेसी।।’ हे साधेल का हो? प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांना परत आणण्यासाठी भरतजी निघाले. सारे अयोध्यावासीही सोबत होते. भरतांचा भाव होता, प्रभूंना परत आणायचं, नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याच सेवेत त्यांच्याच चरणी वनात राहायचं. सर्व लोकही त्याच निर्धारानं वनात आले. त्यांची ही निश्चयी स्थिती पाहून इंद्रादी देव घाबरले. प्रभूंचं मन पालटलं आणि ते परत अयोध्येला गेले तर रावणाचा नाश कसा होईल? सद्गुरू सतत तुमची मानसिक परीक्षा घेत असतात. साईबाबाही भक्ताच्या सबुरीची इतकी परीक्षा घेत की, त्याच्या खऱ्या श्रद्धेची पातळी त्यालाच आतून समजत असे. तशी प्रभूंकडून देवांच्या मानसिकतेची ही परीक्षाच होती! अखेर प्रभू म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व वनात राहिलात म्हणजेच माझ्याबरोबर राहिलात, असं नव्हे. तुम्ही तुमच्याच घरी राहा, सर्व कर्तव्यर्कम करा, पण चित्तात माझंच चिंतन ठेवा, म्हणजे तुम्ही माझ्याच जवळ असाल!’’ मग प्रभूंनी इंद्रांना इशारा केला आणि आनंदून त्यानं मायेचा प्रभाव टाकला. मग रामाशी पूर्णत: एकरूप असे भरतादी वगळता सर्वाच्या मनात घराची आठवण येऊ लागली! राहिलेल्या कामांची आठवण होऊ लागली. त्यामुळे ‘घरी राहा, कर्तव्यं करा, पण माझंच चिंतन करा’, ही आज्ञा म्हणजे मोठी सोय होती! अवतारसमाप्तीच्या वेळी प्रभूंनी ज्या समस्त अयोध्यावासींना मोक्षाप्रत नेलं, त्यांची ही अवस्था, तर मग इंद्र म्हणजे इंद्रियप्रभावात अडकलेल्या आमची स्थिती काय सांगावी? आम्हाला घरदार मनातूनही कधी सोडवत नाही. त्यासाठी प्रभूंनीच ही योजना केली आहे! सर्व सुटत नाही ना? काही हरकत नाही. त्यातच राहा, पण ते सारं काही माझं आहे, या भावनेनं राहा! एकनाथी भागवतात म्हटलं आहे, ‘‘दारा सुत गृह प्राण। करावे भगवंतासी अर्पण। हे भागवतधर्म पूर्ण। मुख्यत्वे ‘भजन’ या नांव।।’’(अ. २/ ९९). ‘दारा’ म्हणजे जीवनाचा जोडीदार आणि अनंत कामना, ‘सुत’ म्हणजे कन्या-पुत्र, ‘गृह’ म्हणजे समस्त भौतिक सम्पदा आणि ‘प्राण’ म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आपण मानत असलेला एकमेव आधार असा ‘मी’! सर्वस्व म्हणजे सर्व+स्व. ‘सर्व’ म्हणजे मी ज्या गोष्टींना माझं मानतो त्या आणि ‘स्व’ म्हणजे मी! थोडक्यात, सर्वस्व म्हणजे मी व माझे! गोंदवलेकर महाराजांना एका धनिकांनं सर्व मालमत्ता दान केली. ते दानपत्र महाराजांनी फाडून टाकलं. महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व दिलंत, पण स्व नाही दिलात!’’ अहो, समस्त भौतिक देतानाच मला खात्री असते की सद्गुरू ते स्वीकारणार नाहीत! सर्व दिल्याचं कौतुक मात्र आयतं पदरात पडेल. लोकेषणेचा हा सुप्त ज्वालामुखी. तेव्हा एकवेळ सर्व देऊ शकणाऱ्या, पण ‘स्व’ जिवापाड जपणाऱ्या मला सद्गुरू सर्वस्व भावानं भजन करायला कसं शिकवतात?
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
२०२. सर्वस्व
आज आपण सर्वस्व कशाला मानतो हो? तर आपलं घर, आपले आप्तस्वकीय, आपली भौतिक परिस्थिती हीच आपलं सर्वस्व असते आणि हे सर्वस्व सोडण्याची आपली कधीच इच्छा नसते.
First published on: 14-10-2014 at 12:18 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intention of the god