News Flash

५०. अदृश्य चौकट

गरीब असो वा श्रीमंत, दोघांना सावली असतेच. सावलीला महत्त्व नाही पण ती असतेच. अगदी त्याचप्रमाणे गरीब असो वा श्रीमंत दोघांनाही प्रपंच असतोच. तो प्रपंच त्यांच्यापेक्षा

| March 12, 2013 04:03 am

गरीब असो वा श्रीमंत, दोघांना सावली असतेच. सावलीला महत्त्व नाही पण ती असतेच. अगदी त्याचप्रमाणे गरीब असो वा श्रीमंत दोघांनाही प्रपंच असतोच. तो प्रपंच त्यांच्यापेक्षा महत्त्वाचा नसतो, पण तरी दोघांच्याही दृष्टीने त्यांच्यापेक्षाही प्रपंचालाच खूप महत्त्व असतं. हेच स्वतचं विस्मरण! विरक्त पुरुषाचा जगातला वावर कसा असतो, हे सांगताना नाथांनी सावलीचं फार सुंदर रूपक वापरलं आहे. ते म्हणतात, दुनियेत मान मिळो वा अपमान, गरिबी वाटय़ाला येवो की श्रीमंती, स्तुती होवो वा निंदा; या विरक्ताला दोन्हीचं काहीच वाटत नाही. अहो, रस्त्यानं चालताना आपली सावली संगमरवरी फरशीवर पडली काय किंवा गटारात पडली काय, आपल्याला काही सुख-दुखं होतं का? चालताना आपली सावली चिखलात, गटारात पडू नये म्हणून कुणी काळजी करतं का? आता आपला प्रपंच म्हणजे सावली आहे, असं मानून हे रूपक आपण स्वीकारू शकतो का? प्रपंच कसाही होवो, आपल्याला काही देणंघेणं नाही, अशी आपली स्थिती आहे का? नाही! आपण विरक्त नाही. तेव्हा सावलीला महत्त्व नसलं तरी आज आपल्या दृष्टीनं सावलीलाही खूप महत्त्व आहे! पण हा जो काही प्रपंच आपल्या वाटय़ाला आला आहे त्याबद्दल आपण कधी त्रयस्थपणे विचार केला आहे का? सूक्ष्म प्रपंच सोडा, तो सर्वाना सारखाच आहे. पण स्थूल प्रपंचात तर वरकरणी किती फरक असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात नातीगोती असतात पण प्रत्येकागणिक नात्यागोत्यांशी होणारा व्यवहार किती वेगवेगळा असतो. नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकागणिक वेगळा असतोच पण एकाच नात्याकडे पाहण्याचा दोन व्यक्तींचा विचारही वेगवेगळा असू शकतो. प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी यांच्यात प्रेमाचं नातं असतं, पण प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. प्रेमाच्या पूर्तीबद्दल, हमीबद्दल दोन्ही बाजूंचे विचार वेगवेगळे असू शकतात. तेव्हा प्रपंचाची वीण ही नात्यागोत्यांनी बांधली असली तरी ती एकसमान नसते. मग आपल्या प्रपंचात अमुकच माणसं आपल्याबरोबर का आली किंवा अमुक माणसं आपल्याबरोबर का नाहीत, याचं एकसाची उत्तर शोधता येत नाही. कधीकधी रक्ताच्या नात्यांमध्येही परकेपणा असतो आणि मानलेल्या नात्यांमध्ये आत्यंतिक आपलेपणा असतो. काही माणसांविषयी प्रथम भेटीतच आपल्याला आपुलकी वाटते तर काहीजणांबाबत प्रथम भेटीतच तेढ उत्पन्न होते. हे का होतं, याचंही एकसाची उत्तर नाही. ठरावीक माणसं, ठरावीक परिस्थिती आपल्या जीवनात का आली, याचंही उत्तर शोधता येत नाही. ऐन संकटात अनोळखी माणसं आपल्याला अनपेक्षित मदत का करून जातात आणि आपली माणसं काडीचीही मदत का करीत नाहीत? वरकरणी पाहता असं वाटतं की, जीवनाचा प्रवाह सुरू आहे, त्यातली वळणं आपल्याला अनोळखी आहेत. पण तरीही सर्व काही कुणीतरी ठरवून दिलं आहे, बेतल्याप्रमाणे घडत आहे. यालाच एक सोपा शब्द आहे प्रारब्ध! तेव्हा आपला प्रपंच हा प्रारब्धाच्या अदृश्य चौकटीतच सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2013 4:03 am

Web Title: invisible frame
Next Stories
1 ४९. सावली
2 ४८. आस आणि ध्यास
3 ४७. प्रपंचबोध
Just Now!
X