12 August 2020

News Flash

पुतळ्यांचे प्रकरण

निबंधमालेतून जोतिरावांची टर उडवताना शास्त्रीबोवांनी ‘सत्यसमाजमंदिराच्या अग्रभागी जोतिरावांचा संगमरवरी पुतळा त्यांच्या शुभ्र यशाचा स्मारक म्हणून स्थापला जाईल, तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थतत्त्वासंबंधी विचार करता येईल,’

| March 28, 2014 01:17 am

निबंधमालेतून जोतिरावांची टर उडवताना शास्त्रीबोवांनी  ‘सत्यसमाजमंदिराच्या अग्रभागी जोतिरावांचा संगमरवरी पुतळा त्यांच्या शुभ्र यशाचा स्मारक म्हणून स्थापला जाईल, तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थतत्त्वासंबंधी विचार करता येईल,’ असे लिहिले. नंतर टिळकांच्या अनुयायांनी पुण्यात चिपळूणकरांचा पुतळा बसवला. चिपळूणकरांचा पुतळा बहुधा एकुलता एकच राहिला, फुल्यांचे पुतळे मात्र असंख्य आढळतील..
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा मध्यकाळ म्हणजे साधारणपणे इ. स. १८८० च्या आसपासचा कालखंड विचारात घेतला आणि तेव्हाच्याच नेतृत्वाकडे लक्ष दिले असता आपल्याला पुण्यातील पुढाऱ्यांचा एक त्रिकोण दिसून येतो. महात्मा फुले, न्या. रानडे आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर हा तो त्रिकोण होय. पुढच्या पिढीचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे चिपळूणकरांच्या प्रभावळीत प्रवेश करीत होते. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर यांच्यापैकी आगरकर रानडय़ांच्या गटात जाणार होते. दुसऱ्या गोपाळरावांचा म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांचा उदय अद्याप व्हायचा होता. पण तेसुद्धा टिळक-आगरकरांबरोबर काम करता करता नंतर आगरकरांसमवेत रानडय़ांच्याच गटात जायचे होते.
फुले-रानडे-चिपळूणकर या त्रिकुटाचा विचार केला, तर चिपळूणकर ब्राह्मणांचे आणि फुले ब्राह्मणेतरांचे म्हणजे शूद्रातिशूद्र बहुजनांचे नेते होते असे म्हणता येईल. रानडय़ांचे नेतृत्व मात्र सर्वसमावेशक असल्याचे दिसून येते.
उपरोक्त तीन नेत्यांपैकी चिपळूणकर अकाली वारले. त्यांच्या प्रभावळीतील टिळकांशी बरोबरी करण्याची क्षमता असलेले आगरकर नंतर रानडे गटात गेल्याने चिपळूणकरांच्या राष्ट्रीय संप्रदायाचे नेतृत्व आपोआपच टिळकांकडे गेले. इकडे रानडे गटातील आगरकर-गोखल्यांपैकी आगरकर लवकर गेल्यामुळे रानडय़ांची परंपरा गोखल्यांकडे आली, असे स्थूल मानाने म्हणता येते. इकडे सर्वात अगोदर इहलोकाचा निरोप घेतलेल्या चिपळूणकरांच्या परंपरेची धुरा टिळकांवर आल्यामुळे टिळकांना आधी रानडे व नंतर गोखले यांच्याशी झुंजावे लागले. टिळकांची ही लढाई गोखले गेल्यानंतर रँग्लर र. पु. परांजपे या गोखल्यांच्या वारसदाराबरोबर सुरूच राहिली. दरम्यानच्या काळात त्यांची शाहू छत्रपती आणि त्यांचे ब्राह्मणेतर अनुयायी या तुल्यबळ गटाशीही चकमक चालूच होती. पण तो आणखी वेगळा मुद्दा.
महाराष्ट्रातील नेतृत्व युद्धाची एवढी पाश्र्वभूमी सांगून झाल्यानंतर आता परत मागे फुले-रानडे-चिपळूणकर या मूळ त्रिकोणाकडे वळू. पैकी चिपळूणकरांनी फुल्यांवर टीका केली असली, तरी स्वत: फुल्यांनी मात्र (बहुधा चिपळूणकरांच्या लहान वयाचा विचार करून?) त्याबाबत मौनाचेच धोरण पत्करल्याचे दिसते. अर्थात तरीही फुल्यांची बाजू घेऊन कृष्णराव भालेकर यांनी ‘दीनबंधु’ पत्र काढून चिपळूणकरांवर पलटवार केलाच. याच्या उलट फुल्यांनी रानडय़ांवर टीका केली असता रानडय़ांनी फुल्यांना प्रत्युत्तर देण्याचे टाळलेले दिसते. फुले आणि रानडे यांच्यातील वादाची मीमांसा करणारी, प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी लिहिलेली ‘सारेच विलक्षण’ ही कादंबरी ‘मासिक मनोरंजन’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असल्याची माहिती पटवर्धन साहित्याच्या अभ्यासक कै. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी दिली आहे. त्या माहितीवरून पटवर्धन यांचा कल रानडय़ांकडे एकतर्फी झुकल्याचे म्हणता येते.
रानडे आणि चिपळूणकर यांच्यात प्रत्यक्ष वाद झालेला दिसत नाही. चिपळूणकर अधिक जगले असते तर अशा वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. अर्थात, फुले-रानडे वादाप्रमाणे या वादातही रानडय़ांनी मौन पाळून चिपळूणकरांनी केलेली टीका शांतपणे सहन केली असती असे समजायला हरकत नव्हती.
रानडे व चिपळूणकर यांच्या पश्चात त्यांच्या परंपरेतील नेतृत्वाचे काय झाले हे आपण पाहिले. आता याच मुद्दय़ाची चर्चा फुल्यांच्या संदर्भात करणे गरजेचे आहे. फुल्यांच्या पश्चात त्यांचे नेतृत्व पुढे तितक्याच जोरकसपणे चालवील असा नेता निदान पुण्यात तरी उपलब्ध नव्हता. अर्थात त्यांच्यानंतर त्यांच्या प्रभावळीतील पुणेकर मंडळींनी (यात स्वत: सावित्रीबाईसुद्धा आल्या) सत्यशोधक समाज जिवंत ठेवला ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. कृष्णराव भालेकरांनी पत्रसृष्टीत चांगली कामगिरी बजावली असली, तरी त्यांनी फुल्यांची जागा भरून काढली असे म्हणता येत नाही. रानडे व चिपळूणकर यांच्या परंपरा त्यांच्या पश्चात अनुक्रमे गोखले आणि टिळक यांच्यामुळे देशव्यापी झाल्या; तसे फुले परंपरेच्या बाबतीत घडले नाही. मात्र दक्षिण भारतातील ब्राह्मणेतरांच्या चळवळीवर त्यांचा प्रभाव पडला, हे निश्चित. फुल्यांच्या चळवळीचा दक्षिणेतील चळवळीशी सांधा जोडण्याचे श्रेय करवीर शाहू छत्रपतींना द्यावे लागते. अर्थात, दक्षिणेत ब्राह्मणेतर चळवळीचे राजकीय चळवळीत रूपांतर होऊन जस्टिस पार्टीच्या माध्यमातून तिला लक्षणीय यशही मिळाले. आजच्या डी.एम.के.ची पाळेमुळे या जस्टिस पार्टीतच आहेत, असे यश महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ मिळवू शकली नाही.
फुले व शाहू यांच्यामधील काळात या चळवळीला पाठबळ देण्याचे काम एका ब्राह्मणाने केले हे विसरता कामा नये. त्याचे नाव राजारामशास्त्री भागवत. भागवतांनीच शाहू महाराजांना त्यांची धर्मकृत्ये क्षत्रियोचित वेदोक्त पद्धतीने होत नसून शूद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत असल्याचे दाखवून दिले. चळवळीच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण मानावा लागतो. तेव्हापासून या चळवळीची सूत्रेच महाराजांनी हाती घेतली व आपले सर्व बळ, सर्व साधनसामग्री चळवळीत ओतली.
मात्र या प्रक्रियेत म्हणजे फुल्यांची चळवळ शाहू महाराजांकडे जाताना तिच्यात एक महत्त्वाचे परिवर्तन झाले. महात्मा फुल्यांची चळवळ ही शूद्रातिशूद्रांची चळवळ होती. परंपरेच्या दृष्टीने आणि स्वत: फुल्यांच्या मताप्रमाणेही मराठे हे कुणबी शेतकरी असल्यामुळे शूद्रच होते. राजारामशास्त्री हे बंडखोर ब्राह्मण मराठय़ांना क्षत्रिय समजत. त्यामुळे त्यांनी ‘शूद्रातिशूद्र’ शब्दाऐवजी ब्राह्मणेतर शब्द रूढ केला. आता भागवतांनी ब्राह्मणेतर शब्द रूढ करून त्यातही परत मराठय़ांना अग्रस्थान दिल्यामुळे आणि ती चळवळच शाहू छत्रपतींच्या ताब्यात आल्यानंतर चळवळीचे स्वरूप बदलणे स्वाभाविक होते. मात्र याचा अर्थ असा मुळीच नव्हे, की शाहू महाराजांकडून मराठेतर सवर्णाना अतिशूद्रांना पक्षपाताची वागणूक मिळाली. महाराजांनी राजा म्हणून त्यांच्याजवळ असलेली साधनसामग्री, व्यक्तिगत संबंध आणि त्यांच्या स्वत:च्या जातीचे संख्याबळ या सर्व गोष्टी ब्राह्मणेतरांच्याच हितासाठी वापरल्या. विशेषत: अस्पृश्य बांधवांनी स्वावलंबी होण्यासाठी व आपल्यातील नेता शोधण्यासाठी सक्रिय प्रोत्साहन दिले. त्याचाच परिणाम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र नेतृत्व उदयास येऊ शकले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत महाराजांना आपल्याच जातीच्या एका मातब्बर नेत्याच्या विरोधी भूमिका घ्यावी लागली. तो नेता म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे.
जोतिरावांनी वेदप्रामाण्याच्या विरोधी भूमिका घेतली होती व ब्राह्मण वगळता सर्व सवर्ण शूद्र असल्याचा त्यांचा पवित्रा होता. याउलट शाहूंनी वेदप्रामाण्याचा स्वीकार करून वेदांच्याच चौकटीत क्षात्रजगद्गुरूपीठाची निर्मिती केली. शिवाय ही चौकट गृहीत धरूनच मराठय़ांसह सवर्ण ब्राह्मणेतरांच्या क्षत्रियत्वाचा उद्घोष केला. त्यांची ही कृत्ये वरकरणी फुल्यांच्या भूमिकेच्या अगदी विरोधी वाटतात. पण तरीही शाहूंनी फुल्यांची चळवळ पुढे चालवली व पुढे नेली असेच म्हणावे लागते. सामाजिक व्यवहारच असे गुंतागुंतीचे असतात की त्यांच्यात विसंगतीमधील सुसंगती व विरोधातील पाठिंबा असा द्वंद्वात्मक शोध घ्यावा लागतो.
असाच काहीसा प्रकार टिळक आणि गांधी यांच्या संदर्भात घडल्याचे दिसून येते. त्याचे सविस्तर विवेचन मी माझ्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथातून केलेले आहे. वरवर पाहणाऱ्याला गांधींची अहिंसेसारखी तत्त्वे टिळकांच्या राजकारणाशी विरोधी वाटायची. पण तरीही स्वातंत्र्यलढय़ाच्या नेतृत्वाचा इतिहास लिहिताना आपण टिळकांनंतर गांधींनी या लढय़ाचे नेतृत्व केले असे म्हणतो आणि ते योग्यच आहे. या मुद्दय़ावरून टिळकांच्या मृत्यूनंतर टिळकानुयायांमध्ये केवढी रणे माजली होती, याची जाणकारांना कल्पना आहेच. तसा काही प्रकार मात्र फुले-शाहू या संक्रमणात झालेला दिसत नाही. शाहूंच्या नंतर मात्र चळवळीत ब्राह्मणेतरांमध्येच मराठे व मराठेतर असा वाद उत्पन्न झाला व त्याचा उपसर्ग आपल्या चळवळीला होऊ नये म्हणून डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यांच्या चळवळीचा सवतासुभा मांडावा लागला.
शेवटी या नेतृत्व त्रिकोणातील फुले व चिपळूणकर यांच्या वादाचा संदर्भ पुढे नेत एका गमतीच्या गोष्टीचा उल्लेख करतो. महाराष्ट्राच्या चर्चाविश्वात आणि कृतिविश्वात पुतळा या प्रकरणाला विशेष महत्त्व आहे. निबंधमालेतून जोतिरावांची टर उडवताना शास्त्रीबोवांनी आपल्या खास शैलीत ‘सत्यसमाज मंदिराच्या अग्रभागी जोतिरावांचा संगमरवरी पुतळा त्यांच्या शुभ्र यशाचा स्मारक म्हणून स्थापला जाईल, तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थ तत्त्वासंबंधी विचार करता येईल,’ असे लिहिले.
१९२५ च्या दरम्यान टिळकांच्या अनुयायांनी पुण्यात चिपळूणकरांचा पुतळा बसवून त्याचे खुद्द गांधींच्या हस्ते अनावरण करवले. जेधेप्रभृती सत्यशोधकांच्या फुल्यांचा पुतळा बसवण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
आज शतक पूर्ण व्हायच्या आतच चिपळूणकरांचा पुतळा बहुधा एकुलता एकच राहिला आहे. फुल्यांचे पुतळे मात्र असंख्य आढळतील. माझ्या मुलाला ज्या शाळेत घातले ती चिपळूणकर-टिळक परंपरेतील शाळा असल्याने गणवेशाच्या सदऱ्यावर चिपळूणकरांचे चित्र असलेला बॅज लावण्यात येतो. तो शर्ट घालून मिरवणाऱ्या चिरंजीवांना मी हा कोणाचा फोटो असे विचारले असता त्यांनी ‘महात्मा फुल्यांचा’ असे उत्तर दिले. कारण त्या पिढीतील मुलांना मोठे पागोटे घालणारा एकच माणूस माहीत आहे आणि तो म्हणजे महात्मा जोतिराव फुले!
चिपळूणकरांचे औपरोधिक भाकीत इतके खरे ठरावे असे मलाही वाटत नाही. यालाच काव्यगत न्याय  म्हणतात काय?
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2014 1:17 am

Web Title: issue of stachus
Next Stories
1 मिळती मिसळती परिस्थितीशी
2 न्यायालयीन नेतागिरी
3 अभ्यासेतर बालभारती
Just Now!
X