मौज आणि सत्यकथेच्या लेखकांसाठी राम पटवर्धनांनी एवढी मेहनत का घेतली, यामागची कारणे आज शोधता येतात, त्यातून पटवर्धनांनी केलेले काम का मोठे आहे हेही समजते.. पण याच शोधादरम्यान पटवर्धन अद्वितीयच कसे, याची काहीशी दुखरी जाणीवही होऊ शकते..
राम पटवर्धन यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, हे त्यांच्या निधनानंतर काहीजणांना कळले असेल. त्यांच्या संपादनाखाली निघणारे ‘सत्यकथा’ बंद होऊन आता ३२ वर्षे होतील, तर मौज प्रकाशनगृहातून त्यांनी पत्करलेल्या निवृत्तीलाही उणीपुरी २५ वर्षे लोटली आहेत. पटवर्धन गेली सुमारे पाच वर्षे वयोपरत्वे आजारी होते. तरीही इंग्रजीतून मराठीत झालेल्या अनुवादाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांच्या ‘पाडस’चा उल्लेख जसा वारंवार होई, तसाच ‘असा संपादक होणे नाही’ या शब्दांत त्यांची आठवण निघे. राम पटवर्धन यांनी या जगात असणे वा नसणे, हे त्यांच्याबद्दलचा आदर कमीजास्त होण्याचे मोजमाप कधीच नव्हते. साहित्यक्षेत्रात गेली काही वर्षे अगदीच मोजके काम त्यांनी केले, तरीही ते कार्यरत आहेत याचेच अप्रूप अनेकांना वाटे. असा आदर फार कमी जणांच्या वाटय़ास येतो. सत्यकथा मासिकाचे आणि मौज प्रकाशनगृहाच्या पुस्तकांचे संपादक म्हणून कारकीर्द करताना पटवर्धन यांनी दाखवलेला मोकळेपणा, काळासोबत राहण्याची त्यांनी दाखवलेली तयारी आणि लेखकांसाठी एक संपादक म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत, ही त्यांच्याबद्दलच्या आदराची प्रमुख कारणे. हे सारे सहजपणे करताना अहंभाव विसरण्याचे कितीतरी मापदंड पटवर्धनांनी उभे केले. पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार यांपैकी कशाच्याही मागे न लागता काम करत राहणाऱ्यांना चटकन ऋ षितुल्य व्यक्तिमत्त्व किंवा योगीच ठरवून टाकण्याची प्रथा हल्ली रुळली आहे. अलीकडे- म्हणजे व्यासपीठावर माणूस चढला रे चढला की तो दिग्गजच ठरणार, असा काळ सुरू झाला तेव्हापासून. परंतु ही ऋषितुल्य वगैरे विशेषणबाजी पटवर्धनसरांना आवडली नसती.. त्यांनी मुद्दा काढला असता : मला मी जे करतो त्यातून आनंदही मिळतो, ऋषींना मिळतो की नाही न कळे.. असा किंवा आणखी निराळा! योगी म्हणावे तर पटवर्धनांनी स्वत:च योगाचार्य बी. के. अय्यंगारांच्या योगदीपिकेचा सुगम्य अनुवाद केलेला.. योगसाधकाच्या विविधावस्था त्यांना चांगल्याच अवगत असणार.
तेव्हा अशी विशेषणे न लावता पटवर्धनांकडे आपले काम अत्यंत समरसून आणि चोखपणे करणारा माणूस म्हणून पाहणेच योग्य. प्रेरणा असल्याखेरीज माणूस कार्यरत होत नाही आणि या प्रेरणा काही शिकवून निर्माण होत नाहीत. पटवर्धन यांच्या वैचारिक जडणघडणीचा काळ हाच भारतीय स्वातंत्र्याचा उष:कालही आहे, हे लक्षात घेतले की प्रेरणादायी वातावरणाचा अदमास लागू शकतो. आजचे जग आजच्या माणसांनी घडवायचे आहे, ही त्या काळातील महत्त्वाची आणि सर्वव्यापी प्रेरणा. या प्रेरणेला काही असमाधानांची जोड मिळाल्याने जी निर्माण होते, ती तळमळ. पटवर्धन यांना हे असमाधानही विपुल लाभले. फडके-खांडेकर लोकप्रिय आहेत, पण पुरेसे नाहीत, जगाच्या साहित्यिक प्रांगणात- ब्रिटिश वा अमेरिकी लेखकांच्याही पलीकडे महत्त्वाचे लेखक आहेत आणि मराठीची मूठ त्या दृष्टीने झाकलेलीच आहे, हे असमाधान त्यांच्या महाविद्यालयीन वयातही त्यांना असावे. त्यातच श्रीपु, ज्ञानेश्वर नाडकर्णी, ग. रा. आणि त्यांचे बंधू उमाकांत कामत यांसारख्या जगाचे भान असणाऱ्यांचे मैत्र लाभल्याने पटवर्धनांना त्यांचे श्रेयस सापडले. ‘सांस्कृतिक ऊर्जा’ असा शब्द ज्ञानेश्वर नाडकर्णीवरील एका लेखात पटवर्धनांनी वापरला आहे. ‘संभाषण व्यापक झाले’ हा साधा शब्दप्रयोग व्यापक अर्थाने पटवर्धनांनी केला आहे, ते हे श्रेयस. सांस्कृतिक ऊर्जेच्या आकर्षणामुळे आणि वैचारिक, चिंतनशील, साहित्यिक ‘संभाषणांची व्याप्ती’ मराठीसाठी वाढवणे हे आपले खरे काम, अशी खूणगाठ बांधल्यामुळेच काही प्राध्यापकी/ शिक्षकी वळणाची कामे आणि संपादन यांत लौकिक यश किती, हा प्रश्न बाजूला ठेवून ते काम करू शकले. आपल्या कामाची गमके त्यांना सापडली.. त्यापैकीच एक गमक म्हणजे ‘संपादन हे संगोपनासारखे असते’. पण याहून मोठे म्हणजे पटवर्धनांनी कितीकांच्या मजकुरांचे- कथांचे किंवा लेखांचे संगोपन केले असेल, याची मोजदाद म्हणजे १९६० ते १९८० या काळातील मराठी साहित्याने गाठलेल्या उंचीचा इतिहास. मुळात ‘गुरूंची गादी’ असे काहीसे नाव असलेल्या आशा बगे यांच्या कथेला ‘मारवा’ हे नाव देणे असो की सानियांसारखी लेखिका घडवणे किंवा गौरी देशपांडे यांना त्यांचे अलिप्ताळे टिकवू देणे.. ‘पावसाळा’ नावाच्या चित्राबद्दल तरुण अनिल अवचटांनी लिहिलेला लेख असो की त्या वेळचे ज्येष्ठ कलाध्यापक संभाजी कदम यांनी सौंदर्यानुभवाबद्दल केलेले लिखाण.. या साऱ्याला मौज-सत्यकथेचे कप्पे खुले करतानाच पटवर्धन राजकीय चिंतनपर लिखाणाकडेही पाहात होते. राजकीय जाणिवांचा आविष्कार लेखक अथवा कवींनी केला पाहिजे, हे पटवर्धनांना मनोमन पटले होते.
पटवर्धनांनी केवळ या लेखकांचे वा त्यांच्या मजकुराचे संगोपन -संपादन या अर्थाने- केले असे नव्हे. ‘सत्यकथा मासिक संपले तरी सत्यकथा नावाची गरज मराठीत कायम राहील’ असे त्या वेळच्या तरुण विरोधकांनीही कबूल करावे, इतक्या सांस्कृतिक ऊर्जेची निर्मिती पटवर्धनांच्या प्रयत्नांमुळे मराठीत झाली होती. या ऊर्जेचे संगोपन त्यांनी केले.
.. त्यांच्यानंतर तिचे काय झाले हा प्रश्न निराळा.