सत्तावडाच्या सावलीत आपापल्या राहुटय़ा उभारण्यातच सर्वानी आनंद मानावयाचा असे ठरवलेले असल्याने त्याबाबत अलीकडच्या काळात एक सार्वत्रिक आणि भयाण अशी शांतता पाळली जात असल्याचे अनुभवास येते. साहित्य संमेलनही त्यास अपवाद नाही. अशा वेळी संमेलनांचं भरघोस वृत्तांकन ही प्रथा मोडीत निघाल्यास गैर ते काय?
काळाच्या ओघात काही प्रथा कालबाहय़ ठरतात आणि त्यांना मूठमाती देणेच योग्य असते. हा नियम प्रसारमाध्यमांनाही, त्यातही वर्तमानपत्रांना, लागू होतो. परंतु कोणत्याही समाजघटकाप्रमाणे वर्तमानपत्रेही कालबाहय़ प्रथांचे मूल्यमापन करण्यात वा त्यांचा त्याग करण्यात कमी पडत असतात. यातील दुसरी बाजू अशी की वर्तमानपत्र चालकांवर वाचकांच्या अपेक्षांचे म्हणून एक दडपण असते. हा वाचक नावाचा घटक विचाराने एक नसतो आणि त्यातील उपघटकांकडून पुन्हा त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रथा पाळण्याविषयी दबाव येत असतो. अर्थात तो किती घ्यावा याचे जरी स्वातंत्र्य वर्तमानपत्रकर्त्यांना असले तरी बरेचसे वाचकानुनयातच आनंद मानीत असल्याने या प्रथांचे दळण दळणे अखंडित सुरू राहते. अशांतील एक प्रथा म्हणजे साहित्य संमेलनाचे वृत्तांकन वर्तमानपत्रांनी कशा प्रकारे करावे याचे काही तयार झालेले संकेत. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी या संमेलनाच्या अध्यक्षाचे विचारपरिप्लुत असे भाषण, त्याची विचार मौक्तिके सविस्तर प्रसिद्ध करणे अपेक्षित असते. आजही काही जण ही प्रथा पाळताना दिसत असले तरी या साऱ्या प्रक्रियेच्या मूल्यमापनाची वेळ निश्चितच आलेली आहे याचे भान या गतानुगतिकांना नाही. हे मूल्यमापन करावयास हवे, याची प्रमुख कारणे दोन.
पहिले म्हणजे ज्या काळी ही प्रथा जन्माला आली त्या काळी २४ तास चालणारी दूरचित्रवाणी सेवा नव्हती. परिणामी साहित्य संमेलनाच्या वार्षिक सोहळय़ात काल काय काय घडले याचा चक्षुर्वैसत्यम वृत्तांत वाचणे ही सुसंस्कृत वाचकांची निकड असायची. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी झालेली भाषणे हा भुकेलेल्या वाचकांसाठी बौद्धिकामृताचा ठेवा असे. या संमेलनाच्या अध्यक्षाने आपल्या भाषणात मांडलेले विचार, गतवर्षीच्या अध्यक्षाने पायउतार होताना सादर केलेली अनुभवनिरीक्षणे आणि त्या जोडीला संमेलनाच्या उद्घाटकाने व्यक्त केलेल्या भावना हे सर्व वाचण्यास वाचक अधीर असत आणि माध्यमेही अधिकाधिक प्रतिनिधी पाठवून या आनंदापासून वाचक वंचित राहणार नाहीत याची काळजी घेत. तथापि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारानंतर चित्र बदलले. सुरुवातीस सरकारी मालकीच्या दूरदर्शनची या साहित्य व्यवहारावर मालकी होती. ती शाबूत ठेवत दूरदर्शन या संमेलनाच्या उद्घाटनाचा काही अंश थेट प्रकाशित करीत असे आणि नंतर त्याचा सविस्तर वृत्तांतदेखील सादर केला जात असे. या चित्रात आमूलाग्र बदल झाला खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रसारानंतर. या २४ तास चालणाऱ्या वाहिन्यांची भूक मोठी. ती भागवण्यासाठी काही ना काही चारा वा कडबा या वाहिन्यांना चघळण्यासाठी देणे गरजेचे असते. त्यांच्यासाठी ही संमेलने ही पर्वणीच ठरली. या माध्यमांच्या भुकेचा प्रश्न साहित्य संमेलनामुळे दोन-तीन दिवसांसाठी तरी सुटतो. त्यामुळे या सगळय़ाचे थेट प्रक्षेपण करण्यास त्यांनी सुरुवात केली. परिणामी साहित्य संमेलनास सदेह जावयास न मिळालेल्यांची इच्छा तेथील थेट प्रक्षेपणामुळे काही अंशी तरी भागू लागली. तेव्हा अशा वेळी साहित्य संमेलनांचे थेट प्रक्षेपण होत असताना वर्तमानपत्रांनी दुसऱ्या दिवशी अध्यक्षीय भाषणांच्या विचारसुमनांनी रकानेच्या रकाने भरण्याची गरज किती या प्रश्नाचा विचार व्हावयास हवा.
दुसरे कारण याहून अधिक महत्त्वाचे. ते बऱ्याच प्रमाणात रविवारी पार पडलेल्या साहित्य संमेलनास लागू पडते. ते म्हणजे साहित्य संमेलनांतील मजकुराचा झपाटय़ाने घसरणारा दर्जा. या संमेलनातून साहित्य, साहित्य आणि जीवन यांच्यातील व्यामिo्र अशा संबंधांवर काही भाष्य होणे अपेक्षित असते. ती अपेक्षा ही संमेलने पूर्ण करतात काय? या संमेलनांचे अध्यक्षीय पद भूषवणाऱ्या, खरे तर पटकावणाऱ्या, साहित्यिकाचे स्वत:चे असे काही जीवनविषयक तत्त्वज्ञान असायला हवे ही किमान अपेक्षा. मग ते काहीही असो. निखळ मनोरंजन हेदेखील एखाद्याच्या साहित्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान असू शकते आणि त्यात काही गैर आहे असे नाही. परंतु सत्तावडाच्या हाती मिळेल त्या पारंबीस लोंबकळत राहून मिळेल ते पदरात पाडणे हेच जर एखाद्याचे जीवनमूल्य असेल तर अशा साहित्यिकाकडून रसदार साहित्याची आणि काही एका विचाराची अपेक्षा करता येईल काय? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असेच असावयास हवे. परंतु या सत्तावडाच्या सावलीत आपापल्या राहुटय़ा उभारण्यातच सर्वानी आनंद मानावयाचा असे ठरवलेले असल्याने त्याबाबत अलीकडच्या काळात एक सार्वत्रिक आणि भयाण अशी शांतता पाळली जात असल्याचे अनुभवास येते. परिणामी ज्याचा नाटय़ या कलाकृतीशी.. ‘नाटकां’शी नव्हे.. दूरान्वयानेदेखील काही संबंध नाही अशांची वर्णी नाटय़ परिनिरीक्षण मंडळांवर लावली जात असते आणि एरवी कला, स्वातंत्र्य आदी मुद्दय़ांवर जनसामान्यांच्या अंगावर डाफरणारी कलावंत मंडळी व्यक्त होण्याऐवजी मौनातच आनंद मानताना दिसतात. आपल्या नावाची फोड करताना एखादा साहित्यिक फक्त मुलींसाठी असे विधान करीत असेल तर अशा साहित्यिक कलावंताच्या शरीरास आणि विचारास काही बौद्धिक कणा आहे असे मानणे कितपत योग्य? रानातल्या कवितांचे गायन राजदरबारी करीत एखादा कवी स्वत:च्या शेतघरात वापरल्या गेलेल्या विजेचे बिल माफ केले जावे यासाठी आपली सरस्वतीच्या दरबारातील प्रतिष्ठा पणास लावीत असेल तर अशा कवीकडून कोणत्या जीवनविषयक भूमिकेची अपेक्षा मायबाप रसिकांनी करावयाची? या प्रश्नांची उत्तरे शोधणेदेखील वेदनादायी ठरत असताना त्याहूनही क्लेशकारक असा प्रकार महाराष्ट्र सारस्वताच्या अंगणात अलीकडे वारंवार घडताना दिसतो. तो असा की साहित्य आणि वाङ्मय व्यवहारातील वैचारिकतेचे वाण अलीकडे एकूणच घसरत चाललेले असल्याने याची जाणीव असणारे संधिसाधू अलीकडच्या काळात वृत्तपत्रे आदींच्या संपादकांनाच विचारवंत असे संबोधताना दिसतात. मराठीतील एकूणच विचार आणि साहित्यविश्वावर असलेल्या वर्तमानपत्रीय मक्तेदारीमुळे संपादकांनाच विचारवंत संबोधणे यात परस्परांची सोय यापलीकडे अन्य काही नाही. अलीकडच्या काळातील नरहर कुरुंदकर वा दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या लखलखीत विचारशलाकांना वर्तमानपत्रांची गरज नव्हती. कोणत्याही वर्तमानपत्राचे वा नियतकालिकाचे संपादकपद न भूषवितादेखील विचारवंतपदास पोहोचण्याएवढी त्यांच्या लेखनाची झेप होती. परंतु हल्ली मराठी ग्रंथविश्वात दुडक्या चालीसदेखील उत्तुंग झेप म्हणावयाची पद्धत रूढ होत असल्यामुळे दैनिकांचे रहाटगाडगे सांभाळणाऱ्याच्या डोक्यावर विचारवंत या पगडीची उपाधी घालणे सुरू झाले आहे आणि आपल्या डोक्याचा आकार काय याचे भान नसलेलेही यात वृथा आनंद मानू लागले आहेत. एखाद्या नगरसेवकास दिग्गज राजकारणी म्हणावे तसेच हे. याच्या जोडीला आणखी एका प्रथेचा उल्लेख करणे गरजेचे आहे. अलीकडे साहित्य संमेलनाच्या खर्चास हातभार लावणाऱ्यास स्वागत समितीचे अध्यक्षपद बहाल केले जाते. संमेलनासाठी जमणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्याची सोय केल्याची कृतज्ञता म्हणून हे योग्य असले तरी ती व्यक्त करताना संमेलन हे साहित्यिकांचे असणे अपेक्षित आहे याचाच विसर पडताना दिसतो, त्याचे काय? त्यात काही प्रतिभावंताना दिवस उजाडल्या उजाडल्याच साहित्याची गरज भासू लागते. त्यांचीही सोय स्वागताध्यक्षाकडून होत असल्याने हे साहित्यिक मग बसता उठता साहेब, साहेब करीत ती करणाऱ्यासमोर गोंडा घोळताना दिसतात.
तेव्हा मुद्दा हा की या सगळय़ाशी साहित्याचा संबंधच काय. संबंध आहे तो फक्त संमेलनांचा आणि ते आयोजित करणाऱ्यांच्या हितसंबंधांचा. अशा वेळी साहित्य संमेलनांचं भरघोस वृत्तांकन ही प्रथा मोडीत निघाल्यास गैर ते काय? या पाश्र्वभूमीवर साहित्य, समाज आणि साहेब यांच्यातील संबंधांवर साधकबाधक चर्चा व्हावी हीच लोकसत्तेची इच्छा.