12 December 2017

News Flash

तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र

आजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य

श्रीनिवास हेमाडे - tattvabhan@gmail.com | Updated: July 3, 2014 2:44 AM

आजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी.. तर्कशास्त्राचे उचित महत्त्व जाणून ते भारतीय परंपरांना लावून पाहिले, तर काय दिसेल?
माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, (मॅन इज रॅशनल अ‍ॅनिमल) ही व्याख्या अ‍ॅरिस्टॉटलने दिली असा एक समज आहे. अ‍ॅरिस्टॉटलचे मूळ शब्द zoon logikon असे आहेत. zoon हा शब्द zoo पासून बनतो. Logikon चा अर्थ ‘विचारशील’ असा होतो की नाही, हे निश्चित नाही. कारण logikon या संकल्पनेत मन, आत्मा, विश्वातील सुव्यवस्था राखणारी नियंत्रक शक्ती, वैश्विक बुद्धी इत्यादी अर्थ सामावलेले आहेत. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते माणसाकडे अशी एक बौद्धिक शक्ती किंवा तत्त्वे आहेत की ज्यांच्या साह्य़ाने माणूस जीवनात सुसंगत प्रकल्प राबवितो. या logikon ची सुव्यवस्थित रचना ते  Logic.
इंग्लिशमधील लॉजिक या शब्दाचे भाषांतर म्हणून भारतीय भाषांमध्ये तर्कशास्त्र हा शब्द वापरला जातो. लॉजिक या अर्थाचा प्रत्यय लागूनच बायॉलॉजी, अँथ्रपॉलॉजी, सोश्ॉलॉजी, सायकॉलॉजी, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, फिलॉलॉजी, मॉफरेलॉजी असे नवे शब्द किंवा विषयांची नावे बनतात. प्रत्येक ज्ञानशाखा आपले ‘लॉजिक’ विकसित करूनच आपला संसार करते. तर्कशास्त्र ही तत्त्वज्ञानाची मुख्य शाखा आहे.
विचार करणे ही कृती म्हणजे जग आणि जगाचे विविध घटक, घटना, नियम, त्यांचा परस्परसंबंध समजावून घेणे असते. पण बेशिस्त विचार म्हणजे विचार नव्हे. विचार करणे, विचारांचे नियम पाळून सत्य व युक्त विचार करणे, योग्य निष्कर्षांला येणे; ही बाब निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्या वेळी विचार कसा करावा, हाच एक विचार होतो आणि त्याचाही विचार करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र.
तर्काचे साधे नाव अंदाज किंवा अनुमान. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय घडामोडी किंवा सूर्यग्रहण, हवामान, पाऊसपाणी, दुष्काळ या नसíगक घटनांचे अंदाज आणि महागाई, बाजार, गुन्हेगारी इत्यादी त्यास जोडले गेलेले इतर घटक याविषयी अंदाज व्यक्त केले जातात, पण प्रत्येक अंदाज हा योग्य तर्क असतो, असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्य घटनांचा आधार असतो. अंदाज व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित असतो. तर्क शास्त्रीय असतो; तर अंदाज भावनिक, अशास्त्रीय असतो.
तर्कशास्त्र हे सत्य आणि युक्त अनुमानांची रचना करणारे शास्त्र असते. साधारणत:  अनुमानात काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली असतात किंवा तात्पुरती सत्य मानलेली असतात आणि त्यांच्यापासून इतर काही विधाने निष्पन्न केली जातात. सत्य म्हणून स्वीकारलेल्या विधानांना आधारविधाने म्हणतात आणि आधारविधानांपासून निष्पन्न केलेल्या विधानास निष्कर्ष म्हणतात. अनुमानाचे काही नियम असतात. त्या नियमांचा भंग झाला, तर त्याला ‘तर्कदोष’ म्हणतात. तर्कदोष करावयाचे नसतात आणि करू द्यावयाचे नसतात. तर्कशास्त्रात अनुमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण करून त्यांच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात येते आणि ही वेगवेगळ्या प्रकारची अनुमाने प्रमाण कधी असतात, प्रामाण्याच्या अटी कोणत्या याची चिकित्सा करण्यात येते.
तर्कशास्त्राचे साधारणत: तीन प्रकार करता येतात. अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र, मध्ययुगातील लॉर्ड फ्रान्सिस बेकनचे (१५६२-१६२६) नवे तर्कशास्त्र आणि एकोणिसाव्या शतकातील आधुनिक किंवा आकारिक तर्कशास्त्र. बेकनच्या तर्कशास्त्राने विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीला जन्म दिला. आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात प्रामुख्याने गणितात वापरण्यात येणाऱ्या अनुमानांचे विश्लेषण केले जाते. चिन्हांचाही सढळ वापर करण्यात येतो. त्यास ‘गणिती तर्कशास्त्र’ किंवा ‘चिन्हांकित तर्कशास्त्र’ म्हटले जाते. या नव्या तर्कशास्त्राच्या तुलनेत अ‍ॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला पारंपरिक तर्कशास्त्र असे नाव दिले गेले. हे सगळे पाश्चात्त्य तर्कशास्त्र आहे. इंग्रजी विद्य्ोचा एक भाग म्हणून पाश्चात्त्य तर्कशास्त्राचा प्रवेश भारतीय शिक्षणव्यवस्थेत विसाव्या शतकात झाला.
प्राचीन भारतातही असे अनुमानाचे तर्कशास्त्र विकसित झाले. त्यास अनुमानशास्त्र असे नाव आहे. ते मुख्यत: न्यायदर्शन या वैदिक प्रणालीने मांडले. यात अनुमानांचे स्वरूप, प्रकार व प्रामाण्य यांविषयी सूक्ष्म विचार झाला आहे. अक्षपाद गौतमाने (सु. दुसरे शतक) न्यायसूत्रे लिहिली, असे समजले जाते. इ. स. पू. पाचव्या शतकापासून तो इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंतच्या कालखंडात ती रचली गेली असावीत, असे मानले जाते. न्यायसूत्रांत सोळा विषयांचे म्हणजे पदार्थाचे विवेचन केले आहे. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती व निग्रहस्थान. या पदार्थाचे तत्त्वज्ञान झाल्याने नि:श्रेयस प्राप्त होते, असे म्हटले आहे. न्यायदर्शनाला युक्तिवादाचे शास्त्र म्हणजे न्यायविद्या, हेतुविद्या किंवा न्यायशास्त्र अशीही नावे आहेत. तथापि केवळ न्यायदर्शन म्हणजे भारतीय तर्कशास्त्र असे समजणे चूक आहे. भारतीय तर्कशास्त्रात अवैदिक बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनातील अनुमान विचाराचाही समावेश होतो. पण वैदिक विचारांचा प्रभाव व दबाव इतका जोमदार होता की केवळ वैदिक न्यायदर्शनाला  भारतीय तर्कशास्त्र हा दर्जा प्राप्त झाला. प्राचीन भारतात व्याकरण आणि न्यायशास्त्राचे अध्ययन जवळपास सक्तीचे होते.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला त्या वेळी भारतीय तर्कशास्त्राची जाणीव अभ्यासकांना झाली. आज जागतिक स्तरावर भारतीय तर्कशास्त्राचा जोमाने, अतिशय चिकित्सक, काटेकोर आणि सखोल अभ्यास चालू आहे.
पण प्राचीन काळापासून भारतीय विचारविश्वाची शोकांतिका अशी की भारतात विचार करणे, ज्ञान निर्माण करणे हे ‘साध्य’ मानले गेले नाही. ते ‘साधन’ मानले गेले. अद्वैत वेदान्त आणि मोक्ष हेच भारतीय तात्त्विक विचारविश्वाच्या अग्रभागी राहिले. तर्क करणे, हा बुद्धिभेद समजला गेला. तर्काला प्रतिष्ठा दिली गेली नाही. महाभारतातील यक्षप्रश्न-नाटय़ात यक्ष धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न विचारतो ‘क: पन्था:?’  कोणता मार्ग अनुसरावा? धर्मराज उत्तर देतो –  
तर्क: अप्रतिष्ठ: श्रुतय: विभिन्ना:।
न एक: मुनि: यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महाजन: येन गत: स: पन्था:?
याचा अर्थ तर्काला प्रतिष्ठा नसते.. आदरणीय लोक ज्या मार्गाने जातात, त्याच मार्गाने जावे. या प्रश्नात ज्ञानाचे साधन असलेला तर्क बाजूलाच राहिला आणि धर्म गूढ बनला. रामायण, महाभारतातसुद्धा तर्काची िनदा आढळते. मनुस्मृतीनुसार जो तर्क करतो त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. म्हणून जो तर्काचा आश्रय करेल त्याला बहिष्कृत करावे. ‘गंधर्वतंत्र’ या ग्रंथानुसार तर न्यायशास्त्राचे अध्ययन करणाऱ्यास शृगालयोनी (कोल्हा) प्राप्त होते.
आज, न्यायदर्शनाचा अभ्यास करणे, हे आव्हान मानले पाहिजे. न्यायशास्त्र हे वादविद्य्ोचे कुंपण आहे, त्यात सहजासहजी प्रवेश मिळणार नाही, असे न्यायदर्शनाचे वर्णन केले जाते. काही प्रश्न उपस्थित करता येतील. पाश्चात्त्य तर्कशास्त्राने जसे विज्ञान व वैज्ञानिक पद्धती निर्माण केली तशी भारतीय तर्कशास्त्राने केली का? न्यायदर्शनातील ‘जाती’ ही संकल्पना आणि प्रत्यक्षातील जातिव्यवस्था यांचा काही संबंध आहे का? उदाहरणार्थ, न्यायदर्शनाच्या मते, जाती हा पदार्थ आहे. जाती संख्येने नेहमी एकच असते आणि नेहमी अक्षय्य असते. न्यायदर्शनाची ‘जाती’ ही संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेतील जातीस लागू करता येते का? न्यायदर्शनाच्या ‘जाती’ व्यवस्थेकडे एक प्रारूप म्हणून पाहिले आणि त्याचे उपयोजन प्रत्यक्ष जातिव्यवस्थेशी जोडून पाहिले तर कोणते चित्र मिळेल? कशी मांडणी करता येईल? जाती संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेच्या रचनेचे आणि तिच्या अविनाशीत्वामागील ‘छुपे तर्कशास्त्र’ मानता येईल काय? आज भारतीय प्रबोधनाचे नवे प्रश्न आणि आंबेडकरवादाचा विस्तार या अर्थाने विचारता येईल.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक

First Published on July 3, 2014 2:44 am

Web Title: logic science of thought