News Flash

सुरक्षा व्यवस्थेतील शैथिल्य

हैदराबादमधील स्फोटांच्या तपासात काही निश्चित सूत्र सापडण्याआधीच आरोपांची माळ लावून देण्यात आली. तपासाअंती नव्हे तर आधीच निष्कर्ष काढण्याची सवय आपल्याला असल्यामुळे दहशतवादावरील चर्चाना गावगप्पांचे स्वरूप

| February 25, 2013 12:23 pm

हैदराबादमधील स्फोटांच्या तपासात काही निश्चित सूत्र सापडण्याआधीच आरोपांची माळ लावून देण्यात आली. तपासाअंती नव्हे तर आधीच निष्कर्ष काढण्याची सवय आपल्याला असल्यामुळे दहशतवादावरील चर्चाना गावगप्पांचे स्वरूप येते. त्याचबरोबर मतांच्या राजकारणाचे भूत बसलेले असल्यामुळे तटस्थ तपास अशक्य होतो. हैदराबादमधील स्फोट कुणी केले याचा खात्रीपूर्वक दुवा अद्याप हाती आलेला नाही. काही शक्यता आहेत आणि केवळ शक्यतांवर अवलंबून वक्तव्ये वा कारभार करणे यामध्ये व्यावसायिकता नाही वा दहशतवाद निपटून काढण्याची इच्छाशक्ती नाही. माध्यमांमध्ये तर सरकारपेक्षाही अधिक बेजबाबदारपणा दिसतो. हैदराबादमधील घटना दहशतवादाच्या कोणत्या प्रकारात बसवावी याचे भान चित्रवाणीवरून चर्चा करणाऱ्या तज्ज्ञांनाच नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना गावगप्पा केल्याबद्दल दोष देता येणार नाही. देशाबाहेरून मदत मिळणारा दहशतवाद, सुव्यवस्थित-नियोजनबद्ध आणि सातत्याने चालणारा देशांतर्गत दहशतवाद आणि आकस्मिक दहशतवाद असे तीन प्रकार भारताला भेडसावतात. हैदराबादमधील स्फोट हे तिसऱ्या प्रकारातील असावेत हे स्फोटांच्या स्वरूपावरून लक्षात येते. अशा घटनांमागे स्थानिक घटक महत्त्वाचे असतात आणि ते रोखणे हे राज्य पोलिसांचे काम असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गटांच्या हालचालींची जितकी माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना असते तितकी स्थानिक गटांची नसते. स्फोट झालेल्या दिलसुखनगर भागात गेले काही महिने धार्मिक तणाव होता. ओवेसीसारखे आगलावे आज तेथे आहेत, पण बिलालसारख्या कडव्या दहशतवाद्याचे ते जन्मस्थान होते. तो डोईजड झाल्याने आयएसआयने त्याला संपविले असे म्हणतात. ओवेसीच्या कृत्यांना प्रत्युत्तर म्हणून तेथे हिंदूंची एकजूट वाढत चालली होती. या पाश्र्वभूमीवर हे स्फोट झाल्यामुळे स्थानिक दुवे अधिक महत्त्वाचे ठरतात. ते तपासण्याअगोदर इंडियन मुजाहिदीन वा पाकिस्तानला थेट दोष देणे केवळ बेशिस्तीचे नसून दिशाभूल करणारे आहे. दहशतवाद रोखणारी यंत्रणा स्थानिक पातळीपर्यंत सक्षम करण्यात आपल्याला आलेले अपयश हे या स्फोटाचे मुख्य कारण आहे. चिदम्बरम गृहमंत्री असताना तीनही पातळ्यांवरील दहशतवाद रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलली होती. त्यांच्या शिस्तबद्ध व जरब बसविणाऱ्या कार्यपद्धतीमुळे सर्व यंत्रणा तत्पर होऊ लागल्या होत्या. याउलट सुशीलकुमार शिंदे यांची कार्यपद्धती आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यातच मेळ नसेल तर तपास यंत्रणांत तो कसा दिसणार? त्यांच्या काळात तपास यंत्रणात शैथिल्य येत चालल्याचे बोलले जात असल्याने शिंदे यांनी वेळीच सावध झालेले बरे. अन्यथा शिवराज पाटील यांच्यासारखी त्यांची गत होईल. दहशतवादी हल्ला असो वा महिलांवरील अत्याचार, ते रोखण्यासाठी स्थानिक तपास यंत्रणांची मजबुती, परिणामकारक व सातत्याने चालणारी गस्त, तपासातील व्यावसायिकता व स्फोटासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तूंवरील कडक र्निबध हे प्रमुख घटक असतात. गुन्हे रोखणारे हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यामुळे अमेरिकेत अकरा वर्षांत दहशतवादी हल्ले झाले नाहीत. तेथील कडक चाचण्यांमुळे अनेकांना अपमानास्पद वागणूक मिळते व त्याबद्दल गळा काढणारे शाहरुखसारखे सेलिब्रेटी आहेत; परंतु प्रसंगी जाचक वाटणारे र्निबधच दहशतवाद रोखत असतात. अमोनियम नायट्रेटचा स्फोटासाठी वापर होत असल्याचे वारंवार दिसत असूनही त्याच्या विक्रीचे नियंत्रण आपण करू शकलेलो नाही. स्फोटक पदार्थाच्या देवघेवीवर बारीक नजर ठेवणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. ही लहानशी बाब आपल्या कारभाराची पद्धत दाखविते. एका हल्ल्यातून अमेरिका बरेच काही शिकते. याउलट अनेक स्फोट होऊनही आपला गबाळग्रंथी कारभार सुरूच राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 12:23 pm

Web Title: looseness in security management
टॅग : Blast,Security,Terrorist
Next Stories
1 पुढाऱ्यांना लगाम, अधिकाऱ्यांना सलाम
2 औषधे : व्यवसाय की मानवता?
3 साहेबाने गुडघे टेकवले, पण..
Just Now!
X