News Flash

लेफ्ट. जनरल दलबीरसिंग

लष्कराच्या पूर्व विभागाचे (ईस्टर्न कमांड) प्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नियुक्ती ३१ डिसेंबर २०१३ रोजीपासून लष्कराचे उपप्रमुख या पदावर झाली

| May 15, 2014 02:40 am

लष्कराच्या पूर्व विभागाचे (ईस्टर्न कमांड) प्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नियुक्ती ३१ डिसेंबर २०१३ रोजीपासून लष्कराचे उपप्रमुख या पदावर झाली, तेव्हाच भारताचे भावी लष्करप्रमुख कोण, हा प्रश्न एक प्रकारे सुटला होता. त्यानंतर लष्करप्रमुखांचे नाव ५८ ते ८९ दिवस अगोदर जाहीर करावे, ही औपचारिकताही संरक्षण खात्याने पाळली. लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग हेच १ ऑगस्टपासून लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतील, असा औपचारिक निर्णय ‘मावळत्या’ सरकारने घेतल्यामुळे वादंग होत असले, तरी ते राजकीय परिघातील आहेत. त्यापूर्वी वादग्रस्त व्ही. के. सिंग यांनी लष्करप्रमुख असताना, ले. जन. दलबीरसिंग यांच्याबद्दल लष्करांतर्गत शिस्तीचा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला.
 आसामातील जोऱ्हाट येथे दलबीर यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याच्या अधिकारात सैन्याकडील पिस्तुलाची चोरी झाली हे प्रकरण साधे नसून गुप्तवार्ता-अपयश आहे, म्हणून दलबीरसिंग यांना कोणतीही बढती देण्यास व्ही. के. सिंग यांनी प्रतिबंध लागू केले; परंतु व्ही. के. सिंग यांची गच्छन्ती होताच विद्यमान लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी हे प्रतिबंध उठवले. त्याविरुद्ध आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात आकांडतांडव करणेच व्ही. के. सिंग यांच्या हाती उरले होते; तर लष्करातील जाणकार या नियुक्तीविरुद्ध उणा शब्द काढत नव्हते.
उत्तम युद्ध सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल ही पदके प्राप्त झालेले लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग हे १९७४ पासून गोर्खा रेजिमेंटच्या फ्रंटियर फोर्समध्ये होते. त्यानंतरची त्यांची महत्त्वाची नियुक्ती श्रीलंकेतील भारतीय शांतिफौजेत झाली. नागालँडमध्ये ३३ राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरमध्ये ५३ इन्फंट्री ब्रिगेडचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातच ८ माउंटन डिव्हिजनचे प्रमुखपद त्यांच्याकडे होते. या सर्व काळात, घुसखोरीविरोधी व्यूह-तंत्राचे जाणकार म्हणून दलबीरसिंग नावाजले गेले. चीन आणि पाकिस्तान या देशांलगतच्या सीमांवरील अधिकारपदे दलबीरसिंग यांनी सांभाळली आहेत, ही आणखी एक जमेची बाजू मानली जाते.  
राजस्थानातील जाट कुटुंबात जन्मलेल्या दलबीरसिंग यांचे सुहाग हे आडनाव गोत्रवाचक आहे. लष्करातील उच्चपदे स्वीकारताना हे आडनाव काढून टाकण्याचे त्यांनी ठरवले असल्याने यापुढे येत्या ३१ जुलैपर्यंत, म्हणजे सध्याचे लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांच्या निवृत्तीपर्यंत ते ‘लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग’ म्हणूनच ओळखले जातील. त्यानंतर ‘जनरल दलबीरसिंग’ म्हणून २०१६ च्या मध्यापर्यंतची कारकीर्द त्यांना मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2014 2:40 am

Web Title: lt gen dalbir singh as next army chief
टॅग : Army Chief
Next Stories
1 मुकुल सिन्हा
2 डॉ. आंद्रेस करास्को
3 व्यक्तिवेध: लॉर्ड ख्रिस पॅटन
Just Now!
X