वातकुक्कुट वाऱ्याची दिशा दाखवून थांबतो, पण राजकीय वातकुक्कुट त्याहीपुढे जातात. ‘वैचारिक बांधीलकी मानणाऱ्यांनाच पक्षात प्रवेश मिळेल’ असे सरशी असलेल्या पक्षाने सांगताच आपापली विचारधारा याच दिशेने कशी वाहते आहे, हेही दाखवून देण्यास हे राजकीय वातकुक्कुट मागेपुढे पाहत नाहीत! हा खेळ दर निवडणुकीआधी रंगतोच, पण यंदा २८८ जागा लढवण्याची भाषाच प्रत्येक पक्ष अटीतटीने करत असल्यामुळे जिल्ह्यजिल्ह्यांत ‘दिग्गजां’ची चलती आहे..
काही वर्षांपूर्वी राजकारणात असा एक जमाना निर्माण झाला की, एकएका दिवसात अनेक पक्ष बदलणारे राजकीय नेते देशाने पाहिले. राजकारणातील वारे झपाटय़ाने दिशा बदलत असतात, हे त्याचे कारण, आणि त्या दिशांनुसारोपली पाठ फिरविण्याची अतींद्रिय शक्ती प्राप्त झालेले नेते हे त्याचे उदाहरण. अशा नेत्यांची पक्षबदलूपणाची चलाखी पाहिली, की सहावे इंद्रिय असलेल्या, भूकंपाची पूर्वसूचना देऊ शकणाऱ्या वा बुडत्या जहाजावर पळापळ करून जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या काही प्राण्यांची किंवा वारा वाहेल त्या दिशेला तोंड करून दिमाखात मिरविणाऱ्या वातकुक्कुटाची तरी आठवण होत होती. महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाणांनी अशा संवेदनशील नेत्यांना वेगळेच नाव दिले.. ‘आयाराम गयाराम’!
अशा आयाराम-गयारामांची राजकारणातील वाऱ्यांची दिशा ओळखण्याची किंवा बुडती राजकीय जहाजे सोडून पळ काढणाऱ्यांची संवेदनशीलता तीक्ष्ण असते, हेही सिद्ध होऊ लागले. पण त्यामुळे राजकारणाची कोंडी सुरू झाली. माणसे तीच आणि खांद्यावरचे झेंडे मात्र, प्रसंगानुरूप बदलणारे! अशी राजनीती सुरू झाली आणि कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आला. मग व्यक्तिगत पक्षांतरांना काही प्रमाणात आळा बसला, पण पक्षबदल करणाऱ्या आयाराम-गयारामांच्या टोळ्याच उदयाला येऊ लागल्या. निवडणुकीच्या काळात मात्र, आपापल्या मनोऱ्यावर उभे राहून वारा पाहून पाठ फिरविण्याची मुभा मिळाल्याने, स्वतंत्र वातकुक्कुटांचे पेव फुटू लागले. कारण निवडणुकीच्या काळात केलेल्या पक्षांतरामुळे, सभागृहांचे सदस्यत्व संपुष्टात येण्याची फारशी भीती लोकप्रतिनिधींना नसते. पक्षबदलाच्या या कोलांटउडय़ांमागेही राजकीय स्वार्थाची गणितेच मोठी असतात. नव्या पक्षात सहजपणे उमेदवारी किंवा मानाचे एखादे पान पदरात पडणार याची त्या वातकुक्कुटांना खात्री असते. तशी हमी घेऊनच ते वाऱ्याच्या नव्या दिशेला पाठ फिरवत असतात. या राजकीय वातकुक्कुटांमुळे, केवळ पाच संवेदनेंद्रिये असणाऱ्या सामान्य माणसांचे, म्हणजे, राजकारणाच्या भाषेत मतदारांचे, एक बरे झाले आहे. राजकारणाचे वारे कोणत्या दिशेला वाहात आहेत, ते कोणत्या पक्षाला अनुकूल आहेत आणि कोणत्या पक्षाकडे पाठ फिरविणे श्रेयस्कर आहे, याचा ठोस उलगडा घरबसल्या होण्याची सोय सामान्य मतदारासाठी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ताज्या निकालानंतर राजकीय वाऱ्यांची दिशा जवळपास स्पष्ट झाली आणि तीक्ष्ण राजकीय संवेदनेंद्रिय असलेल्यांना जाग आली. आपल्या पक्षात आपल्यावर अन्याय होत आहे, या जाणिवेने बेचैन झालेल्यांनी अचानक पाठ फिरविण्यास सुरुवात केली आणि सुरक्षित राजकीय भवितव्यासाठी आसरा देणारे हमखास ठिकाण म्हणून भाजप-शिवसेनेच्या तंबूकडे अनेकांचे डोळे लागले. भाजप आणि शिवसेनेत सध्या सुरू झालेली आयारामांची रीघ पाहता, निवडणुकीनंतरच्या सत्ताकेंद्राचे स्पष्ट संकेतच सामान्य मतदारांनाही मिळू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली. हे जहाज नव्या राजकीय वादळात बुडणार याची जणू चाहूल लागलेल्या गयारामांची पळापळ सुरू झाली आणि भाजप-शिवसेनेने आपल्या तंबूची दारे सताड उघडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्षबळ वाढविणाऱ्या ‘दिग्गज’ वातकुक्कुटांकरिता आश्वासनांचे मनोरे उभे करण्यासाठी नेते सरसावले. भाजप आणि शिवसेनेत आता पक्षप्रवेशांची जणू मोहीमच सुरू झाली आहे.
आणीबाणीनंतरच्या राजकीय मंथनातून दुहेरी सदस्यत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरील वादाचे हलाहल पचवून स्थापन झालेल्या भाजपने आपल्या राजनीतीला सतत नैतिकतेचा मुलामा दिलेला आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे या पक्षाचे ध्येयवाक्य आहे. त्यामुळे, या पक्षाच्या नीतीवर, राजकीय धोरणांवर आणि ‘संघप्रणाली’शी असलेल्या बांधीलकीवर श्रद्धा असलेल्यांव्यतिरिक्त फारसे कुणीच या पक्षात वाढू शकले नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र, सत्तेच्या सावलीजवळचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप उभा राहिला आणि ही बंधने काहीशी सैलावली. सत्ताप्राप्तीसाठी आवश्यक असलेले बळ गोळा करण्यासाठी राजकीय पक्षांनाही काही तडजोडी कराव्याच लागतात, हे सत्य भाजपला उमगले आणि आयारामांच्या स्वागतासाठी भाजपची दारे थोडी किलकिली झाली. आता महाराष्ट्रात आयारामांच्या रांगा लागल्याचे दिसताच, हे दरवाजे सताड उघडल्याने, भाजपच्या मूळ मुशीतील कार्यकर्ते मात्र अस्वस्थपणे मुठी आवळू लागले आहेत. ज्यांनी पक्षबांधणीसाठी खस्ता खाल्ल्या, आपल्या सामाजिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून नेत्यांच्या सभांसाठी सतरंज्या अंथरणे आणि गुंडाळून ठेवण्याची कामे केली, त्यांची ‘स्वयंसेवका’ची भूमिका अजूनही कायमच असल्याची खंत महाराष्ट्रात व्यक्त होऊ लागली आहे. अन्य पक्षांतील नेत्यांमध्ये फुटलेले पक्षप्रवेशाचे पेव हेच त्यामागचे कारण आहे. कालपर्यंत भाजपवर टीका करणारे नेते उद्या याच पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवून घेतील, या भावनेने जुने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
भाजपची आपली अशी स्वतंत्र राजनीती आहे. या पक्षाला विशिष्ट वैचारिक बैठक आहे, त्यामुळे, ही राजनीती व वैचारिक बैठक ज्यांना मान्य असेल, त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय नेते वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे, भाजपची राजनीती आणि विचारधारा शिरसावंद्य असल्याचे मान्य करणाऱ्यांना पक्षात प्रवेश मिळणार, हे स्पष्ट आहे. विदर्भातील काही ‘दिग्गज’ काँग्रेसजनांना भाजपच्या वैचारिकतेविषयी आदर वाटू लागताच त्यांच्या पक्षप्रवेशाचे मार्ग मोकळे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताकदवान असलेल्या सूर्यकांता पाटील यांना अचानक पक्षात डावलल्याच्या जाणिवेने अस्वस्थ वाटू लागले, आणि त्या भाजपच्या विचारसरणीने भारावून गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष असलेले बबनराव पाचपुतेही भाजपच्या वाटेवर आहेत, आणि एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले माधव किन्हाळकरही भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसची खासदारकी भूषविलेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मेव्हणे आणि शंकरराव चव्हाणांचे जावई, भास्करराव पाटीलही भाजपमध्ये दाखल होणार आहेत. याशिवाय, अनेक लहानमोठय़ा वातकुक्कुटांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठ फिरवून भाजप-शिवसेनेच्या नावाने आरवण्यास सुरुवातदेखील केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या पक्षांतराच्या लाटांनी राजकारणाच्या भवितव्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने लोकसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर देशात बिहारसह काही राज्यांत पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भाजपसाठी फारसे उत्साहवर्धक नव्हते, असे मानले जाते. तरीही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील गयारामांच्या फौजा भाजपकडेच डोळे लावून बसल्या आहेत.
महाराष्ट्रात भाजपने केलेल्या महायुतीच्या प्रयोगाला लोकसभेत अपेक्षेहून मोठे यश मिळाले. ‘मोदी लाट’ हे त्या यशाचे कारण असले, तरी भाजपची ताकद महाराष्ट्रात बळावल्याची भाजप नेत्यांची भावना आहे. त्यामुळेच, विधानसभेच्या रिंगणात स्वबळावर उतरण्याची छुपी तयारी सुरू झाल्याने शिवसेनेच्या तंबूतही स्वतंत्र हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपने खरोखरीच युती तोडली, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वत:ची ताकद असली पाहिजे, या दृष्टीने आयारामांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे दरवाजेही उघडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक लहानमोठय़ा नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर ‘शिवबंधन धागा’ बांधून घेतला. स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली, तर तगडे उमेदवार हाताशी असले पाहिजेत, या गणितातूनच शिवसेनाही तयारीला लागली आहे, आणि शिवसेनेची स्वतंत्र ताकद अगदीच दुर्लक्षून चालणार नाही, याचे संकेत या ‘दिग्गज’ आयारामांनी दिले आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीचे वारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी केवळ भाजपला ते अनुकूल आहेत, आणि शिवसेनेकडे त्या वाऱ्यांची पाठ आहे, असे मानणे चुकीचे ठरेल.
या राजकीय वातकुक्कुटांनी आणखी एक संदेश दिला आहे. शिवसेनेतून बाहेर पडून गेल्या निवडणुकीत वादळ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे या वेळी हे वारे फारसे फिरकलेले नाहीत. गयारामांचे पेव फुटलेले असतानाही, मनसेच्या दारी मात्र आयारामांची वारी पोहोचलेली दिसत नाही. राज ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार, अशी हवा या पक्षाने तयार केली होती. त्यामुळे मनसेमध्येही स्वबळवर्धनाच्या हालचाली सुरू होतील, असे काही महिन्यांपूर्वी वाटत होते, पण गेल्या आठवडय़ापासून पुन्हा ते चित्र काहीसे धूसर झाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप व शिवसेना यांच्यातच आता हा खेळ रंगला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागतील, तेव्हा कदाचित हा खेळ अधिकच रंगतदार झालेला असेल.