नक्षलवाद्यांचे जाळे जागतिक पातळीवर नेमके कसे काम करते यासंबंधीचा हा धक्कादायक तपशील. लेखकाच्या हाती लागलेल्या संदर्भानुसार..
गेल्या दहा वर्षांच्या काळात भाकप (माओवादी)च्या उग्रवाद्यांनी केवळ देशच पोखरला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची यथेच्छ बदनामी करत बरीच मजल गाठली आहे. नक्षलवाद्यांचे नेटवर्क जागतिक पातळीवर नेमके कसे काम करते यासंबंधीचा विस्तृत तपशील प्रस्तुत लेखकाच्या हाती लागला आहे व तो अतिशय धक्कादायक आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा यंत्रणांनासुद्धा आजवर या चळवळीच्या अशा जागतिक कामगिरीविषयी फारशी माहिती नव्हती. नक्षलवाद्यांना कधी काळी श्रीलंकेत सक्रिय असलेल्या लिट्टेने युद्धतंत्र शिकवले किंवा फिलिपाइन्स तसेच नेपाळमधील सशस्त्र माओवाद्यांशी नक्षलवाद्यांचा नियमित संबंध आहे, एवढेच या यंत्रणांना ठाऊक होते. माओवादाचा उदय चीनमधील असल्याने तेथून नक्षलवाद्यांना बरीच मदत मिळते ही बाब सुरक्षा यंत्रणांना ठाऊक होती. यापलीकडेसुद्धा नक्षलवाद्यांनी जागतिक पातळीवर अनेक देशांत उत्तम समन्वय निर्माण केला आहे ही बाब आता नव्याने समोर आली आहे. २००४ च्या विलीनीकरण व नव्या स्वरूपातील चळवळीनंतर नक्षलवाद्यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय विभागाची स्थापना केली. हा विभाग थेट केंद्रीय समितीच्या नेतृत्वात काम करेल असे ठरवण्यात आले. चळवळीने देशात सुरू केलेले युद्ध (त्यांच्या मते जनयुद्ध) अधिक सक्षम करायचे असेल किंवा या युद्धाला आणखी व्यापक स्वरूप द्यायचे असेल तर विविध देशांत सक्रिय असलेल्या व माओच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या संघटना तसेच पक्षांना एकत्र आणावे लागेल या हेतूने हा विभाग स्थापन करण्यात आला. फिलिपाइन्समधील कम्युनिस्ट पक्षाने हाच हेतू डोळय़ासमोर ठेवत इंटरनॅशनल लीग फॉर पीपल्स स्ट्रगल (आयएलपीएस) या संघटनेची स्थापना केली व त्याचे नेतृत्व जोस मारिया सिसॉन या क्रांतिकारी नेत्याकडे दिले. याच संघटनेच्या मदतीने देशातील नक्षलवाद्यांनी जगभरातील क्रांतिकारी संघटनांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला भरपूर यश आल्याचे या तपशिलावरून स्पष्ट होते.
प्रारंभी नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाची जबाबदारी पंजाबमध्ये चळवळीचा प्रसार करणाऱ्या जोसेफकडे होती. काही वर्षे या जोसेफनेच आयएलपीएसने आयोजित केलेल्या परिषदांना हजेरी लावली. नंतर हा विभाग सांभाळण्याची जबाबदारी प्रकाशवर सोपवण्यात आली. तपशिलात उल्लेख असलेली जोसेफ व प्रकाश ही दोन्ही नावे बनावट आहेत. सध्या हा विभाग सांभाळणारा व चळवळीत प्रकाश म्हणून वावरणारा प्रकाश हा दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा प्राध्यापक साईबाबा आहे, असा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. या प्रकाशने नक्षलवादी चळवळीचे उघडपणे समर्थन करणाऱ्या देशातील अनेक बुद्धिवादी व विचारवंतांना या आंतरराष्ट्रीय विभागाशी जोडले व त्यांचा वापर जागतिक पातळीवरील नेटवर्क उभारण्यासाठी करून घेतला. या विदुषींना एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने परदेशात पाठवायचे. प्रत्यक्ष देशात उघडपणे वावरणारे असे विदुषी परदेशात जाताच नक्षलवाद्यांचे प्रवक्तेम्हणून काम करीत असल्याचे उपलब्ध तपशिलावरून स्पष्ट होते. सिसॉन व प्रकाशने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनेची रचना कशी असावी यावर भरपूर विचार केल्यानंतर ४-२ चे सूत्र निश्चित केले. फिलिपाइन्स, भारत, तुर्कस्थान व ब्राझील या देशात सक्रिय असलेले चार पक्ष व अमेरिका आणि इराणमध्ये सक्रिय असलेल्या दोन संघटनांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय संघटनेत राहतील असे ठरवले. त्यानुसार कार्याला सुरुवात झाली. सुमारे पाच वर्षे याच पद्धतीने काम सुरू होते. यात संघटनेच्या सदस्यांनी चळवळीची माहिती सहयोगी देशांना कळवणे, सदस्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी देणे, अशा पद्धतीने कामाचे सूत्र ठरवण्यात आले होते. ग्रीसमध्ये या संघटनेची एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्याला भारतातून प्रकाश जाऊ शकला नाही. या परिषदेसाठी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींची व्यवस्था आयोजकांनी नीट केली नाही. परिणामी, परिषद असफल झाली. यामुळे संतापलेल्या जोस मारिया सिसॉनने नंतर काही महिन्यांनी झालेल्या हाँगकाँगमधील परिषदेत यावरून बराच वाद घातला.
गैरसोय झाली हे एकमेव कारण या वादामागे नव्हते, तर आंतरराष्ट्रीय संघटनेची सध्याची रचना ४-२ असावी की ५-२ असावी, हाही वादाचा मुद्दा होता. शिवाय या आंतरराष्ट्रीय संघटनेने जगभरातील निर्वासित कामगारांच्या मुद्दय़ावर सशस्त्र लढा उभारावा, असेही सिसॉनने जाहीर केले. या बैठकीला आलेल्या इतर देशांतील माओवादी क्रांतिकारकांनी रचनेच्या वादाला बगल द्यावी व अनेक देशांना या भेटीत सहभागी करून घ्यावे, तसेच जनतेचा सशस्त्र उठाव हेच सूत्र ठेवावे, असे मत नोंदवले. यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर सिसॉनने या आंतरराष्ट्रीय संघटनेची कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली व नव्याने प्रतिनिधी निवडा असे सांगितले. गैरसोयीच्या मुद्दय़ामुळे दुखावलेल्या ग्रीसच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. भारतातून गेलेल्या प्रकाशने हा वाद सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. या वेळी हजर असलेल्या इतर देशांनी भारतात जनयुद्धाने आता चांगलेच रूप धारण केल्याने भारतानेच मार्गदर्शकाची भूमिका निभवावी, असेही यादरम्यान सुचवले. अखेर कोणताही तोडगा न निघाल्याने सिसॉन व त्याच्या पाठीशी उभा असलेला फिलिपाइन्समधील पक्ष या आंतरराष्ट्रीय संघटनेतून बाहेर पडला. सिसॉनने नंतर स्वतंत्रपणे विविध देशांत काम करणाऱ्या संघटनांना एकत्र घेत एक नवीन गट जागतिक पातळीवर तयार केला. हा सारा घटनाक्रम २००९ पर्यंतचा आहे.
सिसॉन व फिलिपाइन्स बाजूला झाल्यानंतर प्रकाशने २०११ मध्ये जर्मनीत झालेल्या एका क्रांतिकारी परिषदेत नक्षलवाद्यांचे प्रतिनिधित्व केले. यात प्रकाशसोबत भारतातून पाच जण सहभागी झाले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख या तपशिलात नाही. हँबर्गमध्ये झालेली ही परिषद तुर्कस्थानमध्ये माओवादी पक्षाच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेण्यात आली. यानंतर हाच प्रकाश २०१२ च्या मे महिन्यात लॅटिन अमेरिकेत गेला. तिथे बोलिव्हिया, चिली, ब्राझील, तुर्कस्थानचे क्रांतिकारी एकत्र आले होते. मेक्सिको व इक्वेडोरचे प्रतिनिधी येऊ शकले नाही. या चार देशांतील क्रांतिकारींनी तेथे माओवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतरच्या जून महिन्यात प्रकाश याच प्रतिनिधींना सोबत घेऊन अमेरिकेत गेला व तिथे त्याने ब्लॅक पँर्थसच्या संघटनेला मार्गदर्शन केले. अमेरिकेत जोरात असलेल्या या पँथर्सच्या मदतीने या सर्वानी ब्लॅक माओइस्ट फेडरेशनची स्थापना केली. प्रकाशच्या या सर्व घडामोडी देशातील नक्षलवाद्यांच्या सूचनेवरून होत होत्या हे या तपशिलावरून स्पष्ट होते. स्वीडनमधील जॉन मॅड्रालने छत्तीसगडमधील सलवा जुडूमवर ‘रेड स्टार ओव्हर इंडिया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने जॉनच्या मुलीने स्वीडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले. त्याला प्रकाश हजर राहिला. तेथील भाषणात प्रकाशने भारतात जनयुद्धात सहभागी होणाऱ्यांवर कसे अत्याचार केले जात आहेत याची सविस्तर माहिती दिली. याच परिषदेत स्वीडन व नार्वेत जनयुद्धाला सुरुवात करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. जॉनच्या पुस्तकाचे सर्व युरोपीय भाषांमध्ये अनुवाद झाले असून त्याचा फायदा युरोप खंडात चळवळीच्या प्रसाराला होत असल्याचे या तपशिलात नमूद आहे. जॉनने युरोप खंडात ‘सपोर्ट पीपल्स वॉर इन इंडिया’ या नावाने एक गट स्थापन केला असून, या गटाच्या अनेक बैठका होत आहेत. यात जर्मनीतील प्रोग्रेसिव्ह यूथ संघटनेचे ४०, फ्रान्सचे ४०, तर इतर देशांतील १५० युवक सहभागी आहेत आणि या सर्वानी माओची क्रांती जगभर नेण्याची प्रतिज्ञा केल्याचे तपशिलात नमूद आहे.
भारतातल्या नक्षलवाद्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मारलेली ही मजल एवढय़ावरच थांबत नाही. भारतात नक्षलवाद्यांच्या कथित जनयुद्धाला मिळालेल्या यशामुळे प्रभावित झालेल्या इतर देशांतील क्रांतिकारकांना येथे आणून त्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रकारसुद्धा या दहा वर्षांत अनेकदा झाले आहेत. तुर्कस्थान, ब्राझीलमधील क्रांतिकारकांना येथे येऊन चर्चा करायची आहे, तेव्हा त्यांना कसे आणायचे यावरही या तपशिलात बरीच चर्चा करण्यात आली आहे. याच तपशिलात नेपाळमधील माओवाद्यांसोबत असलेल्या संबंधावरही भरपूर प्रकाश टाकण्यात आला आहे. नेपाळमध्ये प्रचंडचे सरकार सत्तेत आले, पण त्यांना सत्ता सांभाळता आली नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर प्रचंडाने त्याच्याकडे असलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांना तेथील सैन्यात सामील करून घेतले. यामुळे जगभरातील माओवादी नाराज झाले आहेत. या क्रांतिकारकांचा जागतिक पातळीवर उपयोग करून घेता आला असता, असाच या सर्वाचा सूर आहे. भारतातील नक्षलवादीसुद्धा प्रचंडावर नाराज असून त्यांनी तेथे किरण व बादल या दोन जुन्या नेत्यांना सोबत घेऊन भाकप (माओवादी) असा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या दोन महासभासुद्धा गेल्या तीन वर्षांत झाल्या. प्रचंडपासून अंतर राखून असलेल्या या गटाला आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी करून घ्यावे, यासाठी प्रकाशने बरेच प्रयत्न केले व त्यात त्याला यश मिळाले, अशी माहिती या तपशिलातून समोर येते.
सध्या नक्षलवाद्यांचा फिलिपाइन्समधील पक्ष व क्रांतिकारकांशी संबंध नसला तरी तो पुन्हा प्रस्थापित करावा व सर्वाना सोबत घेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना आणखी मजबूत करावी, असे प्रकाशने केंद्रीय समितीला सुचवल्याचे या तपशिलात नमूद आहे. फिलिपाइन्सशी संबंध नसतानासुद्धा मनिला येथे झालेल्या एका स्त्रियांविषयक परिषदेला नागपूर विद्यापीठातील एका इंग्रजीच्या प्राध्यापिकेला पाठवण्याचा निर्णय प्रकाशने घेतला. या प्राध्यापिकेने परिषदेला हजेरी लावली. नंतर तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी बोलणी केली व भारतात आल्यावर त्याचा अहवाल नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाला सादर केल्याची माहिती या तपशिलात आहे. सध्या कॅनडा, अफगाणिस्तान, बोलिव्हिया, इक्वेडोर, चिली व ऑस्ट्रियातील क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष सक्रिय आहेत. या सर्वानी दक्षिण आशियाची जबाबदारी भारतातील माओवाद्यांनी सांभाळावी, तसेच त्यांचे नेतृत्व करावे आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटना सक्रिय करावी, असे सुचवतानाच आम्ही सक्रिय मदतीसाठी तयार आहोत, अशी हमी दिल्याचे या तपशिलात नमूद आहे. साऱ्या जगातील क्रांतिकारी भारतातील जनयुद्धाकडे क्रांतीचे केंद्र म्हणून आशेने बघत आहेत. त्यामुळे आता भारतातील नक्षलवाद्यांनी केवळ परिषदांना हजेरी न लावता नेतृत्वासाठी पुढाकार घ्यावा, अशी माहिती देणारा हा तपशील सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणारा आहे.