19 April 2019

News Flash

मॅटी मॅकोनेन

कुठल्याही गोष्टीचे संक्षेपीकरण करण्याचा मोह माणसाला कधी आवरता आलेला नाही, त्यामुळे आज गद्याची भाषा बदलली आहे. मोबाइल फोनची ही भाषा टेक्स्टिंग म्हणून ओळखली जाते; ती

| July 2, 2015 12:17 pm

कुठल्याही गोष्टीचे संक्षेपीकरण करण्याचा मोह माणसाला कधी आवरता आलेला नाही, त्यामुळे आज गद्याची भाषा बदलली आहे. मोबाइल फोनची ही भाषा टेक्स्टिंग म्हणून ओळखली जाते; ती भाषा आता चक्क उत्तरपत्रिकांमध्येही दिसते. मोबाइलचा शोध लागल्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे १९९४ मध्ये एसएमएस सेवा नोकियाच्या मोबाइलवरील सोयींमुळे सुरू झाली. संदेश पाठवण्याची ही लघुसंदेश सेवा शोधून काढणारे फिनलंडचे तंत्रज्ञ मॅटी मॅकोनेन यांचे अलीकडेच निधन झाले.
मॅकोनेन यांचा जन्म सुमुसालमी येथे झाला होता. त्यांनी १९७६ मध्ये ओउलू तंत्र महाविद्यालयातून विद्युत अभियंत्याची पदवी घेतली होती. त्यांना एसएमएस सेवेची कल्पना पिझेरियात दोन सहकाऱ्यांना संदेश पाठवताना १९८४ मध्ये भरलेल्या एका दूरसंचार परिषदेत सुचली. पण पहिला एसएमएस संदेश हा ३ डिसेंबर १९९२ मध्ये संगणकावरून व्होडाफोन नेटवर्कवरून मोबाइलवर पाठवण्यात आला. तेव्हा एसएमएस १६० वर्णाक्षरांचा होता. एसएमएसच्या शोधासाठी त्यांना २००८ मध्ये ‘दी इकॉनॉमिस्ट’चा अभिनव संशोधन पुरस्कार मिळाला होता. पण त्यांच्या या शोधाचे त्यांनी पेटंट घेतले नव्हते. १९८९ मध्ये ते फिनलंडच्या मोबाइल दूरसंचार विभागाचे प्रमुख होते. इ.स २००० मध्ये मॅकोनेन हे नोकिया नेटवर्कस् प्रोफेशनल सव्‍‌र्हिसेसमध्ये संचालक होते. नंतर ते फिनेट ऑय कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या मते एसएमएसची वीस वर्षे साजरी झाली असली तरी तो संयुक्त प्रयत्न होता. तो लोकप्रिय करण्यात नोकिया (नोकियाचे मॉडेल २०१०) कंपनीचा मोठा वाटा होता, पण त्या वेळी ‘हेलसिंगिन सॅनोमॅट’ या फिनलंडच्या वृत्तपत्रातील पत्रकारांनी एसएमएसच्या या जनकाचा शोध घेतला तेव्हा नाइलाजाने त्यांनी या शोधाचे पितृत्व घेतले, कारण ते प्रसिद्धीलोलुप नव्हते. एसएमएसमुळे भाषेच्या विकासावर परिणाम झाला, असे त्यांचे मत होते. मॅकोनेन हे मोबाइल उद्योगातील एक बुजुर्ग तंत्रज्ञ होते. लवकरच ते निवृत्त होऊन शांत जीवन जगणार होते, पण त्याआधीच त्यांच्याविषयी आरआयपी (रेस्ट इन पीस) लिहिण्याची वेळ आली हे दुर्दैव. प्रगत देशात बोलण्यापेक्षा एसएमएस जास्त वापरतात. आपल्याकडे बोलतात जास्त व एसएमएस कमी असा उलटा प्रकार आहे. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक मेसेंजरमुळे एसएमएस वापराचे प्रमाण आता प्रगत देशातही कमी झाले आहे. मोबाइल इंटरनेट महाग असते व जिथे संदेश तपासले जातात, त्यावर पाळत ठेवली जाते अशा ठिकाणी गुप्तता राखण्यासाठी एसएमएस हेच सुरक्षित साधन आहे.

First Published on July 2, 2015 12:17 pm

Web Title: matti makkonen