जगण्यातलं जे सत्य आहे, वास्तव आहे त्याच्यापासून पैसा आपली फारकत करतो. पैशाचा जोर हा सत्याला दडपू शकतो आणि असत्याला प्रतिष्ठा देऊ शकतो. पैशाच्या जोरावर सत्याला विकृत केलं जाऊ शकतं आणि असत्याचरणाला सुकृत मानलं जाऊ शकतं. पैशाच्या छनछनाटाच्या नादात अंतरंगातील सदसद्विवेकबुद्धीचा स्वर आत्यंतिक क्षीण होतो. पैशाचा जोर, आपण जसे नाही तसे असल्याचा भ्रम उत्पन्न करतो. पैसा अहंगंड फुलवतो. दुसऱ्याबाबत तुच्छताभाव उत्पन्न करू शकतो. साध्या साध्या गोष्टीतला आनंदही पैशापायी हिरावला जाऊ शकतो किंवा साध्या साध्या गोष्टींतही किती आनंद असू शकतो, याची जाणीव पैशापायी हिरावली जाऊ शकते. पैसा आपल्या वृत्तीचा इतका खोलवर घात करतो. पण ‘पैशाशिवाय चालत नाही,’ हे उघड सत्यच. प्रपंचात पदोपदी पैशाची गरज भासतेच. साधकाचाही त्याला अपवाद कसा असेल? साधकालाही पैशाची गरज आहेच. या दुनियेत राहून साधनसमर्पित आयुष्य घालवायचं असेल तर अशा साधकानं पैशाच्या मुद्दय़ाकडे कसं पाहावं? या गोष्टीचा साधकाच्या पातळीनुसार दोन पातळ्यांवर विचार करावा लागेल. एक पातळी अशा साधकाची आहे जो केवळ भगवंतावर पूर्ण विसंबून आहे. आपला सारा योगक्षेम भगवंतच चालवतो, या भावनेनं तो निशंक वृत्तीने जगत आहे. अशा ‘मामेकं शरणं’ साधकाचा सर्व भार ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ असे अभिवचन देत भगवंत स्वीकारतोच. पण व्यवहाराचाही प्रभाव असलेल्या आणि साधनेच्या मार्गावर पहिली काही पावले टाकत असलेल्या साधकाला इतकं पूर्ण समर्पित जगता येत नाही. साक्षात भगवंतानं गीतेत हे अभिवचन दिल्याने ते अवास्तवही त्याला वाटत नाही पण वास्तवात त्याचा अनुभव घेण्याइतपत धाडसही त्याच्यात असत नाही. आपली बहुतेकांची स्थिती अशीच आहे. मग अशा वेळी दुसऱ्या पातळीकडे लक्ष जाते. या पातळीवरचा साधक आयुष्य निर्वेध साधनसमर्पित जगता यावं, यासाठीच पैसा साठवतो. तो व्यवहारदक्षही असतो पण हा व्यवहार भगवंताला डोळ्यासमोर ठेवूनच तो करीत असतो. हा प्रपंच भगवंताचा आहे, हे मानून तो वावरत असतो. तो पैसा साठवत असला तरी त्याचा जीव पैशात गुंतलेला नसतो. ही दुसरी पातळी गाठणं, हे आपलं ध्येय आहे. आपण भगवंतावर ना धड पूर्ण समर्पित आहोत ना भौतिकाबाबत निश्िंचत आहोत. साधनेसाठी आयुष्य व्यतीत व्हावं, असंही आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं. त्या वाटण्यातली तीव्रता मात्र अधेमधे ओसरत असते. तरीही भगवंतावर आपली श्रद्धा असते पण पैशाचाही आधार वाटत असतो. आपल्याला या दुसऱ्या पातळीवर स्थिर करून नंतर पहिल्या पातळीकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीमहाराज प्रपंचही सुखानं करा आणि सदोदित नाम घ्या, असा मंत्र सांगतात. पैसा असूनही त्यात न अडकता जिवानं साधनात अडकावं, यासाठीच ते सांगतात, ‘प्रपंचात पैशाच्या इतकीच धीराची गरज आहे.’ याचाच अर्थ पैशानंच धीर येतो असं नाही. हा ‘धीर’ म्हणजे काय?