प्रगत पशूंच्या दुनियेत जनुकांच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावणारे बोध आणि आयुधे हेच उत्क्रान्तीची पुढील दिशा ठरवणार आहेत..
उत्क्रान्तीचा ओघ सर्वसमावेशक आहे. केवळ नवे, अधिकाधिक प्रगत अवतरणार आणि आधीचे, साधेसुधे नष्ट होऊन जाणार अशी ही रीत बिलकूलच नाही. अनेक साध्यासुध्या जीवजातीही- बॅक्टेरिया, बुरशा, किडेमकोडे अतिशय समर्थ, यशस्वी आहेत. अगदी साध्यासुध्या रचनेचा वंश, सायानोबॅक्टेरिया, तर अतिपुरातन कालापासून आजपावेतो तगून आहे, सतत फोफावतच राहिला आहे; पण उत्क्रान्तीच्या ओघातही काही प्रवृत्ती आहेत. सस्तन पशूंसारख्या अर्वाचीन जीवजाती कीटकांसारख्या प्राचीन जीवजातींहून काही बाबतीत निश्चितच पुढारलेल्या आहेत. त्यांची रचना, त्यांचे जीवनव्यापार, त्यांचे आचरण जास्त गुंतागुंतीचे, जटिल, व्यामिश्र आहेत. त्यांच्या वर्तणुकीत उपजत अंश कमी आहे, एकमेकांपासून शिकलेला, कधी कधी पूर्णपणे नव्याने घडवलेला अंश खूपच जास्त प्रमाणात आहे. आधुनिक माहितीशास्त्राच्या परिभाषेत सस्तन पशू माहितीने जास्त ठासून भरलेले, अधिक बोधप्रचुर आहेत.
या प्रगत पशूंना आत्मभान आहे का? याचे उत्तर शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्राण्यांना आरसे दाखवत पडताळतात की, प्राण्यांना आरशात आपणच दिसतोय याची जाणीव असते का? आता कळलंय की, अनेक जातींच्या माकडांना, शिवाय हत्ती, डॉल्फिननाही आत्मभान असते. आपली लालतोंडी माकडेपण आरशात स्वत:ची छबी खुशीने न्याहाळत राहतात. या त्यांच्या नादापायी आयआयटी चेन्नईतल्या विद्याíथनींची पंचाईत झालीय. तिथल्या एका माकडाच्या टोळक्याने मुलींचे वसतिगृह आपलेसे केले आहे. कधी कधी मुली घाईघाईत न्हाणीघरात शिरून दार लावतात आणि काय? आधीच तिथे एखाद-दोन माकडे आरशात स्वत:ला वाकुल्या दाखवत उभी असतात!
सहकार आणि संघर्ष; दोन्ही संदर्भात माकडांसारखे प्रगत पशू आपली कल्पकता लढवतात. चिंपान्झी शिकारीसाठी हातमिळवणी करत डावपेच रचतात. त्यांचे सावज व्हेव्‍‌र्हेट माकड जर सुटका करून घेण्यासाठी एखाद्या झाडावर चढले, तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडय़ा मारत कुठून पळायचा प्रयत्न करेल याचा अंदाज घेतात. मग त्या सगळ्या झाडांच्या बुंध्याशी एक एक चिंपान्झी उभा राहतो आणि एक जण झाडावर चढून सावजाचा पाठलाग करतो. चिंपान्झी आपल्या पिल्लांना कुठल्या फांद्यांवर चढणे सुरक्षित आहे, कुठल्या धोक्याचे हे झाडांच्या बुंध्यांवर थापा मारत पद्धतशीरपणे शिकवतात. दुसऱ्या बाजूने संघर्षांत दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी, अगदी धादांत खोटे बोलण्यासाठीसुद्धा माकडे डोके चालवत नवनव्या युक्त्या लढवतात. मर्कटतज्ज्ञ राणा सिन्हा एकदा लालतोंडय़ा माकडांतल्या एका प्रेमाच्या त्रिकोणाचे निरीक्षण करत होते; दोन नर एका माजावर आलेल्या मादीला वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. शेवटी तिने एकाच्या बाजूने कौल दिला. दुसरा नर निराश होऊन झाडावर चढला आणि त्याने काय केले? त्याचा प्रतिस्पर्धी आणि त्या मादीचे मीलन सुरू होणार, तेवढय़ात त्याने जोरात बिबटय़ा आला रे आला, अशा आशयाची आरोळी दिली. बिचारे प्रेमी सरावैरा दोन दिशांनी दोन वेगवेगळ्या झाडांवर चढायला धावले आणि हे महाशय? आपण शांतपणे झाडावरून उतरले! जर खरेच बिबटय़ा आला अशी आशंका असती, तर तो कधीच उतरला नसता, उलट आणखी शेंडय़ावर गेला असता. तो चक्क ठकवत होता!
प्रगत पशूंच्या या सामर्थ्यांमुळे जनुकांसारखेच वर्तणुकीचेही अनुकरणातून फैलावणारे घटक प्राणिसृष्टीचा एक भाग बनले आहेत. जनुकांच्या जशा काही हुबेहूब, काही बदल झालेल्या प्रती बनतात, पर्यायी प्रतींत कोणत्या जास्त, कोणत्या कमी जगणाऱ्या-फळणाऱ्या या निवडीतून नावीन्याचे आविष्कार अवतरतात, तसेच वर्तणुकीच्या संदर्भात होत राहते. असाच एक नावीन्यपूर्ण वर्तणुकीच्या उत्पत्तीचा, प्रसाराचा किस्सा आहे एका जपानमधल्या प्रतिभावान लालतोंडी माकडिणीचा – ईमोचा. जपानी शास्त्रज्ञ एका बेटावर दशकानुदशके या माकडांच्या एका टोळीचा अभ्यास करताहेत. निरीक्षणे सुलभ व्हावीत म्हणून ते समुद्राकाठच्या वाळवंटात माकडांसाठी बटाटे, गहू असा खुराक पुरवतात. या बटाटय़ांच्या सालीवर माती असते, गव्हात रेती मिसळते. वर्षांनुवष्रे ही माकडे हे सहन करत होती. मग त्यांच्या टोळीत जन्मली नवी शक्कल काढायला भरपूर अक्कल असलेली ईमो. तिला सुचले की, समुद्राच्या पाण्यात धुतले की बटाटे स्वच्छ होतात. पाण्यावर फिसकारले की गहू तरंगतात, पण वाळूचे कण बुडतात. हळूहळू इतर माकडेही तिचे अनुकरण करू लागली- हे आचरण फैलावू लागले. असे अनुकरण केले गेले एका क्रमाने: प्रथम छोटय़ा माद्यांनी, तदनंतर छोटय़ा नरांनी, अखेरीस वयस्कर माद्यांनी; पण हुप्प्यांनी एका अबलेची नक्कल करण्याचे साफ नाकारले. ते माती, रेती खात खात स्वर्गवासी झाले!
ईमोची ही शक्कल तर बोधयुगाची नांदी आहे. प्रभावी भाषेच्या बळावर मानवी वर्तणुकीला ज्ञानसाधनेची जोड मिळाल्यानंतर बोधसंपदा भराभर वाढत चालली आहे. प्राण्यांचे कृत्रिम वस्तुविश्व तसे अगदी मर्यादित आहे; माणसाने मात्र त्याला अगडबंब बनवले आहे. मानव कार्यकारणसंबंध लक्षात घेऊन, विचारपूर्वक अनेक कृत्रिम वस्तू घडवून त्यांना हरतऱ्हेची उपकरणे, आयुधे म्हणून वापरतो. म्हणून एका बाजूने मानवाच्या संकल्पना, त्याचे ज्ञान विकसित होत राहते, तर या बोधविश्वाशी हातात हात मिळवून कृत्रिम वस्तूंचे विश्वही समृद्ध होत राहते. जनुकांप्रमाणेच, आचरण घटकांप्रमाणेच आयुधांच्याही नकला केल्या जातात. अशा नकला करताना त्यांच्यात बदल घडवले जातात, त्यातून नवनिर्मिती होत राहते.
पृथ्वीच्या जन्म झाला एका शिलावरणाच्या रूपात. मग या शिलावरणाला जलावरणाने व वातावरणाने झाकले. जिथे शिलावरण- जलावरण- वातावरण एकत्र येतात त्या परिसरात जीवसृष्टी पसरत जाऊन तिचे एक जीवावरण निर्माण झाले. मग प्राणिसृष्टीच्या आणि प्रामुख्याने मानव जातीच्या उत्पत्तीनंतर ज्ञानाची भरभराट होऊन एका बोधावरणाने आणि त्याच्याच जोडीला कृत्रिम वस्तूंची भरभराट होऊन एका आयुधावरणाने पृथ्वी आच्छादली आहे. माहिती व संदेश तंत्रज्ञानाच्या आजच्या झपाटय़ाच्या प्रगतीने जे एक संगणक- दूरसंदेश ही आयुधे व संबंधित सॉफ्टवेअरचे ज्ञान यांच्या युतीतून साबरस्पेसमधील विश्व साकारते आहे ते याच उत्क्रान्तीचा अगदी अलीकडचा आविष्कार आहे.
आज जगात जे काय घडते आहे आणि उद्या घडणार आहे ते बोधावरणातील, आयुधावरणातील नवनव्या घडामोडींतूनच ठरते आहे. एकाच वेळी मोबाइल फोनसारखी सहकारपोषक आणि युद्धसामग्रीसारखी संघर्षपोषक आयुधनिर्मिती झपाटय़ाने चालली आहे. जोडीलाच आयुधांची माणसाच्या पूर्णपणे हाताबाहेर जात असणारी जीएम पिकांपासून बनणाऱ्या नव्या तणांसारखी स्वतंत्र चालही नजरेस येते आहे. नव्या युगात मानव सतत स्पध्रेला, संघर्षांला खतपाणी घालत राहिला, तर मोठा उत्पात होऊन सर्व प्रगत जीव नष्ट होऊ शकतील; पण तरीही बॅक्टेरिया तगून राहतील आणि पुन्हा एकदा उत्क्रान्तीचा संथ प्रवास चालू होईल. उलट सुदैवाने जर सहकार बळावत राहिला, तर आपण उत्क्रान्तीच्या पुढच्या टप्प्यावर पोचू शकू, सर्व विश्व फुलवू शकू. पुढल्या तीन लेखांत आपण या साऱ्याचा मागोवा घेऊ या.
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.