श्रीमंत हे गरिबांवर, राज्यकत्रे जनतेवर, वरिष्ठ कनिष्ठांवर, एकुणात उच्चस्तर हे निम्नस्तरावर अन्याय करतात; असे सामान्यत: गृहीत धरले जाते व ते बऱ्यापकी खरेही असते. पण हे म्हणत असताना, प्रत्येक स्तरात, चांगुलपणापायी जास्त देणारे आणि समूहाआड दडून श्रेय लाटणारे, असे दोनही प्रकारचे लोक असतात, हेही विसरून चालणार नाही..
शेतकऱ्यांना पीक कर्जात पात्रतेपेक्षा जास्त माफी दिली गेली, हा घोटाळा म्हणून गाजतोय. कर्जमाफी या प्रकारात, नियमितपणेच एक अन्याय होत असतो, हे मात्र फारसे कोणी लक्षातच घेत नाही. खरी संकटग्रस्तता कोणाची किती होती, हे मोजता येत नसतेच. त्यामुळे सरसकटपणे, काही एका तारखेनंतर घेतलेली, पण फेडण्याच्या तारखेपर्यंत न फेडलेली कर्जे माफ होतात. पण ज्यांनी प्रामाणिकपणे, तोशीस सोसून आणि जिवाचं रान करून, ती कर्जे वेळच्या वेळी फेडलेलीच असतात, ते गाढव ठरतात. ज्यांनी चालढकल केली, इतर कार्याना कर्ज वापरले व माफी मिळणार असे गृहीत धरले ते धश्चोट लोक शहाणे ठरतात. पॅकेज द्यायचेच तर, त्यात वेळेत फेड करणाऱ्यांना तितकीच रक्कम बक्षीस म्हणून दिली पाहिजे व हा बोजा धरूनच, किती माफी द्यायची, हे पॅकेजात बसवले पाहिजे. कारण फेड न करणाऱ्यांना सरकार माफीरूपात तितकी रक्कम देतच आहे. हे म्हणजे गहाळ व धश्चोटांना बक्षीस आणि स्वाभिमानी, प्रामाणिक व जबाबदारीने वागणाऱ्यांना धत्तुरा असे चालू आहे. दोघेही ‘माफीयोग्य शेतकरीच’ आहेत.
कामगार संघटनासुद्धा, दांडीबहाद्दर आणि इतर गरवर्तनात सापडलेल्यांना काढून टाकले जाऊ नये यासाठी, शिस्तशीर कामगारांच्या रास्त मागण्यांतसुद्धा तडजोडी करतात. कारण एकजूट टिकली पाहिजे! इतकेच नाही तर कामगारांतल्या दुष्प्रवृत्तीविषयी, सत्प्रवृत्त कामगारांनी, नेत्यांकडे तक्रार केली तर त्यांना उलट फूटपाडू, गद्दार वा चमचे ठरविले जाते.
अगदी प्राध्यापकांतसुद्धा, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्तच्या चालीवर ‘नेट-सेटग्रस्त’ नावाची कॅटेगरी उत्पन्न झाली आहे. ज्या विषयात तुम्ही मास्टर्स डिग्री घेतलेली आहे व जो शिकवतही आहात त्याच विषयावर, त्याच अभ्यासक्रमावर आधारित अशी ही चाचणी असते. ही घ्यायची मुळात गरजच काय? याचे उत्तर आपल्याला या परीक्षेतले प्रश्न आणि नापास होणाऱ्यांनी दिलेली उत्तरे यावरून मिळते. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांचे कार्य काय? याचे उत्तर ‘त्यांनी बेकारांना नोकऱ्या मिळवून दिल्या’ असे दिले गेले आहे. स्वा. सावरकरांची विज्ञाननिष्ठा कशातून दिसते? याचे उत्तर – त्यांनी ‘अंदमान बेटावरून समुद्रात उडी घेतली आणि ते पोहत निकोबारला पोहोचले’ असे मिळते. ‘एकांकिका’ची व्याख्या ‘एकपात्री प्रयोग’, कॅथार्ससि (कोंडलेल्या भावनांचा निचरा) हा एक ‘ग्रीक तत्त्ववेत्ता’ अशा भन्नाट उत्तरांवरून, ग्रस्त कोण आणि ग्रासणारे कोण हे सहज ध्यानात येईल. तळमळीच्या प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाचा पगार घेतानाही लाज वाटते. संघटना मात्र ‘नेट-सेटग्रस्तांना’ सोडवा ही मागणी घेऊन उभी! दोनही प्रकारचे लोक हे ‘प्राध्यापक’ या एकाच स्तरातले आहेत हे येथे नोंदवून ठेवू.
आडवे (हॉरिझॉन्टल) अन्याय दुर्लक्षित राहतात
ज्या वाहनचालकांनी घुसाघुशी करून मुळात ट्रॅफिक जाम घडवलेला असतो, त्यांना सर्वात आधी मोकळे करावे लागते. जाम सोडवायला आलेला पोलीस आपण कोणावर खेकसतो आहोत, रिव्हर्स घ्यायला लावतो आहोत आणि मुळात डामरट कोण आहे? या साऱ्याचा विचार करण्याच्या मन:स्थितीत नसतो. अडकलेल्या सर्व वाहनचालकांच्या दृष्टीनेही जाम सुटण्याला इतका तातडीचा अग्रक्रम असतो की न्याय हा विषय तिय्यम झालेला असतो.
जामकत्रे आणि जामग्रस्त समान झालेले असतात. शीर्षकातल्या म्हणीचा पहिला भाग ‘अडग्या बलाला फार मस्ती’ असा आहे. जे बल थोडेसे मारले तरी जास्त जोरात पळतात त्यांना पळते बल म्हणतात. जे बल भरपूर मार खाऊनही हलता हलत नाहीत त्यांना अडगे बल म्हणतात. जोडीला मानेवर सामाईक जू असल्याने दोन्ही बलांना एकाच वेगाने पळावेच लागते. (सिन्क्रोनाइझ व्हावेच लागते) पळता बल पुढे जाऊ लागताच जू वाकडे होऊन अडग्या बलाच्या मानेवर पिळणारा रेटा (टॉर्शन) बसतो आणि नकळत तो पळत्या बलाचा हमसफर होतो. पण सफिरग मात्र पळत्या बलाला जास्त सोसावे लागते. कारण गाडी हाकणारा स्वत:चे ‘मारण्याचे श्रम’ कमी करण्यासाठी, पळत्या म्हणजे ‘सेन्सिटिव्ह’ बलालाच मारणे पसंत करतो. पळत्या बलाला मारही जास्त पडतो, पळावेही जोरात लागते आणि वर जूद्वारे अडग्याला ओढावेही लागते. जू हा दोघांना जोडणारा दुवा शब्दश: जमिनीसमांतर (हॉरिझॉन्टल) आहे. दोघेही हाकले जाणारे बलच, म्हणजे एकाच ‘स्तरातले’ आहेत.
कामे करण्याबाबत माणसांतही, ‘हार्डवर्किंग’पासून ‘वर्किंग हार्डली’पर्यंत प्रकार असतात.  ज्याला कामे करून घ्यायची असतात, त्याला कसेही करून काम होते आहे ना, याचीच चिंता जास्त असते. आपल्या हाताखालच्या लोकांना आपण जे काम करायला लावतो आहे, त्यात आपण कामाचे वाटप न्याय्य करतो आहे की नाही? या प्रश्नाची चाड नसते किंवा त्यांना उद्दिष्टपूर्तीच्या रेटय़ाखाली, अशी चाडबीड बाजूला ठेवावी लागते. करवून घेणारेही त्यांच्या वरिष्ठांच्या दृष्टीने, ‘पळते बल’पासून ‘अडगे बल’पर्यंतच्या क्रमात, कोठे ना कोठे बसत असतात. एकाच कंपनीची दोन युनिट्ससुद्धा पळते-अडगे संबंधात येतात. इतकेच नव्हे तर एका राष्ट्रातील दोन राज्येसुद्धा!
उच्चस्तर हे निम्नस्तरांवर अन्याय करतात, हे प्रसिद्धच आहे. ते दर वेळी अनिवार्यपणे खरे असेलच असे नाही आणि असले तरी, त्यापायी एकाच स्तरात चालणारे अंतर्गत आडवे (हॉरिझॉन्टल) अन्याय दुर्लक्षित करणे, ही मोठीच गफलत आहे. सत्तेची आणि शोषणाची सर्किट्स पूर्ण करण्यात ‘आडव्या’ प्रवाहांचा महत्त्वाचा वाटा असतो. याशिवाय, हे आडवे अन्याय उपेक्षित राहणे हाच; सर्व स्तरांतील जबाबदारीने वागणाऱ्या व संवेदनशील व्यक्तींवर होणारा, एक महाअन्याय आहे. तसेच, जबाबदारीने वागणाऱ्या व संवेदनशील व्यक्तींच्या दृष्टीने, आणखी एक मोठे दुर्भाग्यही आहे. माणसाचे योगदान अचूकपणे मोजण्याची पद्धती सापडलेली नाही, कदाचित सापडणारही नाही. तसेच न्यायासाठी लढणाऱ्या चळवळींना उभे (व्हर्टकिल) अन्याय ठासून मांडण्याच्या भरात आडव्या (हॉरिझॉन्टल) अन्यायांचे अस्तित्वच नाकारण्याची सवय लागली आहे. आडव्या अन्यायावर बोललात की तुम्ही प्रस्थापितवादी ठरलातच म्हणून समजा. मग जबाबदारीने वागणाऱ्या व संवेदनशील व्यक्तींनी हे सर्व कसे घ्यायचे?
सर्वाच्या पाण्यात माझे एकच पेला दूध
महादेवाच्या पिडीला दुधात बुडवायचे म्हणून प्रत्येकाने पेलाभर दूध आणण्याची गोष्ट प्रसिद्धच आहे. सर्वाच्या दुधात माझे एकच पेला पाणी सहज खपून जाईल, असे म्हणून सगळेच पाणी आणतात, अशी मूळ गोष्ट आहे. जो, इतर काय करतील याचा विचार न करता, माझा एकच पेला दुधाचा असला तरी मला चालेल असे म्हणतो, तो नतिक-कर्ता असतो. त्याचे समाधान हे तुलनेने नव्हे तर अंगभूत (इंट्रिन्झिक) असते. माझा पेला दुधाचाच असेल असे मानणारे किती निघतील हे त्या महादेवाचे नशीब! पण नतिक-कर्त्यांचे समाधान मात्र स्वत:च कमावलेले असते. सगळे सामाजिक संदर्भ बाजूला ठेवून एकटय़ाचे उदाहरण घेऊ. समजा, मी डार्ट (हाताने फेकण्याचे बाण) खेळतो आहे. नेम बरोबर लागत नाहीये. म्हणून, जर मी उठून लक्ष्यापाशी गेलो व मध्यिबदूवर डार्ट खोवून परत जागेवर येऊन बसलो, तर मला नेम बरोबर लागल्याचे समाधान मिळेल काय? लांबून मारता आले तरच समाधान का वाटते? कारण माणसात स्वत:ला शुभ फल मिळावे ही आकांक्षा असतेच. पण याहूनही अधिक एक आकांक्षा असते. मला फक्त फल मिळून भागणार नाही तर ते फल ‘मी’ न्याय्य मार्गाने कमावलेले आहे, याचीही खूण पटावी लागते. हाच असतो अर्हतेने मिळणारा आत्मगौरव! विविध व्यक्तींमध्ये ही आस, कमी-अधिक प्रमाणात का होईना, पण असतेच. गरमार्गाने जाऊन तुम्ही, यशाचे ‘धनी’ होऊ शकता पण ‘धन्य’ होऊ शकत नाही. या धन्यतेची गोडी उमजेल त्यांना उमजेल. यावर राजकीय मागणी करता येत नाही. ‘जबाबदार’ विरुद्ध ‘बेजबाबदार’ असा वर्गसंघर्ष होऊ शकत नाही. आपण जिथे असू, तिथे पळत्या बलांची चाड बाळगू शकतो, क्वचित अडग्या बलांना नडूही शकतो, पण इतकेच!
म्हणूनच, ‘‘जगातील कामगारांनो एक व्हा..  बेडय़ांखेरीज गमावण्यासारखे काहीच नाही’’ या चालीवर असे म्हटले पाहिजे. ‘‘जगातील जबाबदारांनो, एकटे वाटून घेऊ या नको, आपण धन्यता कमवीत आहोतच, न्यायासाठीही भांडू आणि एक कटुता तेवढी निरसून टाकू, ती साठू देऊ या नको.’’
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com