नारायणभाई देसाई यांचे वडील महादेव देसाई हे महात्मा गांधींचे खासगी सचिव आणि त्यातही त्यांचे अनुदिनी लेखक. महादेवभाईंनी नारायणला शिक्षण पुरे, काही करणार असशील तर गांधींवरच कर, असा सल्ला देऊन उमलत्या वयातच त्यांच्यात गांधीवाद रुजवला. ते गांधींच्या सान्निध्यातून शिकले आणि इतरांना गांधीवाद शिकवला. त्यांनी गांधीजींचे चरित्र गुजरातीत चार खंडांत लिहून वडिलांची इच्छा पूर्ण केली. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांसाठी ते सर्वशक्तिनिशी वेळोवेळी उभे राहिले. देशात जातीय दंगलींचा रोग जडला होताच, पण नारायणभाई आणि त्यांचे सहकारी त्यावर फुंकर घालण्यासाठी तयार असत. शहर आणि गावांतील अशा अनेक धार्मिक गटांमध्ये जाऊन त्यांनी भडकलेल्या माथ्यांना गांधी शिकवणीने शांत करण्याचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. त्यांच्या शांतता आणि अहिंसेसाठीच्या कार्यासाठी ‘युनेस्को’चा मदनजितसिंग पुरस्कार मिळाला. अणुविरोधी चळवळीतही ते आघाडीवर होते. ‘पीस ब्रिगेड इंटरनॅशनल’ची स्थापना करण्यातही त्यांचा वाटा होता. ‘वॉर रेझिस्टर्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेत त्यांचे कार्य मोलाचे ठरले. आणीबाणीविरोधात जयप्रकाश नारायण यांच्यासोबत त्यांनी रान उठवले. जनता पक्षाच्या स्थापनेतही ते आघाडीवर होते.
वलसाड येथे १९२४ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण साबरमती आश्रम आणि वध्र्यातील सेवाग्राममध्ये गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या ‘भूदान चळवळी’त ते सहभागी झाले. संपूर्ण गुजरात त्यांनी पायी पालथा घातला. श्रीमंतांकडील जमीन भूमिहिनांना देण्यासाठी त्यांनी अनेक जमीनदारांना विनंत्या-आर्जवे केली. याच काळात त्यांनी भूदान चळवळीचे ‘भूमिपुत्र’ हे मुखपत्र सुरू केले. १९५९ पर्यंत ते त्याचे संपादक म्हणून काम पाहात होते.
अनेक उत्तुंग गांधीवाद्यांपैकी एक असलेल्या नारायणभाई देसाई यांनी परवा आपला देह ठेवला. साऱ्या जगाला ‘गांधी कथाकार’ म्हणून ते परिचित होते. २००४ सालापासून त्यांनी विविध देशांत जाऊन गांधीजींविषयी ११८ व्याख्याने दिली. नव्या पिढीला गांधी स्वत:च्या भाषेत समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे ते लोकप्रिय होते. २३ जुलै २००७ पासून ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
रविवारी त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा त्यांच्या पार्थिवासमोर उभ्या असलेल्या पोलिसांना ‘बंदुकांची सलामी’ न देण्याची विनंती कुटुंबीयांकडून करण्यात आली, तीच त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांसाठीची खरी सलामी होती!
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2015 रोजी प्रकाशित
नारायणभाई देसाई
नारायणभाई देसाई यांचे वडील महादेव देसाई हे महात्मा गांधींचे खासगी सचिव आणि त्यातही त्यांचे अनुदिनी लेखक.

First published on: 17-03-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayanbhai desai profiles