आलापना हा कर्नाटक संगीतातील महत्त्वाचा भाग. कृती सादर करण्यापूर्वी तिचा भाव केवळ मांडणारे आलाप गायकाच्या गळय़ातून आणि पाठोपाठच व्हायोलिनमधून उमटत राहतात. रागाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची ती श्रोत्यांच्या मनात.. स्वरांच्या रेघा काढून, ठिपके जोडून थांबायचे नाही.. भावाचे रंगही त्यात भरायचे, अशी आलापनेची रीत. यात अर्थातच व्हायोलिनची साथ तोलामोलाची असावी लागते. या आलापनेचे अनभिषिक्त सम्राट असा लौकिक कर्नाटक शैलीचे गानगुरू नेदुनुरि कृष्णस्वामी यांनी कायम ठेवला होता. अर्थात, त्यांचे सांगीतिक कार्य यापेक्षाही मोठे होते. परंतु नेदुनुरिगरूंचे (गरू- बुवा या अर्थी आदराचा शब्द) निधन सोमवारच्या पहाटे झाल्याची बातमी आली तेव्हा, आलापनेचा अधिपती गेला, अशी हळहळ प्रथम उमटली.
याला कारणही तसेच आहे. एक किस्सा असा की, कर्नाटक शैलीचे दिवंगत व्हायोलिनसम्राट लालगुडी जयरामन एकदा नेदुनुरिंच्या आलापनेस साथ करीत होते. पण नेदुनरिंनी एक आलाप असा घेतला की, लालगुडी थबकलेच.. कृती पूर्ण गाऊन झाल्यावर बुवांनी लालगुडींना कानात विचारले, का हो? एक आलाप सोडूनसा दिलात? तेव्हा लालगुडींनी माइकच हाती घेतला आणि जाहीर केले- श्रोत्यांनाही माझे थांबणे विचित्र वाटले असेल, पण नेदुनरिगरूंच्या आलापनेतील मनोधर्माचे वैभव पाहून मी खरोखरच स्तिमित झालो! शास्त्रीय (हिंदुस्थानी वा कर्नाटक) संगीत क्षेत्रांत असे किस्से भरपूर असतात, त्यापैकी एक नेदुनुरिंचे जाहीर कौतुक एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनी केल्याचाही आहे.. पण याच प्रसंगी पुढे, ‘अम्मा, मी केवळ सेवा करतो आहे.. माझ्याबद्दल बरे बोलणे हा तुमच्या मनाचा मोठेपणा’ असे नेदुनुरि म्हणाले होते, हे अधिक आठवावेसे.
हे मृदू, ऋ जू नेदुनुरि संगीताच्या शिस्तीबद्दल मात्र कठोर होते. तुमचे प्रयोग त्यागराजावर करू नका, असे खडे बोल त्यांनी एका पुरस्कार सोहळय़ात सुनावले. प्रयोग ‘दाखवायचे’ नसतात, ते गळय़ातून ‘व्हावे’ लागतात, असा विश्वास जपणाऱ्यांच्या पिढीत (१० ऑक्टोबर १९२७) नेदुनुरि जन्मले, गरिबाघरच्या या आठव्या अपत्याने संस्कृत व थोडेफार हिंदी शिकून, कल्लुरी वेणुगोपाल रावांकडून प्राथमिक मार्गदर्शन आणि किशोरवयात केवळ गात्या गळय़ाच्या जोरावर तहसीलदार अप्पला नरसिंहन यांचा आर्थिक पाठिंबा मिळवून विशाखापट्टणच्या महाराजा (संगीत) महाविद्यालयातील प्राचार्य द्वारम वेंकटस्वामी नायडू व द्वारम नरसिंह राव यांच्याकडून रीतसर शिक्षण घेतले. पुढे आंध्रमधील १५ व्या शतकातील संत-संगीतकार अन्नमाचार्य यांच्या १०८ कृतींच्या मूळ रचना शोधून, त्यांचे स्वरांकन करण्याचे नेदुनुरिंनी केले. त्यांचे चार शिष्योत्तम आज ख्यातकीर्त आहेतच, पण त्याहीपेक्षा अन्नमाचार्य-संशोधनाचे त्यांचे काम मोठे आहे.