नवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे तसेच यासाठीचे कायदे , नियम अधिक सुकर करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्य भारतीय हा उद्याचा दिवस कसा जाईल या विवंचनेत असायचा. आमच्या मागच्या पिढीने स्वातंत्र्य मिळालेले बघितले, पण सुराज्य व सुबत्तेचे पर्व येण्याची स्वप्नेच बघितली. आज ६७ वर्षांनी सुराज्याचे आपण स्वप्नच बघत असलो तरी सुबत्तेचा शिरकाव थोडय़ा फार प्रमाणात भारतात झाला. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जन्मलेल्या नवीन पिढीला या येऊ घातलेल्या सुबत्तेमुळे उद्याच्या जगण्याची विवंचना नाही तर ज्ञानार्जनानंतर या सरस्वतीच्या माध्यमातून लक्ष्मीला कसे वश करून घेता येईल याची महत्त्वाकांक्षा लागून राहिली आहे. जागतिकीकरण आणि विज्ञान व तंत्रज्ञान, दूरसंचार इत्यादी नवयुगीन प्रत्यक्षांमुळे या तरुणांचे कपडे, केस, आवडी यामध्ये जुन्या पिढीला न रुचणारे फरक पडत गेले, पण त्याचबरोबर पाश्चिमात्य देशातील सुबत्तेचे एक महत्त्वाचे साधन म्हणजेच नवोद्योगाचे वेडही भारतीय तरुणात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून घुमू लागले. माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार यामध्ये झालेल्या क्रांतिकारक बदलांना अंगीकारत संशोधन व बाजाराभिमुख नवकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी लागणारी वातावरण परिस्थिती भारतीय अर्थकारणात मूळ धरू लागली. दरवर्षी देशातील विविध तंत्र महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या पदवीधर तंत्रज्ञांना जशी चाकरीची ऊब हवी होती तशीच नवोद्योग सुरू करण्याचा धोका पत्करण्याची मानसिकताही तयार होत होती. १९७०-८०च्या दशकात चुकून असा नवकल्पना घेतलेला तरुण वित्तसंस्थांकडे अर्थपुरवठा मागण्यासाठी गेला तर त्याच्या पदरी घोर निराशा येई; पण अशाच काही तरुणांनी त्या वेडापायी अमेरिकेचा पश्चिम किनारा गाठत नवोद्योगांची मुहूर्तमेढ रोवून जागतिक पातळीवर यशाची तोरणे बांधली. आज अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अशा यशस्वी मूळ भारतीयांची संख्या शेकडोंच्या घरात आहे, परंतु आज स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी भारतीय बाजारपेठ व अर्थव्यवस्था इतक्या प्रौढावस्थेत पोचली आहे की जोखीम अर्थपुरवठादार किंवा देवदूत भासणारे अर्थपुरवठादार अशा नवकल्पनांचा व त्या राबवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध घेताना दिसतात. गेल्या दशकात याच तंत्राने देशात व परदेशात यशस्वी झालेले कित्येक पन्नाशीतील ‘तरुण-तरुणी’ आज भारतात सुरू होणाऱ्या या नवोद्योगात गुंतवणूक करताना दिसतात.
नवोद्योगांची ही चळवळ गेली १५ वर्षे जोर धरत आहे, पण आमजनतेचे लक्ष याकडे गेले, जेव्हा यातील काही नवोद्योगांनी ज्या गतीने बाजारातून निधी उभा केला त्यामुळे. आता एका फ्लिपकार्ट या नवोद्योगाचे उदाहरण घ्या. २००९ मध्ये बाजारात त्यांनी ६ कोटी रुपयांचा निधी उभा केला. २०१० मध्ये त्यांनी ६० कोटी रुपये उभे केले. २०११ मध्ये १२० कोटी रुपये, २०१२ मध्येही पैसे आणले आणि मग २०१३ मध्ये एकदम त्यांना २१६० कोटी रुपये उभे करता आले. २०१४ मध्ये पूर्ण तोटय़ात चालणाऱ्या या नवोद्योगाने १२,००० कोटी रुपये उभे केले. याच सुमारास स्नॅपडील या कंपनीने ३,७६० कोटी रुपयांचा निधी बाजारात उभा केला. फ्लिपकार्टचा एकूण धंदा आज २०,००० कोटींच्या वर पोहोचला असला तरी त्याला एक रुपयाचा फायदा अजून जमवता आला नाही. तीच गोष्ट स्नॅपडीलची किंवा तीच कथा ई-व्यापारात पडलेल्या सर्वच नवोद्योगांची. आमजनतेलाच नव्हे तर बऱ्याच बाजार किंवा अर्थतज्ज्ञांना हा प्रश्न पडतो आहे की प्रचंड नुकसानीत चाललेले हे उद्योग, जे पुढील ५ वर्षांतही नफा कमावण्याची आशा न करता जागतिक बाजारपेठेत एवढय़ा मोठय़ा रकमांचे निधी कसे उभे करू शकतात? फ्लिपकार्टचे आजचे खासगी गुंतवणूकदारांनी केलेले बाजारमूल्य हे ६६,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही किमया या नवोद्योगांना कशी साधता येते? अर्थात याचे उत्तर सोपे नाही, तर खूप गुंतागुंतीचे आहे; पण अशाच प्रकारच्या अमेरिकन कंपनी अॅमेझॉनचे बाजारमूल्य बघितले तर ते १३,५०,००० कोटी रुपयांच्या वरती आहे! त्यामानाने या भारतीय नवोद्योगांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. नवीन युगातील तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर हे नवोद्योग वाढीला लागले आहेत. यांचे बाजारमूल्य एवढे मोठे असण्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे त्यांचा ग्राहकाशी असणारा थेट संपर्क. अमेरिकेत गुगलचे उदाहरण घ्या. त्याचे बाजारमूल्य २१,९५,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये अलिबाबा नावाचा असाच नवोद्योग. १९९९ साली स्थापन झालेल्या या कंपनीचे आजचे बाजारमूल्य आहे १२,५०,००० कोटी रुपयांचे. अर्थात हे प्रचंड आकडे व बाजारमूल्य हे भारतीय तंत्रज्ञ व उद्योजकांनाही आकर्षित करीत असतात. फ्लिपकार्ट, स्नॅपडील ही त्याची भारतीय उदाहरणे आहेत.
त्या मूल्यवृद्धीच्या प्रचंड आकर्षणामुळे आज म्हणूनच जगात व भारतातही नवोद्योगांचा कुंभमेळा भरला आहे. अगदी शनिवार-रविवार एखादी कल्पना सुचावी, महिन्याभरात थोडेसे स्वत:चे पैसे टाकून त्याकरिता लागणारा तंत्रज्ञान फलाट बांधून घ्यावा व बाजारात निधी उभा करायला धाव घ्यावी अशी कुंभमेळ्यागत परिस्थिती बाजारात दिसत आहे. मी स्वत: काही जोखीम निधी चालवतो. अगदी लहान प्रमाणात नवोद्योगांना चालना देण्यासाठी पूर्ण तंत्रज्ञानआधारित, रूढीगत तंत्रज्ञानाला छेद देणाऱ्या कल्पनांना आम्ही वाव देतो. पण तंत्रज्ञानावर आधारित या बहुतेक उद्योजकांना पुढील पाच वर्षांत बाजारमूल्यात निदान फ्लिपकार्टशी किंवा अलिबाबाशी स्पर्धा करण्याची म्हणजेच अतिश्रीमंतीची स्वप्ने पडलेली असतात. अशा केवळ बाजारमूल्यांच्या अचाट स्वप्नांनी आलेल्या बहुतेक तरुण-तरुणींना बहुधा नकार देण्याचीच वेळ येते. कारण कल्पना सुचली याला महत्त्व नसते तर या कल्पनेचे मूल्यात कसे रूपांतर करता येईल याचा पक्का विचार मनात असणे हेही महत्त्वाचे असते.
आजवरच्या अनुभवातून हा नवोद्योग उत्सुक तरुणवर्गाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला देण्याची गरज आहे. प्रथमत: तुम्हाला सुचलेली कल्पना ही इतर कोणाला सुचली का? नसेल तर का नाही? असेल तर त्यांनी ती सोडून का दिली? या प्रश्नांच्या उत्तरांतून आपले स्वत:चेच शिक्षण होते. पुढचा प्रश्न हा की आपल्या या कल्पनेतून काही क्रांतिकारक तंत्रज्ञान उभे राहू शकेल का? ते तसे नसेल तर अशा प्रकारच्या कोणालाही जमणाऱ्या तंत्रज्ञानावर गुंतवणूकदार कसे पैसे टाकतील, हा प्रश्न सुटला तर मग पुढचा प्रश्न. आपल्या या कल्पनेमुळे ग्राहकाला काही नवीन मिळणार आहे, की आता मिळते त्यात थोडी सुधारणा होणार आहे? नवीन मिळणार असेल तर गुंतवणूकदार पैसा देण्यास अधिक उत्सुक असतात. या प्रश्नाचे उत्तर मिळाले की पुढचा प्रश्न योग्य वेळेची निवड करण्याचा. आज ही कल्पना बाजारात घेऊन जायची योग्य वेळ आहे का, या प्रश्नाचे होकारार्थी कारणांसहित उत्तर मिळाले तर पुढचा प्रश्न- आपली ही कल्पना बाजारात आपली मक्तेदारी निर्माण करू शकेल की आपण उद्योग सुरू करताच अनेक उद्योजक अशा प्रकारची कल्पना घेऊन बाजारात येऊ शकतील? तुमची कल्पना जेवढी अद्वितीय तेवढी तुमची मक्तेदारी मजबूत व म्हणूनच तुमचे बाजारमूल्यही चढे. म्हणजेच गुंतवणूकदार तुमच्या कल्पनेवर पैसा लावण्यास उत्सुक असतील. हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवल्यावर पुढचा प्रश्न- तुमच्याकडे योग्य माणसे कामाला आहेत का? तुमच्यासारखी हुशार, उत्साहित, केवळ याच कल्पनेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कुशल लोकांना आकर्षित करणे व त्यांना आपल्याबरोबर नेणे हे सर्वात महत्त्वाचे व कठीण काम आहे. हे सर्व होऊन तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणलीत तर त्याचे वितरण कसे करणार आहात? याचा संपूर्ण आराखडा तुमच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुम्ही बाजारात आणणार आहेत ते उत्पादन वा सेवा पुढील निदान १० ते २० वर्षे बाजारात विकली जाईल का? अल्पायुषी उत्पादनांवर गुंतवणूकदार मुळीच पैसा लावत नाहीत! या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वत: प्रामाणिकपणे देणे जरुरीचे आहे.
मुळात नवीन कल्पना ही आपल्या अनुभवावर व संशोधनावर अवलंबून असते. या कल्पनेतून येणारे उत्पादन वा सेवा बाजारात कोणाला पाहिजे हे कळणे जास्त महत्त्वाचे आहे. आजवरच्या तज्ज्ञांच्या निरीक्षणातून हे सिद्ध झाले आहे की आजचे मोठे उद्योग हे या नवनवीन कल्पनांचे उगमस्थान ठरू शकत नाहीत व म्हणूनच अशा नवीन कल्पना या लहान उद्योगांच्या माध्यमातूनच जन्म घेतात. त्यामुळे कल्पनेपासून मोठय़ा प्रमाणात उत्पादनाची जी एक लांब साखळी असते त्यातील पहिल्या दोन-तीन टप्प्यांवर या नवोद्योगांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडता येईल. भारतात संरक्षण विभाग व रेल्वे मंत्रालय तसेच आयात पर्यायाची सर्व देशी उत्पादने यामध्ये या नवोद्योजकांना जर महत्त्वाची भूमिका पार पाडता आली तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकेल. आजचे बाजारातले वातावरण, वित्तपुरवठा, सरकारी धोरणे व भारतीयांची उद्योजकता या सर्व आधारे या नवनवीन कल्पनांचा वापर करीत भारतातील संशोधन व नवोद्योजक वाढीस लागावेत याकरिता भारतातील काही शिक्षणसंस्था व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, राजस्थान यांसारखी राज्य सरकारेही पुढे सरसावली आहेत. अशा उद्योगांना सुकर कायदे करून दिले तर त्यांना काही मदत होऊ शकेल. माझ्या मते राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे नवोद्योजकच स्वस्त घरांचे तंत्रज्ञान, २४ तास ऊर्जा, शुद्ध पाण्याचा पुरवठा, पर्यावरणसुलभ कचरा आयोजन अशा भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना सोडवणाऱ्या कल्पना मांडून त्यातून नवीन उद्योग काढतील. भारतीय बाजारपेठ बघता अशा नवोद्योजकांना परदेशी गुंतवणूकदारही मिळतील आणि सर्वसामान्य भारतीय माणसाच्या समाधानाबरोबर अर्थ व मूल्यवृद्धीत भारतीय नवउद्योजक जगात आघाडीवर राहतील, अशी मला खात्री आहे. मला वाटते असे उद्योग हे केवळ वितरण करणाऱ्या व भरमसाट मूल्ये असणाऱ्या कंपन्यांपेक्षा जास्त हवेहवेसे वाटतील!

दीपक घैसास –

लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com