05 March 2021

News Flash

व्यक्तिपूजा नव्हे, कदर

‘पुरे झाली व्यक्तिपूजा’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. यातील चुकीच्या मुद्दय़ांमुळे ते पटणे अशक्य आहे. उघडय़ा डोळ्यांनी जर पाहिले तर क्रिकेटमधील एक अग्रगणी खेळाडू

| April 29, 2013 12:47 pm

‘पुरे झाली व्यक्तिपूजा’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. यातील चुकीच्या मुद्दय़ांमुळे ते पटणे अशक्य आहे. उघडय़ा डोळ्यांनी जर पाहिले तर क्रिकेटमधील एक अग्रगणी खेळाडू सचिन याने लक्षवेधी व उत्तुंग कामगिरी करूनही तो गेली २४ वर्षे जमिनीवरच आहे (नगरसेवक, आमदार बघा!). हे अगदीच नगण्य आहे काय? यामुळेच त्याच्या अनेक चाहत्यांनी जर त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्यात कोणाचे कसे नुकसान होते?  ‘क्रिकेट हा फक्त दहा देशांत खेळला जाणारा रटाळ खेळ’ असे जर असेल तर सामन्यांना होणारी गर्दी ही काही पसे देऊन जमा केलेली गर्दी (राजकीय सभेप्रमाणे) नक्कीच नाही. ‘भारतीय उपखंडाबाहेर कोणी क्रिकेटला, क्रिकेटपटूंना ओळखतदेखील नाही’  हेही खरे नाही. राष्ट्रकुलातील अनेक देशांत क्रिकेट आहेच, आणि सध्या तर चीन,अमेरिका व कॅनडामध्येसुद्धा क्रिकेटचा खेळ रुजत आहे. टेनिसपटू रॉजर फेडरर ( स्वित्र्झलड) याची सचिनशी मत्री काय दर्शविते? नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्याला भेटायला नक्कीच आवडेल असे म्हटले! मायकल शुमाकर (जर्मनी) यांनी सचिनला भेट दिलेली फेरारी गाडी .. याचाच अर्थ सचिन हा एक जागतिक ख्यातीचा खेळाडू आहे; क्रिकेट त्या देशांत खेळले जात नसले तरी! भारतात नसेल तरी शुमाकर हा सीमा ओलांडून भारतात प्रसिद्ध आहेच ना? लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात सर्वसमाविष्ट विषयांखेरीज समाजमनावर ज्यांनी चांगला ठसा उमटविला व ज्याच्या खेळण्यातील अनेक डावानी केवळ आनंदच दिला, त्यावर पुरवणी काढली तर काहीच बिघडले नाही. माझ्या मते ‘लोकसत्ता’ व्यक्तिपूजा नाही तर आदर्श व्यक्तीची कदर करतच असतो. गेल्या २ ऑलिम्पिक खेळात भारतीय खेळाडू चमकले. त्यांनाही लोकसत्ताने प्रसिद्धी दिल्याचे दिसले आहेच!  
प्रवीण आंबेसकर, ठाणे

‘ललित’कडून खूप अपेक्षा
ललितची भावंडे हा सतीश कामत यांचा लेख वाचला. (लोकसत्ता २६ एप्रिल). लेखाचे शीर्षक सयुक्तिक वाटत नाही. कारण माणूस मनोहर यांची जातकुळी वेगळी होती तर किर्लोस्कर आणि स्त्री ही माहितीप्रधान, रंजनप्रधान मासिके होती. सत्यकथा तर तथाकथित अभिजन साहित्यिकांनी तयार केलेला आणि उच्च अभिरुचीचा कांगावा करणारा किचकट कट होता. ललित हे शुद्ध साहित्यिक स्वादाचे मासिक मानावे लागेल.
हे मासिक सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे, यात ललितकारांबरोबर मराठी रसिकांचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. कारण ललित हे मासिक साहित्य ग्रंथव्यवहार या विषयी कोणताही भेदभाव न करता जाणकारीने माहिती देते. त्यामुळे इतर प्रकाशनगृहासारखे ते एक house magazine राहिलेले नाही हे त्यांचे श्रेय नक्की आहे.
पण याचबरोबर अंकातील साहित्य, लेख, मुलाखती, ललित वाङ्मय याचा दर्जा मात्र गेले काही वर्ष कमालीचा घसरत चाललेला आहे. साहित्यप्रेमींना यातून काही नवं, ऊर्जा देणारं सर्जनशील असं वाचायला मिळत नाही. अर्थात सध्या निघत असलेले विशेषांक त्याला अपवाद आहेत. पण त्याचा असाही अर्थ निघतो की विशेषांक काढल्याशिवाय यातून कसदार साहित्य मिळत नाही. ५० वर्षांचा अनुभव असलेल्या मासिकाकडून खरे म्हणजे प्रत्येक अंकच विशेषांकासारखा यावा अशी वाचक म्हणून आमची अपेक्षा आहे, ती त्यांनी पुरी करावी.
सौमित्र राणे, पुणे

‘भारत-चीन संबंध आणि स्वा. सावरकर’
चीननं भारताच्या प्रदेशात १० कि.मी. खोलवर नुकतीच घुसखोरी केली. त्या संदर्भात अग्रलेख तसेच सी. राजा मोहन यांनी लिहिलेला लेख (२५ एप्रिल) आवडले. सध्या चीनने केलेल्या घुसखोरीच्या संदर्भात स्वा. सावरकरांची तीव्रतेनं आठवण होते. देशाच्या सीमांचं रक्षण करण्याबाबत त्यांनी अनेकदा सावधानतेचे इशारे दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी सर्वप्रथम केलेली सूचना होती. ‘देशाच्या सीमा निश्चित करा.’ पण राज्यकर्त्यांनी त्यांची उपेक्षा केली. त्यामुळं पुढच्या काळात चीननं सीमेसंबंधी वाद निर्माण केला आणि अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मॅकमोहन रेषेला मान्यता देण्यास नकार दिला.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी सावरकरांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यात ते म्हणतात – ‘आपल्या देशाच्या मोक्याच्या सीमा अजूनही आपल्या शत्रूंच्या हातात आहेत. केवळ सुरम्य सिद्धांतांची सुनीते गाऊन आपण त्यांची मैत्री संपादन करू शकणार नाही. अशी वेडगळ धोरणं ठेवली, तर दीर्घकालीन रक्तरंजित लढा देऊन आपण जे काही कमावलं आहे, ते सर्व आपण गमावून बसू. दुसरा ज्या तऱ्हेनं आपल्याशी वागतो त्याच तऱ्हेनं त्याच्याशी वर्तन ठेवणं, हाच आपलं अस्तित्व टिकवण्याचा एकच एक मार्ग आहे.’
आपल्या देशाच्या संरक्षणांसंबंधात सावरकरांनी दिलेले इशारे ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या घोषणांमध्ये विरून गेले. त्या काळात भारत आणि चीन यांच्या ‘शांततापूर्ण सहजीवना’ची कल्पना वारंवार मांडली जात होती. या कल्पनेची थट्टा करताना सावरकर म्हणाले, ‘सहजीवन दोन प्रकारचं असतं. एकमेकांशेजारी बसून, बरोबरीनं वागून होतं ते एक सहजीवन. एकानं दुसऱ्याच्या पोटात जाऊन होतं तेही सहजीवनच. वाघ जेव्हा शेळीला खातो तेव्हा संपूर्ण सहजीवन होतं.’ त्यांनी पुढं ठामपणानं सांगितलं- ‘न्याय वगैरे काही नाही या जगात. When the whole world is aggressive, you must be aggressive; when the whole world is unjust, you must be unjust.. युद्धशास्त्रातलं एक महत्त्वाचं तत्त्व त्यांनी या संदर्भात सांगितले. ‘जेव्हा युद्ध अटळ आहे असं दिसतं, तेव्हा शत्रूवर आक्रमण करावं. He wins half the war who aggresses- takes the defensive ‘संरक्षक सैन्य’ हा शब्दप्रयोगच त्यांना मान्य नव्हता. सैन्य हे आक्रमक असेल, तरच ते राष्ट्राचं संरक्षण करू शकेल असं ते म्हणत. एवढय़ा मोठय़ा देशाचं रक्षण करावयाचं असेल, तर १ कोटीचं खडं सैन्य हवं असं त्यांचं प्रतिपादन होतं.
डॉ. गिरीश पिंपळे

‘सेलेब्रिटीं’चे सामाजिक उत्तरदायित्व
भारतासारख्या खंडप्राय देशात चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू हे देवासमान पूजले जातात. चाहत्यांचे प्रचंड प्रेम लाभल्याने दीर्घकाळ त्यांच्या नांवाभोवती एक वलय लागून राहते, हे आपण पाहिलेलेच आहे. ऐन उमेदीच्या काळात अशा सेलेब्रिटीचा वापर बाजारपेठेकडून व्यवस्थित केला जातो, अन् देवसमान चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू यांनी केलेल्या जाहिरातीच्या जोरावर बडय़ा कंपनीचा माल सहज खपला जातो, सेलेब्रिटीसुद्धा मालामाल होतात.
एवढे सांगण्याचा उद्देश हा की, ज्या जनतेच्या प्रेमाने ही सेलेब्रिटी मंडळी करोडपती होतात, त्या मंडळींचे काहीच सामाजिक उत्तरदायित्व नाही का? अशा मंडळींनी नागरी समस्येबद्दल कधी जाहीर विधाने केल्याचे आठवत नाही, अपवाद फक्त नाना पाटेकरसारख्या कलाकारांचा आणि शीतपेयाची जाहिरात नाकारणाऱ्या गोपीचंदचा.
माझ्यासारख्या तरुणाला नेहमी वाटते की देवत्व प्राप्त झालेल्या सेलेब्रिटी व्यक्तींनी जर जाहीरपणे सामाजिक अव्यवस्थेबद्दल मते मांडली तर त्यांचे विधान फार मोठी बातमी ठरू शकेल व त्याचा उपयोग प्रशासन गतिमान होऊन तो प्रश्न मार्गी लागण्यात होऊ शकेल. आपल्या वैयक्तिक कारणासाठी लता मंगेशकर यांनी पेडर रोड पुलाबाबत भाष्य केले होते. त्याची सरकारला दखल घ्यावी लागली होती, परंतु गानकोकिळेने मुंबईच्या रस्त्यांबाबत किवा रहदारीच्या समस्येबाबत कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. तसे ते केले असते तर त्याचा फायदा नक्कीच मुंबईकरांना म्हणजेच त्याच्या चाहत्यांना झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही.
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चनसारख्या महान व्यक्ती आयुष्यातला एक दिवस खर्ची करून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या भावना जाणण्यासाठी विदर्भ-मराठवाडय़ात जाऊ शकत नाही का? नक्कीच जाऊ शकतील. फक्त आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्याची म्हणजेच सामान्य माणसांशी त्यांची नाळ जुळलेली असावी. अशा मंडळीच्या दुष्काळी प्रदेशातील भेट एक मोठी बातमी ठरेल. ब्रेकिंग न्यूजसाठी हपापलेला मीडिया त्याची टेप दिवसभर दाखवून त्यावर चर्चा घडवून आणील, अन् मला खात्री आहे की सरकारला त्याची योग्य ती दखल घेऊन युद्धपातळीवर मदत करावी लागेल.
सांगायचा मुद्दा हा की, जर सेलेब्रिटी मंडळीनी सामान्यांचे दु:ख आपले मानून त्यावर मतप्रदर्शन केले तर नक्कीच प्रशासकीय कामात गुणात्मक फरक पडू शकेल. प्रसंगी जनतेच्या हितासाठी पक्षीय राजकारण करावे लागले तरी हरकत नाही.
सचिन मेंडिस, वसई 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 12:47 pm

Web Title: no personality cult respect
Next Stories
1 सावरकरांनी धोक्याचा इशारा दिला होता..
2 कौतुक करावे तेवढे थोडेच..
3 गुन्हा दाखल कराच!
Just Now!
X