भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते आणि क्रिकेटपटूंना देव. क्रिकेट हा खेळ देशवासीयांच्या नसानसांत भिनला आहे. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नव्हते, पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली. क्रिकेटच्या प्रशासकांनी आपल्या खेळाला इतक्या उंचीवर आणून ठेवले की वर्षभर क्रिकेट एके क्रिकेट अशीच चर्चा रंगू लागली आहे. अन्य खेळ मात्र अजूनही आपला लौकिक वाढवण्यासाठी झगडत आहेत. क्रिकेटप्रमाणे अन्य खेळ संघटनात्मक, व्यवस्थापकीय, प्रशासकीय पातळीवर कमी पडले, त्यामुळे क्रिकेटची पाळंमुळं घट्ट होण्यास मदत झाली. पण अन्य खेळ वाढवण्यासाठी संघटनाच निष्क्रिय ठरल्या, हे ‘लोकसत्ता’ लाऊडस्पीकर कार्यक्रमात ‘क्रिकेटचा अतिरेक होतोय का’ या विषयावरील परिसंवादादरम्यान अन्य खेळांच्या संघटकांनी मान्य केले. मात्र त्याचबरोबर खेळ वाढवण्यासाठी, रुजवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि ही जबाबदारी प्रशासकांसह संघटक, खेळाडू आणि पालकांची आहे, असे मान्यवरांनी सांगितले.
राजकीय अनास्था.. क्रीडा धोरणाचा नसलेला थांगपत्ता.. पुरस्कर्त्यांचा अभाव.. अनुकरणीय, आदर्श खेळाडूंची कमतरता.. खेळापेक्षा शिक्षणाला असलेले अवाजवी महत्त्व तसेच पालकांची मानसिकता यामुळे अन्य खेळ बरेच मागे पडू लागले आहेत. तळागाळापर्यंत खेळ पोहोचवायला आणि रुजवायला संघटना कमी पडल्या. त्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा वेग फारच संथ गतीचा आहे. खेळाचे उपयोग, आवाका, संशोधन, मार्केटिंगचं तंत्र लोकांपर्यंत पोहोचवलं तर अन्य खेळांनाही सोनेरी दिवस येतील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. नरिमन पॉइंट येथे रंगलेल्या या कार्यक्रमात नेमबाजपटू आणि प्रशिक्षिका शीला कनुंगो, मुंबई खो-खो संघटना आणि मुंबई शहर लंगडी संघटनेचे प्रमुख कार्यवाह अरुण देशमुख, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, मल्लखांब प्रशिक्षिका आणि क्रीडा मानसतज्ज्ञ नीता ताटके तसेच क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू गौरी वाडेकर सहभागी झाले होते.  

अन्य संघटनांकडून प्रयत्नच होताना दिसत नाहीत..
क्रिकेटचा अतिरेक होतोय, यावर माझे उत्तर हो आणि नाही असे आहे. क्रिकेट पाहून आणि वृत्तपत्रात फक्त क्रिकेटच्या बातम्या वाचून आता वीट येऊ लागला आहे. आणि नाही अशासाठी की क्रिकेटच्या प्रशासकांनी म्हणा किंवा बीसीसीआयने आपल्या खेळासाठी जे काही केले, ते अन्य खेळाच्या प्रशासकांना, संघटकांना, खेळाडूंना करता आले नाही. २० वर्षांपूर्वी मी कॉलेजला होते, तेव्हा अन्य खेळांप्रमाणेच क्रिकेटचीसुद्धा हीच परिस्थिती होती. क्रिकेटला पुढे आणण्याकरिता प्रशासकांनी विशेष प्रयत्न केले, त्यामुळेच आज क्रिकेटची इतकी क्रेझ आहे. त्यामुळेच क्रिकेटवर टीका करण्याऐवजी आपला खेळ कसा पुढे आणता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. क्रिकेटपटूंप्रमाणे ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनाही प्रसिद्धी मिळत नाही, ही बाब मला खटकते. त्याचबरोबर अन्य खेळांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नाही. नेमबाजांना केंद्र सरकारकडून मदत मिळत असली तरी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न मात्र तोकडे पडत आहेत. भारतात क्रीडासंस्कृती रुजलेली नाही, हीसुद्धा खेदाची बाब म्हणावी लागेल.
 शीला कनुंगो, नेमबाजपटू आणि प्रशिक्षिका

क्रिकेटकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रवृत्ती बदलायला हवी
क्रिकेट अति होतेय, हे मला मान्य नाही. भारताने २०११चा विश्वचषक जिंकला, त्या वेळी सर्व क्रिकेटपटूंना रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आल्यामुळे त्याकडे बघण्याची पालकांची मानसिकता बदलू लागली आहे. माझा मुलगा आयपीएल खेळला तर कोटय़धीश होईल, ही पालकांची प्रवृत्ती बनली आहे. क्रिकेटकडे लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागली आहेत.
सचिन तेंडुलकर १०० वर्षांतून एकदाच घडू शकतो. सगळे सचिन होऊ शकत नाहीत. त्यामुळे माझा मुलगा क्रिकेट खेळू लागल्यावर सचिन बनेल, हा गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये मिळणारा गडगंज पैसा पालकांना दिसू लागला आहे. पण मुलांना काय हवे आहे, हेसुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. मुलांना खेळायला आवडते, पण स्पर्धेतील हार-जीत त्यांना नको असते. मला खेळाचा आनंद लुटायचाय, यासाठी मी खेळतो, ही यंत्रणा सक्षम नाही.
दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक

खेळ वाढवण्याची जबाबदारी उचलण्याची गरज..
नक्की होतोय. पण क्रिकेटची बलस्थाने भक्कम. क्रिकेट ज्या वेळी वाढू लागले, त्या वेळी क्रिकेटने आपले रंग कालानुरूप बदलले. कसोटीवरून एकदिवसीय आणि एकदिवसीय क्रिकेटवरून ट्वेन्टी-२० आणि आयपीएल, अशी क्रिकेटची वाटचाल झाली. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून क्रिकेटने आपला रंग आणि रूप बदलून चाहत्यांना आकर्षित केले. अन्य कोणत्याही खेळाने असे रंग आणि रूप बदलले नाहीत. क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवरती जितकी पुस्तके आहेत, तितकी पुस्तके अन्य कोणत्याही खेळाची दिसणार नाहीत. क्रिकेटच्या विश्लेषणाचे तंत्रसुद्धा उपलब्ध आहे. बाकीचे सगळे खेळ तंत्रामध्ये कमी पडताहेत. माजी क्रिकेटपटू कोणत्या ना कोणत्या कारणाने क्रिकेटशी निगडित असतात. पण अन्य खेळांतील माजी राष्ट्रीय आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आपल्या खेळाशी संलग्न नाहीत, ही खंत वाटते. क्रिकेटला दोष देण्यापेक्षा माझा खेळ वाढवला पाहिजे, ही जबाबदारी खेळाडू, प्रशिक्षक, संघटकांची, पालकांची आहे. खेळाचे उपयोग, आवाका, संशोधन, मार्केटिंगचं तंत्र लोकांपर्यंत पोहोचवलं तर अन्य खेळांनाही सोनेरी दिवस येतील.
नीता ताटके , मल्लखांब प्रशिक्षिका आणि क्रीडा मानसतज्ज्ञ

पैसे ओतणारा राजकीय नेता संघटनांच्या प्रमुख पदावर असणे चुकीचे..
एखादी मालिका हरल्यामुळे क्रिकेटचा अतिरेक झालाय, ही वाच्यता करणे मला योग्य वाटत नाही. १९७१-७२मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने सुरेख यश संपादन केले, त्या वेळी इंदोरला वाडेकर यांच्या गौरवार्थ बॅट उभारण्यात आली. पण तोच भारतीय संघ अपयशी ठरल्यानंतर त्या बॅटची नासधूस करण्यात येते, ही मानसिकता आपल्याकडे आहे. कालपरवापर्यंत सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी होत होती. पण भारत इंग्लंडविरुद्ध हरला, त्यामुळे सचिन आपल्यापासून दुरावतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. संघटनात्मक, व्यवस्थापकीय, प्रशासकीय पातळीवर कमी पडल्यामुळे आणि तरुणांमध्ये क्रिकेटची पाळंमुळं घट्ट रुजल्यामुळे क्रिकेटचा अतिरेक झालाय, ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटची प्रशासकीय यंत्रणा इतकी सक्षम आहे की, कोणतेही सामने असोत, त्याच्या बातम्या त्यांना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवाव्या लागत नाहीत. आज कोटय़वधींचा निधी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आहे. पण खो-खो संघटनांना खुंटसुद्धा उसना आणावा लागतो. राजकीय मंत्री क्रीडा संघटनांच्या निवडणुकीसाठी उभे राहतात, तेव्हा निवडणुकीचा माहोल राजकीय निवडणुकीला लाजवेल असा असतो. मतदार, क्लबही त्या वेळी विकले जातात. क्रिकेटचा अतिरेक खेळाने झालेला नाही तर क्रीडारसिकांच्या, खेळाडूंच्या मानसिकतेमुळे झाला, असं मला वाटतं. आम्ही खेळाडूंना मैदानात आणतो, समूहाने जगायला शिकवतो. लहान मुलांमध्ये निर्भयपणे खेळण्याचे संस्कार या वेळी होत असतात. कोणता राजकीय नेता पैसा ओततो, म्हणून तो खेळांच्या संघटनांवर प्रमुखपदी असावा, हे चुकीचे आहे. खेळाडूंनी स्वत:ला घडवण्यासाठी मेहनत केलेली असते.. किंमत मोजलेली असते. अशाने त्यांची किंमत राहत नाही. इतरांप्रमाणे आम्हीसुद्धा विकले जातो, तेव्हा आमचा खेळ संपायला सुरुवात होते.
भास्कर सावंत -मैदान बचाव समितीचे अध्यक्ष

देशी खेळांनाही स्थान द्यायला हवे..
क्रिकेटचा अतिरेक हा नक्कीच होतोय. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यास क्रिकेटपटूंना घसघशीत मानधन मिळते, पण दुर्दैवाने कबड्डीच्या बाबतीत तसे होत नाही. अलीकडे ही मानसिकता थोडी बदलत चालली असून विश्वचषक विजेत्या कबड्डीपटूंना एक कोटी रुपये बक्षीस देण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे.
क्रिकेटला भरभरून प्रसिद्धी देणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये कबड्डी खेळाला स्थान हे नगण्य आहे. प्रसारमाध्यमांनीही देशी खेळांनाही स्थान द्यायला हवे. क्रिकेटचा संघ परदेशी दौऱ्यावर जातो, त्या वेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षक, फिजियो, व्यवस्थापक, मसाजर अशी मंडळी दिमतीला असतात. पण कबड्डी संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळायला जातो, त्या वेळी आमच्यासोबत फक्त प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि क्वचितप्रसंगी फिजियो असतो.
गौरी वाडेकर, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू

प्रसारमाध्यमांना दोष देणे चुकीचे..
क्रिकेटचा अतिरेक १०० टक्के होतोय. कालानुरूप क्रिकेट बदलत गेले. कसोटीवरून एकदिवसीय आणि एकदिवसीयवरून ट्वेन्टी-२० अशी क्रिकेटची वाटचाल झाली. सध्या जन्माला आलेल्या आयपीएलमुळे क्रिकेटलाच धोका निर्माण झाला आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट वाचवण्यासाठी क्रिकेट प्रशासकांचे प्रयत्न सुरू आहेत. ट्वेन्टी-२० आणि आयपीएलचा फॉरमॅट वेगळा आहे. आयपीएल आणि ट्वेन्टी-२०मध्ये प्रत्येक चेंडूवर धावा काढायच्यात, हेच फलंदाजाचे उद्दिष्ट असते. पण ही गोष्ट कसोटीत चालत नाही. त्यामुळे सध्याच्या क्रिकेटपटूंचे आयपीएल किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्याकडेच लक्ष लागलेले आहे.
खो-खो आणि कबड्डीमधील चांगल्या खेळाडूंना नोकऱ्या आहेत. कबड्डीमधील एखादी खेळाडू महाराष्ट्रातर्फे खेळली की तिला पुढील वर्षी रेल्वेची नोकरी मिळते. कबड्डीत स्पर्धा आहे, त्यांचे ४०० संघ अ, ब, क अशा विभागांत खेळतात. सरकारी नोकऱ्या नाकारणारे खेळाडूही आहेत. कबड्डी आणि खो-खो या खेळांना व्यावसायिक आंदण लाभल्यामुळे हे खेळ सुदैवी आहेत. खो-खो, कबड्डी हे खेळ आता-आता मॅटवर येऊ लागले आहेत. क्रीडारसिकांना खेळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. क्रिकेटचा अतिरेक होतोय, यासाठी प्रसारमाध्यमांना दोष देणे चुकीचे आहे. वृत्तपत्रांमध्ये आपल्या खेळाच्या बातम्या पोहोचवण्यात संघटक कमी पडत आहेत. मी खो-खोच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये देतो, तेव्हा किमान सहा-सात वर्तमानपत्रांमध्ये फोटोसहित बातमी छापली जाते. इंग्रजी वृत्तपत्रांपर्यंत आम्ही पोहोचतच नाही.
अरुण देशमुख, मुंबई खो-खो संघटना आणि मुंबई शहर लंगडी संघटनेचे प्रमुख कार्यवाह

उद्योजकांनी प्रायोजकत्व द्यावे..
पालकांना क्रिकेटचे अक्षरश: वेड लागले आहे. आपला मुलगा सचिन तेंडुलकर बनावा, ही जवळपास प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. तशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. पण लहान मुलांवर तू क्रिकेटच खेळायला हवे, ही सक्ती करणे चुकीचे आहे. क्रिकेटपटूला कुणीही घडवत नसतो. त्याच्यात उपजत कौशल्य असणे गरजेचे असते. क्रिकेटला प्रायोजकत्व आहे, चेहरा आहे. पण बडय़ा उद्योगांनीही अन्य खेळांना प्रायोजकत्व देण्यास सुरुवात केली तर तीन-चार वर्षांत चित्र नक्कीच बदलेल. एखाद्या खेळाला वाढण्यासाठी माणसे, सक्षम संघटना, व्यवस्थापकीय कौशल्य आणि पैसा लागतो, या सगळ्या गोष्टी क्रिकेटकडे ठासून भरलेल्या आहेत. पण या गोष्टी मिळवण्यासाठी संघटक प्रत्येक पातळीवर झगडत असतात. हे झगडणं सुसह्य केलं तर नक्कीच फरक पडेल. दो कदम तुम भी चलो, दो कदम हम भी चले, असे म्हणून सगळे प्रयत्न करू लागले तर चांगले होईल. अन्य खेळांच्या वातावरणनिर्मितीसाठी, प्रचारासाठी, प्रसारासाठी संघटना नक्कीच तयार आहेत, पण त्यासाठी लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे.  
– मनोहर साळवी
(मुंबई खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष)

 गावागावांत खेळ पोहोचणे गरजेचे
ग्रामीण भागांत खेळ पोहोचणे महत्त्वाचे, तसेच ग्रामीण भागांत संघटनात्मक काम होणे गरजेचे आहे. तळागाळापर्यंत खेळ पोहोचवायला आणि रुजवायला संघटना कमी पडल्या आहेत. मात्र प्रयत्न होतात, ही समाधानाची बाब आहे. मात्र वेग फारच संथ गतीचा आहे. ग्रामीण भागात क्रिकेट, फुटबॉलसारखे महागडे खेळ खेळणे परवडणारे नाहीत. पण एका गावात झाडाच्या फांदीचा खुंट उभा केला की वर्षांनुवर्षे त्यावर खो-खो खेळला जातो, ही वस्तुस्थिती आहे. अशाच पद्धतीने कबड्डी आणि लंगडीसुद्धा खेळली जाते. ग्रामीण भागांत हे खेळ पी.टी. शिक्षक जिवंत ठेवून आहेत. मात्र ते खेळ गावागावापर्यंत पोहोचले आहेत, याचा प्रसार करण्यात आम्ही कमी पडलो आहोत. विटीदांडू, सागरगोटे यांसारख्या खेळांना आपण ग्लॅमर देऊ शकलो नाही.
– बाळ वडवलीकर
(कबड्डी संघटक)

काही खेळ टीव्हीवर पाहण्यासारखे
नेमबाजीचं तंत्र सध्या विकसित होऊ लागलं आहे. ऑलिम्पिकमध्ये विजय कुमारची लढत बऱ्याच जणांनी टीव्हीवरून पाहिली. तेव्हा त्याने किती गुण मिळवले, हे चटकन समजत होतं. त्यामुळे नेमबाजी हा खेळसुद्धा टीव्हीवर बसून आनंद लुटण्यासारखा बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही खेळ खूप आकर्षक आहेत. जिम्नॅस्टिक्स, डायव्हिंग, मल्लखांब, ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स, तालबद्ध आणि लयबद्ध जलतरण हे खेळ पाहण्यासारखे आहेत. हा खेळ लोकांना समजू लागला तर नक्कीच या खेळाचे अनेक चाहते निर्माण होतील.
तुकाराम कदम
(क्रीडा कार्यकर्ते)

 शिक्षणाला फारच महत्त्व दिले जाते!
 खेळाचा पाया विस्तृत करायला हवा. आपल्याकडे शिक्षणाला बरेच महत्त्व दिले जाते. मुलगा दहावीत, बारावीत गेला की त्याचा खेळ बंद होत जातो. परीक्षा आल्या की व्यायामशाळा ओस पडू लागतात. परीक्षेत चार गुण कमी पडले तरी चालतील, पण खेळल्याने आयुष्यभर फायदे होतील, हा संदेश पालकांपर्यंत पोहोचला तरी हे चित्र बदललेले दिसेल. मुलगा खेळला तर तो जीवनात हमखास यशस्वी होईल. आपल्याला ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवायचे नाहीत, तर संगणकासमोर बसणारी मुले मैदानावर आणायची आहेत. प्रसारमाध्यमांनी हा संदेश पालकांपर्यंत पोहोचवला तर आमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
सुबोध हळदणकर
(क्रिकेट प्रशिक्षक)

 सामने वेळेवर सुरू व्हायला हवेत..
सामने सुरू असताना अचानक पाहुणे येतात म्हणून सामने थांबवले जातात. प्रत्येक खेळाच्या चांगल्या आणि वाईट सवयी असतात. हा खो-खो आणि कबड्डीमधला वाईट गुण आहे, पण यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले जात आहेत. आता सामन्यांना उशीर होऊ नये, यासाठी संयोजकांवर, पंचांवर दडपण टाकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सामने वेळेवर खेळवले जातील, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– उमाकांत पावसकर
(क्रीडा संघटक)

 जर्मनीतही मल्लखांब मराठीतच शिकवला जातो..
 आपले खेळ परदेशातही खेळले जावेत, यासाठी अनेक प्रयोग केले गेले. कुस्ती, खो-खो, कबड्डीसारखे खेळ मॅटवर आले. नैसर्गिक हिरवळीवर खेळली जाणारी हॉकी अ‍ॅस्ट्रो-टर्फवर आली, त्या वेळी आपण मागे पडू लागलो. पण हे खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे खेळ होते. मल्लखांब हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. पण एक, दोन, तीन हे आकडे आणि संस्कृतमधील काही श्लोक जर्मनीतही मराठी भाषेतच बोलले जातात. बजरंगपकडसारखी नावे आम्ही तशीच ठेवली आहेत. आपला खेळ इतका ताकदवान असला पाहिजे की परदेशी राष्ट्रांनीही तो खेळ तसाच्या तसा स्वीकारला पाहिजे.
प्रसन्न माळशे (अ‍ॅडव्होकेट)

राजकीय नेत्यांचे प्रयत्न अपुरे पडू लागले आहेत..
शरद पवार, अजित पवारसारखे राजकीय नेते वर्षांनुवर्षे अनेक क्रीडा संघटनांच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचे सरकार राज्यात आहे, पण खेळांच्या विकासासाठी योग्य प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत. शरद पवारांनी आपल्याकडून जे काही होईल, ते क्रीडा संघटनांना दिलं. राजकीय नेते आपल्या राजकीय वलयासाठी जितके देतात, तितके वसूल करण्याचीही त्यांची ताकद असते. राजकीय दबावाखाली क्रीडा संघटना चालतात, हे सत्य आहे.
संदीप आचार्य

राजकीय नेते अवघड जागेचं दुखणं..
सरकारी मदतीच्या बाबतीत महाराष्ट्र अद्याप मागासलेला आहे, असेच म्हणावे लागते. एकेकाळी क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. बाकीची राज्ये अधिक मेहनत घेताहेत, आपण काहीच करत नाही, म्हणून आम्ही माघारीवर पडत आहोत. वीरधवल खाडेने कर्नाटककडे जातोय, अशी धमकी दिल्यानंतर दोन दिवसांत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला पुरस्कार दिला. हरियाणामध्ये भाजपचे सरकार असो वा काँग्रेसचे, त्यांचे मंत्री राष्ट्रीय स्पर्धाना हजर असतात. पदक मिळवल्यानंतर आठवडाभराच्या आत त्यांना बक्षिसाची रक्कम दिली जाते. पण महाराष्ट्रात बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी वर्षांनुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. गेल्या तीन वर्षांपासून अद्याप दादोजी कोंडदेव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नाही. राजकीय पक्ष किंवा नेते खेळात आल्याने त्याच ताकदीने, आवडीने खेळ वाढवणार असेल तर तो फायद्याचा असतो. अन्यथा कोणताही राजकीय नेता अवजड असतो. त्याला बाहेरही काढता येत नाही किंवा जा असेही म्हणता येत नाही. तो अवघड जागेचं दुखणं होऊन बसतो.
अरुण देशमुख

शिंपला जगायला हवा..
भरतीदरम्यान अनेक जीवजंतू समुद्रकिनाऱ्यावर येत असतात. त्यातले काही समुद्रात जातात तर काही किनाऱ्यावरच मरतात. त्यापैकी एक शिंपला मुलाने समुद्रात फेकला, त्या वेळी आजोबांनी विचारले, एकाने काय फरक पडणार. तेव्हा नातू फारच सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो, त्या शिंपल्याला नक्कीच फरक पडला असेल, कारण तो तरला.. जिवंत राहिला. तुमच्या मुलाला खेळाच्या समुद्रात टाका तो वाचेल.. तरेल.. जगेल.. यशस्वी होईल, आज हा संदेश पालकांपर्यंत पोहोचवला तर नक्कीच फायदा होईल.
नीता ताटके

नेमबाजी श्रीमंतांचा खेळ नाही..
नेमबाजी हा महागडा खेळ आहे, हे मान्य. पण सध्या महाराष्ट्राचे ३५० खेळाडू राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी होतात. पण या प्रत्येक खेळाडूची लाखो रुपयांच्या बंदुका घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे आम्ही क्लबकडे असलेल्या बंदुका त्यांना वापरायला देतो. जेणेकरून १०-१५ मुले एका बंदुकीद्वारे स्पर्धेत आपली कामगिरी करू शकतील. त्यामुळेच महाराष्ट्राने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू घडवले आहेत. नवनाथ फडतरे याने ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तेव्हा त्याच्या शेतकरी वडिलांना शोधताना प्रसारमाध्यमांच्या नाकी नऊ आले होते. म्हणूनच नेमबाजी हा खेळ श्रीमंतांचा नाही, हे या गरीब घरातील खेळाडूने दाखवून दिले. बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा खेळ पाहण्यासाठीसुद्धा आजही लोक स्पर्धेच्या ठिकाणी जातात.
शीला कनुंगो
छायाचित्रे : दिलीप कागडा
(या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.)