मुंबई प्रेस क्लबच्या ‘रेड इंक पुरस्कार’ सोहळ्यात प्रतिष्ठेचा ‘कारकीर्द गौरव पुरस्कार’ मृणाल पाण्डे यांनी शनिवारी (७ जून) स्वीकारला, ती बहुधा सत्तरीकडे झुकणाऱ्या या लेखिका-पत्रकर्तीसाठी आणखीही पुरस्कार वाट पाहत असल्याची नांदी होती. ‘हिंदुस्तान’ या हिंदी दैनिकाच्या दीर्घकाळ संपादक आणि पुढे अनेक इंग्रजी दैनिकांत स्तंभलेखक अशी ओळख असणाऱ्या पाण्डे यांचे कर्तृत्व पत्रकारितेत मावणारे नव्हेच. हिंदी लेखिका, इंग्रजी अनुवादकार, चित्रवाणीवरील मुलाखतकार आणि पुढे ‘प्रसार भारती’च्या अध्यक्ष असे पैलू या कर्तृत्वाला आहेत. मराठीजन त्यांना ओळखतात ते ‘माझा प्रवास’ या गोडसे भटजींच्या पुस्तकाचे (उपलब्ध तीनपैकी) पहिले इंग्रजी भाषांतर करणाऱ्या म्हणून; परंतु हिंदी पट्टय़ात त्यांना स्त्रीवादी कथा-कादंबरीकार म्हणून मान आहे आणि इंग्रजीत, खरा भारत जाणणाऱ्या लेखिका म्हणून.
हे आयाम त्यांच्या शिक्षणाइतकेच बहुपेडी. टिकमगढम् जिल्ह्य़ात जन्मलेल्या मृणाल यांनी नैनितालमधील शालेय शिक्षणानंतर अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी व इंग्रजी साहित्यांतील स्नातकोत्तर (एमए) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे वॉशिंग्टनच्या काकरेरान कॉलेज या संस्थेतून संस्कृत साहित्य, प्राचीन भारतीय साहित्य व इतिहास तसेच ललितकला या विषयांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. हे सारे होत असताना, वयाच्या २१ व्या वर्षी ‘धर्मयुग’ या धर्मवीर भारती संपादित साप्ताहिकात त्यांची कथा छापून आली. अमेरिकेत पाहिलेला स्त्रीवाद आणि भारतीय स्त्रियांची स्थिती यांतला फरक ओळखून भारतीय संदर्भातील लिखाण त्या करीत. हिंदी भाषिक राज्यांतील जनजीवन, या भाषेची छत्तीसगढपासून उत्तराखंडापर्यंतची रूपे यांच्याशी पाण्डे यांचा असलेला परिचय कथा-कादंबऱ्यांतून वाचकाला भिडतो. ‘अपनी गवाही’, ‘पटरंगदेवी’, ‘हमको दियो परदेस’ यांसारख्या कादंबऱ्या आणि ‘बिब्बो’, ‘चमगादडेंम्’ आदी लघुकथांसह ‘बचुली चौकिदारिन की कढमी’, ‘एक स्त्री का विदागीत’ यांसारख्या कथा गाजल्या, त्या त्यांतील अस्सल भारतीय संदर्भामुळेच.
‘दूरदर्शन’च्या जमान्यापासून मृणाल यांचा चेहरा चित्रवाणी-प्रेक्षकांना परिचित आहे. वरकरणी गोड वाटणारा ठाम आवाज आणि तसाच चेहरा असलेल्या मृणाल पाण्डे मुलाखतकार म्हणून अधिक काळ वावरल्या, परंतु हल्ली काही वृत्तवाहिन्यांवर त्या आपला मुद्दा मांडताना दिसतात. ‘खेडय़ांकडे पाहिल्याखेरीज भारतीय स्त्रीवादाला बळकटी येणार नाही’ यासारखे त्यांचे मत, १९८४ ते १९८७ पर्यंत ‘वामा’ या नारीवादी मासिकाच्या संपादक म्हणून घेतलेल्या अनुभवातून आलेले असते. ‘प्रसार भारती’तील त्यांची साडेतीन वर्षांची कारकीर्द नेत्रदीपक असणे अशक्यच असले, तरी ती वादग्रस्त नव्हती हेही थोडके नव्हे.