आपण जिथे जगलो त्या मातीतच स्वत:ला गाडून घेणारे, त्या मातीतून उगवणारे आणि फुलणारे लेखक अनेकदा ‘जगप्रसिद्ध’ होत नाहीत.. हयातीतच प्रसिद्धी मिळवण्याचा मान तर फार कमी जणांना मिळतो. अशा लेखक मंडळींपैकी एक लेखिका- जोन कॅलिफोर्निया कूपर- यांचे निधन गेल्या शनिवारी (२० सप्टें.) झाले, त्यानंतर आठवडाभरात त्यांची निधनवार्ता अमेरिकेसह जगभरच्या प्रसारमाध्यमांनी दिली.. ही त्यांचे महत्त्व जगाला समजण्याची सुरुवात ठरली आहे. एरवी ‘१९८९ साली अमेरिकन बुक अवॉर्ड मिळवणाऱ्या एक’ म्हणून त्यांची ओळख होतीच, पण त्यांचे साहित्य इतके साधेसोपे कसे, हा प्रश्न आता नव्याने चर्चिला जातो आहे.
त्या मूळच्या नाटय़लेखिका. ज्या आफ्रिकन-अमेरिकन समाजात त्या वाढल्या, त्यांची सुख-दु:खे नाटकांतून मांडावीत आणि जमल्यास प्रेक्षकांना चांगले जगण्याबद्दल चार युक्तीच्या गोष्टीही आपल्या नाटकांतून समजाव्यात, एवढय़ाच उद्देशाने त्यांनी नाटय़लेखन सुरू केले. ही नाटके त्या वेळच्या ज्येष्ठ कृष्णवर्णीय लेखिका अ‍ॅलिस वॉकर यांनी पाहिली आणि जोनला गोष्ट किती प्रभावीपणे सांगता येते असे वॉकर यांना वाटले. ‘गोष्टी लिही’ या वॉकर यांच्या आग्रहाखातर काही कथा जोन यांनी लिहिल्या, त्यांचे ‘अ पीस ऑफ माइन’ हे पुस्तकही १९८४ मध्ये वॉकर यांच्या पुढाकारानेच प्रकाशित झाले; तेच जोन यांचे पहिले प्रकाशित पुस्तक.
 त्याआधी ‘सेंटरस्टेज’ या संपादित नाटय़संग्रहात त्यांचे एक नाटक प्रकाशित झाले होते, ‘स्ट्रेंजर्स’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकाने १९७८ सालच्या एका प्रतिष्ठित नाटय़स्पर्धेत ‘उत्कृष्ट कृष्णवर्णीय नाटककार’ असा पुरस्कारही जोन यांना मिळवून दिला होता. पण वयाच्या १७ व्या वर्षीपासून नाटके लिहीतच राहिलेल्या जोन यांना, आपली पुस्तके छापली जातील असे वाटलेही नव्हते!
ही भावना त्यांनी ‘एनपीआर’ या प्रख्यात अमेरिकी नभोवाणी वाहिनीच्या मुलाखतीत बोलूनही दाखवली होती.. ‘माझी पुस्तके ही काही पुस्तके म्हणून लिहिलेली नाहीत.. ज्यांना वाचणे माहीत नाही, त्यांनीही वाचावे म्हणून मी लिहिले!’ हे खरेच, कारण पुस्तकांपासून आजवर लांब राहिलेल्यांशी नाते जोडतील असे लेखनच त्यांनी केले आहे. काही जणांनी या लेखनावर, ते बायबलच्या दहा आज्ञांवर आधारित असल्याची टीका करून पाहिली. पण इतके साधे शहाणपण केवळ बायबलमध्येच असू शकत नाही, ते (कोणत्याही धर्मीयांच्या, वर्णीयांच्या) जगण्यातही असतेच असते, याचे पुरावे जोन यांच्या जित्याजागत्या गोष्टींतून मिळतात. एकंदर १३ पुस्तके जोन यांच्या नावावर आहेत, ती वाचून भारतीय इंग्रजी वाचकांना योगायोगाने, सुधा मूर्ती यांची आठवण होऊ शकेल!