पक्षास कार्यक्रम देण्याचे मोदी यांचे कौशल्य वादातीत आहे. परंतु त्यांना पुढच्या काळात मोजले जाईल ते त्यांनी सरकारचे प्रमुख म्हणून काय करून दाखवले यावर. त्यामुळेच भाजपच्या कार्यकारिणीतून पक्षाचा आणि सरकारचा कार्यक्रम काय असावा, याचे दिग्दर्शन होणे बरे ठरले असते. त्याऐवजी झाली, ती प्रचारकाळातली- विरोधकांपासून देशाला मुक्त करण्याची भाषा!
काँग्रेस किती नतद्रष्ट आहे हे समस्त भारतवर्षांस समजावून सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची गरज काय? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाचे नवेकोरे अध्यक्ष अमित शहा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाया अर्थ/संरक्षण/कंपनी व्यवहारमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणांतील लक्षणीय भाग काँग्रेसने देशाची किती दुरवस्था केली ते सांगण्यात खर्च केला. तो अस्थानी होता. याचे कारण भाजपच्या कार्यकर्त्यांना ते सांगण्याची गरज नाही आणि जनतेस ते माहीत नसते तर भाजपस सत्तास्थापनेची संधी मिळती ना. तेव्हा सत्तास्थापनेनंतर ७५ दिवसांनंतर भाजप अजूनही काँग्रेस किती अकार्यक्षम आहे हे सांगण्यासाठी खर्च करीत असेल तर त्या पक्षास आपण आता सत्ताधारी आहोत याचे भान अद्याप आलेले नाही, असे म्हणावे लागेल. निवडणूकपूर्व सभांतून अशा प्रकारची टीका केली जाते आणि ती काही प्रमाणात रास्तही असते. परंतु सत्ता स्थापनेनंतर इतके मागे मागे वळून पाहण्याची गरज नाही. तसे जर होत असेल तर ते पुढील लक्ष्य अद्याप दिसू न लागल्याचे लक्षण मानावयास हवे. भाजपचे तसे झाले आहे काय? या प्रश्नाचे उत्तर ठामपणे नकारार्थी देण्याइतका विश्वास त्या पक्षाने अजून तरी दिलेला नाही. असे म्हणावे लागते याचे कारण म्हणजे भाजपची भाषा. ती अजून तरी काँग्रेससदृशच दिसते. गरिबी, गरिबांचे कल्याण, गरिबांची अन्नसुरक्षा.. या आणि अशा गरिबीचे मुबलक सादरीकरण करणे ही काँग्रेसची खासियत. कल्याण करावयाचे o्रीमंतांचे आणि भाषा ठेवायची गरिबीची अशी ही काँग्रेसची धोरणात्मक व्यूहरचना असते. या उलट इंडिया शायनिंगसारख्या धाडसी घोषणांतून आपण वेगळे आहोत असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. तो अंगाशी आला. त्यामुळे आपणही गरिबीच्या भाषेचा अंगीकार करावा असे भाजपस वाटू लागले असावे. गेले काही महिने, विशेषत: जागतिक व्यापार संघटनेसमोरील कोलांटउडीनंतर, भाजप ज्या पद्धतीने आणि गतीने गरिबीस हाताशी धरत आहे, ते पाहता कोणासही काँग्रेसची आठवण यावी. त्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा संपूर्ण अर्थसंकल्पच काँग्रेसचा होता अशी टीका झाली होती आणि तीत नक्कीच तथ्य होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याच गरिबीचा पूर्ण आविष्कार पाहावयास मिळाला. जागतिक व्यापार संघटनेसमोर आपण जे काही केले ते किती योग्य होते हे सांगताना जेटली आणि मोदी यांनी आम्ही गरिबांच्या हितासाठीच हे केले, असा दावा केला. गरिबीविरोधात खरोखरच काही करावयाचे असेल तर संपत्तीनिर्मितीस उत्तेजन द्यावे लागते. गरिबीचा केवळ दुस्वास करून वा गरिबांविषयी केवळ करुणा व्यक्त करून गरिबी दूर होत नाही वा गरिबांचे कल्याण होत नाही. ती दूर करण्याचा एक मार्ग म्हणून अनुदान संस्कृतीत निश्चित उपायांनी बदल करावा लागतो. तो करण्याची आपली तयारी आहे, असे भाजपच्या कृतीतून अद्याप तरी ध्वनित झालेले नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत या प्रश्नावर दिशादर्शन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु भाजप नेत्यांनी ही संधी काँग्रेसच्या अवगुण गायनासाठी व्यतीत केली.
भाजप हा क्रांतिकारी विचार आहे, असे अमित शहा म्हणाले. डझनभर गंभीर गुन्हय़ांची नोंद असलेल्या व्यक्तीस थेट राष्ट्रीय अध्यक्ष करून भाजपने आपल्या क्रांतिकारी विचारांची दिशा स्पष्ट केलीच आहे. या शहा यांच्या मते देश काँग्रेसमुक्त करण्याची गरज आहे. हे वाक्य निवडणूक प्रचार सभांत एक वेळ ठीक. अन्यत्र त्याचा वापर झाल्यास ते वापरणाऱ्याचा संकुचित राजकीय विचार त्यातून उठून दिसतो. शहा यास अपवाद नाहीत. लोकशाहीत बळकट सत्ताधारी पक्षासाठी समर्थ विरोधी पक्षाची गरज असते. लेच्यापेच्या विरोधी पक्षामुळे सत्ताधारी पक्ष मुजोर होऊन दिशाहीन होण्याची शक्यता असते. काँग्रेसमुक्त देश करण्याची हाक देताना शहा यांना असे होणे अभिप्रेत असावे. शहा यांना सांगावयास हवे की छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि तेज झळाळून दिसते ते समोर औरंगजेबासारखा बुद्धिमान प्रतिस्पर्धी होता म्हणून. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे आणि श्यामाप्रसाद मुखर्जी वा राम मनोहर लोहिया यांच्याशी तीव्र मतभेद होते. परंतु तरीही दोन्ही बाजूंना परस्परांच्या बौद्धिक क्षमतेविषयी अतीव आदर होता आणि विरोधी राजकीय विचार समूळ नष्ट करून टाकावा असे दोन्ही बाजूंना वाटत नसे.  एकमेकांच्या राजकीय विचारांचा दोन्ही बाजूंनी सन्मान राखला जात होता. इतिहासात इतके दूर जाणे शहा यांना मंजूर नसल्यास त्यांचा ज्या खेळाच्या संघटनेशी संबंध आहे, त्या क्रिकेटचा दाखला देता येईल. सुनील गावस्कर हा फलंदाज म्हणून महान ठरतो तो त्याने वेस्ट इंडिज वा ऑस्ट्रेलियाच्या कर्दनकाळ गोलंदाजांसमोर पाय रोवून शतकांवर शतके रचली म्हणून. बांगलादेश वा झिंबाब्वे यांच्यासारख्या दुऱ्यांसमोर शौर्य गाजवून त्याच्या शतकांचे विक्रम झाले नाहीत, हे शहा यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा भाजपचा प्रसार सर्वत्र व्हावयास हवा ही त्यांची भूमिका योग्यच. पण त्यासाठी समोर विरोधी पक्षच नसावा आणि देश काँग्रेसमुक्त व्हावा, अशी इच्छा धरणे बालबुद्धीचे द्योतक म्हणावे लागेल.
ज्या पक्षास ६० वर्षांत काही करता आले नाही, तो पक्ष ६० दिवसांत आपल्याला हिशेब मागतो यावर या अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केला. राजकारण असो वा अन्य कोणतेही क्षेत्र. त्यात कोणी किती दिवस काढले यास महत्त्व नसते. तर मिळालेल्या काळात त्याने वा तिने काय करून दाखवले यावरून कर्तृत्वाचे मोजमाप केले जात असते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा साठ दिवसांचा हा मुद्दा गैरलागू ठरतो. खेरीज, सत्ताधारी पक्षाचे मूल्यमापन काही विशिष्ट काळानंतरच करावे, असा काही नियम आहे काय? तसा तो असल्यास मग दिल्ली विधानसभेत पहिल्यांदाच सत्ता पटकावणाऱ्या आम आदमी पक्षावर भाजपने महिनाभरातच टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली होती, ते का? आपचे सरकार कोवळे आहे, चार-सहा महिने गेल्यावरच आपण त्यांच्याबाबत भाष्य करू या, असा सल्ला मोदी यांनी त्या वेळी स्वपक्षीयांना दिल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणजे दर तिमाहीनंतर ताळेबंद सादर करावा लागणारी कंपनी नव्हे. राजकारणाचे मूल्यमापन हे प्रतिदिन होत असते. तेव्हा आम्हाला लगेचच काही प्रश्न विचारू नका, हा मोदी यांचा कांगावा झाला. नैसर्गिक गतीने चालणाऱ्या एखाद्या नेत्याने तो केला असता तर ते समजण्यासारखे होते. परंतु या युक्तिवादाचा आधार घेणे घोडय़ावरून आलेल्या मोदी यांना शोभत नाही. ज्या तडफेने आणि आक्रमकपणे त्यांनी सत्ताकारण केले त्याच तडफेने आणि आक्रमकपणे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे नैसर्गिक आहे.
या अधिवेशनात मोदी यांनी भाजपने पुढची पाच वर्षे पाच सामाजिक उद्दिष्टांसाठी खर्च करावीत असे सुचविले. पक्षास कार्यक्रम देण्याचे मोदी यांचे कौशल्य वादातीत आहे. वेगवेगळ्या चमकदार योजना उत्तम घोषणांच्या वेष्टनांतून जनतेसमोर नेणे त्यांना जितके जमते त्याच्या एक दशांशदेखील अन्य राजकीय नेत्यांना साध्य होत नाही. एक नेता म्हणून हा गुण अर्थातच महत्त्वाचा. परंतु त्याच्या जोडीला मोदी यांचे यापुढे मूल्यमापन त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काय केले एवढय़ावरच होणार नाही. तो त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु मोदी यांना पुढच्या काळात मोजले जाईल ते त्यांनी सरकारचे प्रमुख म्हणून काय करून दाखवले यावर. तेव्हा त्यांनी आता त्या दृष्टीने प्रयत्न करावयास हवेत. गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या पुण्याईवर त्यांना फार काळ रेटता येणार नाही. परंतु रोकडे काही, शीघ्र सामथ्र्य दाखवी, असे मोदी यांना सांगण्याची वेळ आली आहे.