18 September 2020

News Flash

चित्रांचा राजकीय पट

चित्रपटाची दृश्यभाषा केवळ कॅमेऱ्याच्या कोनांपुरती नसते, संकलन आणि दिग्दर्शन हा या चल दृश्यांचा प्राण असतो, हे जुनंच सत्य अचल चित्रांच्या पटातूनही समोर येतं..

| July 15, 2013 12:03 pm

चित्रपटाची दृश्यभाषा केवळ  कॅमेऱ्याच्या कोनांपुरती नसते, संकलन आणि दिग्दर्शन हा या चल दृश्यांचा प्राण असतो, हे जुनंच सत्य अचल चित्रांच्या पटातूनही समोर येतं.. संग्रह आणि सूचीकरण यांचं महत्त्व संगणकीय युगात वाढत असताना, त्याच तंत्रांचा वापर स्वत:च्या भावविश्वाची घडण दाखवण्यासाठी एक कलावंत करतो, तेव्हा त्याच्या भावविश्वाच्या पुढला – राजकीय शहाणिवेकडे नेणारा पट उलगडतो..

अक्रम झातारी याला चित्रं काढता येतात. पण त्याला चित्रकार म्हणण्यापेक्षा दृश्य-कलावंत म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण या ‘चित्रकारा’चे केवळ व्हिडीओ वा चलपटच १९९८ सालापासून आजवर प्रदíशत झाले आहेत. व्हेनिस (इटली) येथे सध्या सुरू असलेल्या जागतिक कलेच्या द्वैवार्षकि (बायअन्युअल किंवा सर्वाधिक रूढ उच्चाराप्रमाणे ‘बिएनाल’ ) प्रदर्शनात ‘लेबनॉनचा कलावंत’ म्हणून झातारीचा सहभाग होता. त्याआधी जर्मनीत ‘डॉक्युमेंटा’ या सामाजिक-राजकीय आशयाच्या कलेसाठी जगभरात सर्वमान्य असलेल्या प्रदर्शनात  (२०१२) झातारी याचं फोटो-शिल्प पाहिलं होतं, पण तो मुख्यत: फिल्म बनवतो असं काहीतरी तेव्हा माहीत झालं होतं. व्हेनिसला त्याची फिल्मच पाहायला मिळाली.
‘कलाभान’च्या दृष्टीनं महत्त्वाचं हे की, अक्रम झातारी याचा ‘चित्रपट’ म्हणजे काय, तो कसा असतो आणि कलादालनांत किंवा मोठय़ा दृश्यकला-प्रदर्शनांतच तो का असतो, इथपासून सर्व शंकांच्या निरसनाची संधी सध्या व्हेनिस येथे मिळते आहे. ‘लेटर टु अ रिफ्यूिझग पायलट’ हे या फिल्मचं नाव. ही फिल्म आहे ४५ मिनिटांची. हा ‘बोलपट’ नाही. ‘डॉक्युमेंटरी’ किंवा ‘अनुबोधपट’ असं या फिल्मला म्हणणं फारच क्रूर ठरेल इतकी ती तरल आहे. सत्य घटनेवर आधारित असली, तरी ती वृत्तपटासारखी नाही. मुळात इथं ‘चलतचित्रं’ फारच कमी आहेत, तरीही ही फिल्म एखाद्या चित्रपटाचाच परिणाम घडवते.
  उडणं, आकाशात विहरणं याचं आकर्षण बालसुलभ किंवा (सांतेझ्क्युपेरीच्या ‘द लिटिल प्रिन्स’ या मराठीसह अनेक भाषांत आलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेतला तर) शिशुसुलभ आहे. पण जे देश युद्धातच अडकून पडले, तिथल्या तरुणांना हे उडण्याचं आकर्षण ‘फायटर पायलट’ बनवतं. तम्माम अरब देशांच्या मते इस्रायल हा असा युद्धखोर देश. कोणताही फायटर पायलट आपण ज्यावर बॉम्बफेक करणार तिथं कोण राहतं याची पर्वा करत नाही, त्याला फक्त लक्ष्य दिसत असतं.. पण  असा एखादा फायटर पायलट जर आधी आíकटेक्ट होण्याचं (आíकटेक्चर या विद्याशाखेतलं) प्रशिक्षण घेतलेला असेल, तर? त्याला इमारत पाहूनच कळत असेल-  ही कोणत्या प्रकारची इमारत आहे, इथं गरीब राहतात की इथून सरकारची सूत्रं हलतात, इथे शाळा आहे की मध्यमवर्गीय वस्ती.. वगरे. एरवी असे आíकटेक्ट असूनही पायलट झालेले तरुण कमी असतील, पण एक होता – इस्रायलचा हैगेल तामिर. इस्रायलनं १९७५ ते १९९१ अशी १७ र्वष चाललेल्या युद्धात लेबनॉनवर बॉम्बफेक करण्याचं काम ज्या अनेक तरुणांना दिलं, त्यापकी एकाचं नाव  हैगेल तामिर. यानं एका ‘मिशन’ला थेट नकार दिला. लक्ष्यापर्यंत जाऊन हैगेल तामिर परत फिरला.. का तर म्हणे ही इमारत म्हणजे शाळा किंवा हॉस्पिटल असणार, असं त्याला दुरूनच ओळखू आलं.
ही गोष्ट इतकी अविश्वसनीय आहे की, लेबनॉनच्या सदा या निमशहरी गावात ही ‘अफवा’ म्हणूनच लोक एकमेकांना सांगत. अरे आपली ती शाळा होती ना, आता उद्ध्वस्त झाल्येय ती, तिच्यावर बॉम्ब फेकायला म्हणे एका इस्रायली पायलटानं नकार दिला होता! इस्रायली असूनही.. वगरे गप्पा त्या गावात १९८२ साली जोरात होत्या.
याच शाळेच्या गच्चीत गुपचूप जऊन अक्रम झातारी आणि त्याचे भाऊ, मित्र कागदाची विमानं उडवायचे. गावातली ही सर्वात उंच इमारत. अक्रम आत्ता ४७ वर्षांचा आहे. म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि १९८२ उजाडलं, शाळा उद्ध्वस्त झालीच. कागदी विमानंही आता आठवणींतच विहरू लागली.
युद्धविराम १९९१ साली झाला, त्यानंतर  यथावकाश शाळेची इमारत पुन्हा उभी राहिली. या शाळेच्या प्रांगणात झातारी यांच्या सौजन्याने एक छान शिल्पही उभं राहिलं.. दोन मस्तीखोर मुलं एकमेकांचे खांदे पकडून, डोक्याला डोकं भिडवून जणू म्हणताहेत.. ‘थांब दाखवतोच तुला’.
ते शिल्प या फिल्ममध्ये दिसतंच, पण अखेर तामिरचा छडा लावून अक्रम झातारी आपल्याला (पडद्यावरल्या टाइप्ड अक्षरांतून) सांगतो की ती अफवा नव्हती. ही गोष्ट अक्रम झातारी या लेबनॉनवासी – सदावासी माणसानं सांगितलेली असल्यानं हैगेल तामिर याच्याबद्दल एकच ओळ इथे येते. बाकीची तब्बल साडेचव्वेचाळीस मिनिटं सांतेझ्क्युपेरी, झातारी कुटुंब, अक्रमचे भाऊ आणि मित्र कागदी विमानं कशी करत आणि उडवत,  हेच दिसत असतं. पण, चित्रांचा हा पट उभा राहण्याचं कारण हा तामिरच, हेही प्रेक्षकाला कळलेलं असतं.
संघर्ष अटळ असतोच का, तो टाळता येत नाहीच की काय, संघर्षांत माणुसकीला- प्रसंगी मत्री होण्याच्या किंवा वाढण्याच्या शक्यतेला स्थानच नसतं की काय, असे मोठे प्रश्न एका महाराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात ही फिल्म – म्हणजे त्यातली दृश्यं – यशस्वी ठरली. चित्रपटगृहांत असते तशी एक खुर्ची, त्या खुर्चीमागे एक १६ मि. मी. फिल्मचा प्रोजेक्टर आणि त्यातून अगदी तीनचार मिनिटांची, फक्त बॉम्बफेकीच्या दृश्यांची एक चलचित्रफीत असं सगळं एक मांडणशिल्पच ‘अ लेटर टु पायलट’च्या मोठय़ा पडद्यासमोर होतं. त्याचा एक थेट परिणाम म्हणजे, टिपिकल वास्तव आणि टिपिकल चित्रपट यांच्यापेक्षा हा मोठा पडदा निराळं काहीतरी दाखवू पाहतोय, याची जाणीव सतत जिवंत रहिली.
राजकीय वास्तव आणि माणसं यांचा काय संबंध आहे, याची उकल भावनिक अंगानं करता-करताच एकदम राजकीय वास्तवाचे पाश तोडायचे आणि राजकीय शहाणिवेकडे आणि अशी शहाणीव (पेरेनियल विज्डम ) देणाऱ्या साध्यासुध्या सत्य-तत्त्वांकडे जायचं, असा मार्ग गेल्या ४० ते ४५ वर्षांत अनेक कलावंतांनी शोधला. झातारी हाही त्याच मार्गावरला पुढला प्रवासी.  ‘पुढला’, कारण तो फक्त संग्रहित फोटो, संग्रहित दृश्यं, कात्रणं यांचा आधार घेतो आणि तरीही तरलपणे गोष्ट सांगतो, ही गोष्ट अर्थात ‘एक होता अमुक..’ अशी सरळ दिशेची नसते, तीत अनेक उप-कहाण्या सामावलेल्या असतात आणि निरनिराळ्या संग्रहांतून आलेली दृश्यं जणू प्रवाहीपणे इथे – अक्रम झातारीच्या फिल्ममध्ये – एकत्र येतात.
आजकालचं संगणकोत्तर जग हे ‘संग्रह आणि सूचीकरण’ यातून ज्ञानाकडे जाऊ पाहणारं आहे. मग आजकालची कला हीदेखील त्या तंत्रांचा आधार घेणारी असणार! पण एक बरी बाब अशी की, झातारी यानं या संगणकीय अनुभवाचं अनुकरण केलेलं नाही. ज्या १९७५ ते १९९१ या सालांत अक्रम नऊ ते २५ र्वष वयाचा होता – त्या काळातलं लेबनॉन हे त्याच्या भावविश्वाचा भाग आहे. ते (म्हणजे भावविश्व आणि लेबनॉन, दोन्ही) कळून घेण्यासाठी संग्रह हाच उत्तम मार्ग आहे, हे तिशीच्या उंबरठय़ावर असताना अक्रमला समजलं. त्यातून संग्रहित चित्रांचे राजकीय पट उलगडू लागले आणि आज वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी, घडत्या जागतिक कलेतिहासात त्याचं स्थान पक्कं झालेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2013 12:03 pm

Web Title: portraits of politicians canvas
टॅग Camera
Next Stories
1 नात्याचं पोस्टर
2 सांस्कृतिक? म्हणजे?
3 संदर्भाचं फुलपाखरू..
Just Now!
X