समाजसेवेचे व्यावसायिकीकरण झाल्याच्या आजच्या काळामध्ये समाजासाठी कधी काळी माणसे निरलसपणेही काम करीत असत, ही दंतकथा वाटावी. अशाच एका दंतकथेतील एक नायक म्हणजे प्रभुभाई संघवी. नुकतेच त्यांचे निधन झाले. एकंदरच काही मूल्यविचार आणि त्यावर प्रगाढ श्रद्धा ठेवून आयुष्य वेचणारी माणसे- मग ती कोणत्याही विचारांची असोत- आज दुर्मीळच. अशा माणसांचे समाजात नुसते असणेसुद्धा महत्त्वाचे असते. सामाजिक जीवनातील शिव आणि सुंदर यावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी अशा व्यक्ती असाव्या लागतात. त्यामुळेच प्रभुभाईंचे जाणे हे अधिक वेदनादायी आहे. प्रभुभाई हे तसे नेते नव्हेत. ते कार्यकर्ते. बेचाळीसच्या चळवळीसाठी महाविद्यालयीन शिक्षण सोडणाऱ्या ध्येयवादी तरुणांपैकी अनेक जण काँग्रेसपेक्षा समाजवादी संघटनांकडे आकृष्ट झाले, त्यात प्रभुभाई हे एक. राष्ट्र सेवा दलाचे नेते एस. एम. जोशी हे त्या चळवळीतले एक गाजते नाव. प्रभुभाई त्याच काळात एसेम यांच्या जवळ आले. तेव्हा सेवा दलाशी आणि प्रामुख्याने एसेम यांच्याशी जुळलेले त्यांचे नाते अखेपर्यंत कायम होते. पन्नासच्या दशकात सेवादलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी राष्ट्रउभारणीच्या विविध प्रयोगांमध्ये स्वत:ला झोकून दिले. एसेम यांच्या स्नेहवर्तुळात ते आणि त्यांची पत्नी प्रमिला संघवी हे दोघेही होतेच, पण एसेम यांचे ते स्वीय सहायकही होते. संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षमय कालखंडातही एसेम यांनी सर्व प्रकारचे प्रवाद आणि टीका झेलूनही आपल्या या गुजराती मानसपुत्राला दूर केले नव्हते, यावरून एसेम यांच्या भल्या मूल्यांची जेवढी कल्पना येते तेवढीच त्यांच्या नात्यातील घट्टपणाचीही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीप्रमाणेच एसेम आणि प्रभुभाई यांच्या आयुष्यातील आणीबाणीचे पर्वही थरारक होते. त्यांची लढाई तेव्हा स्वकीयांशीच होती आणि त्यातही लोकशाही मूल्यांवर अविचल निष्ठा ठेवून त्यांनी लढा दिला. आणीबाणीनंतरची वर्षे म्हणजे देशातील समाजवादी चळवळीचा उतरता काळ. त्या काळात अनेक साथी हतवीर्य होऊन स्मरणरंजनाच्या धुंदीत जगू लागले. प्रभुभाईंची जिद्द मात्र कणखर होती. त्यांनी मुंबईतील कालिनामधील समर्थ शिक्षण मंडळाच्या माध्यमातून समाजवादी प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले. गेले काही महिने ते आजारी होते तरी आपल्या साथींबद्दलची कृतज्ञ भावना व्यक्त करणारे ‘ध्येयधुंद सोबती’ हे पुस्तक ते लिहीत होते. त्याचे प्रकाशन ज्या दिवशी होणार होते त्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि उरल्या त्या आठवणी.